सोनालीनं मुलासाठी केली भावनिक पोस्ट शेअर

गेल्याच महिन्यात सोनाली बेंद्रेनं आपल्याला हायग्रेड कॅन्सर असल्याची बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यानंतर सर्वच स्तरातून तिच्यासाठी प्रार्थना सुरु झाली. सोनालीनं स्वतः या आजाराची माहिती आपल्या चाहत्यांसाठी दिली. पण हीच बातमी आपला मुलगा रणवीरला सांगणं तिला आणि तिचा पती गोल्डी यांच्यासाठी अतिशय कठीण गोष्ट होती. आपल्या आजाराची बातमी ऐकून आपला मुलगा कसा व्यक्त होईल वा कशी प्रतिक्रिया देईल याबद्दल दोघेही साशंक होते. मात्र दोघांनीही ही परिस्थिती धीरानं आणि संयमानं सांभाळली. याविषयीदेखील सोनालीनं सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

काय आहे सोनालीची मुलासाठी पोस्ट

आपला मुलगा रणवीरसाठी सोनालीनं त्याच्या फोटोसह एक भावनिक पोस्ट लिहिली. ‘माझ्या १२ वर्ष ११ महिने आणि ८ दिवसाच्या मुलाला माझ्या आजाराची बातमी कशी सांगावी, हा प्रश्न मला पडला होता. पण त्याला वास्तव सांगणेदेखील गरजेचं होतं. आजपर्यंत आम्ही त्याच्यापासून काहीही लपवून ठेवलं नाही. प्रत्येकवेळी त्याच्याशी प्रामाणिकपणेच वागलो. यावेळीदेखील आम्ही हाच निर्णय घेत जे काही सत्य आहे ते त्याच्यासमोर मांडलं. त्यानं ही गोष्ट अतिशय समजूतदारपणानं घेतली. इतकंच नाही तर माझ्यासाठी तो एक सकारात्मकेचा स्रोत बनला. ही गोष्ट कळल्यानंतर आता तो बऱ्याचदा माझ्या पालकांच्या भूमिकेत दिसतो. मला असं वाटतं की, अशा वेळी मुलांना सहभागी करून घेणं आवश्यक आहे. अशावेळी त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये समाविष्ट करून घ्यायला हवं, त्यांना बाजूला कोणत्या रांगेत बसवण्यात काही अर्थ नाही. त्यांना जीवनाच्या वेदना आणि वास्तविकतेपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नापेक्षा आपण याऊलट वागायला हवं. सध्या रणवीरची शाळेची सुट्टी असल्यामुळं मी त्याच्याबरोबर वेळ घालवत आहे. त्याच्यामुळं मला जगायला जास्त बळ मिळत आहे.’ अशा स्वरुपाची पोस्ट तिनं पोस्ट करत पुन्हा एकदा कॅन्सरला लढा देण्यासाठी सकारात्मकता असल्याचं दाखवून दिलं आहे. सध्या सोनाली न्यूयॉर्कमध्ये आपल्या आजारावर उपचार घेत आहे.

 

First Published on: July 19, 2018 4:49 PM
Exit mobile version