मुकेश खन्नाची सॉरी शक्तीमान

मुकेश खन्नाची सॉरी शक्तीमान

Mukesh Khanna

छोट्या पडद्याने अनेक कलाकारांना फक्त स्टार केले नाही, तर हक्काचा मोठा पडदा या कलाकारांना मिळवून दिलेला आहे. छोट्या पडद्यावर कलाकारांना मिळालेली लोकप्रियता राजेश खन्ना या सुपरस्टारला इतकी भावली की त्यांनी एका चित्रपटासाठी सतीश शहाला घेता येईल का, अशी विचारणा दिग्दर्शकाकडे केली होती. राजेश काकाची अनपेक्षितपणे आलेली सूचना दिग्दर्शकाला संभ्रमात टाकणारी ठरली. सहज विचारणा केली तेव्हा राजेशकाकांनी छोट्या पडद्यावरील लोकप्रियतेचे कारण सांगितले होते.

महाभारतातील जवळजवळ सर्वच कलाकार चर्चेत नसले तरी महाभारत थांबल्यानंतर निदान एक दशक तरी त्यांनी मोठा पडदा गाजवला होता. नितेश भारद्वाज, रूपा गांगुली यांना राजकारणाची दारे मोकळी झाली. भीष्म साकार करणारा मुकेश खन्ना पुढे निर्माता झाला. शक्तीमान, आर्यमान या मालिकांची त्याने निर्मिती केली. सुपरमॅन, स्पायडरमॅन, हिमॅन यांच्या इतकीच शक्तीमान ही मालिका भारतात गाजली होती. मुकेशची निर्मिती असलेल्या या मालिकेमध्ये त्यांनीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. या बळावर आर्यमान या मालिकेची निर्मिती केली होती. शक्तीमानच्या पुढची ही मालिका तांत्रिकदृष्ठ्या विकसित केली होती. पण या मालिकेला फारसा प्रतिसाद लाभला नाही.

शक्तीमान करत असताना या दरम्यान अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले. या प्रवासात त्याच्या हातून एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो, प्रेक्षक या नात्याने मराठी प्रेक्षकांनी मुकेशला भरपूर काही दिलेले आहे. त्याचे ऋण म्हणून मुकेशने अर्धी गंगू, अर्धा गोंद्या या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. यानिमित्ताने अनेक मराठी कार्यक्रमात तो सक्रियही झाला होता. आता त्याचे नाव पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे मनोरंजनाच्या साधनांमध्ये अमुलाग्र बदल झालेला आहे. प्रेक्षक हा बाहेर पडून जेवढे कार्यक्रम पाहतो, तेवढाच तो सोशल नेटवर्कमध्येही गुंतलेला आहे. डिजिटलच्या माध्यमातून होणारे मनोरंजन प्रेक्षकांना अधिक जवळचे वाटायला लागलेले आहे. त्यामुळे मुकेशने स्वत:ला बदलून घेतलेले आहे. सॉरी शक्तीमान या नावाने पुन्हा डिजिटल शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणे त्याने सुरू केलेले आहे.

पहिल्याच प्रयत्नात अवघ्या काही तासांत वीस हजार प्रेक्षकांनी या लघुमालिकेला प्रतिसाद दिला आहे म्हटल्यानंतर मुकेशच्या अपेक्षा या वाढलेल्या आहेत. त्याच्यासाठी असलेली ही आनंदाची बातमी त्याने प्रसिद्धी माध्यमांपर्यंत फक्त पोहोचवलेलीच नाही तर गाठीभेटी घेणेही सुरू केलेले आहे. लहान मुलांमध्ये या मालिकेची जबरदस्त क्रेझ होती. कंपासपेटीतल्या साहित्यापासून ते दप्तरापर्यंत सर्वच वस्तूंवर शक्तीमानचे चित्र पहायला मिळत होते. त्यापद्धतीची वेशभूषाही अनेक दुकानात झळकताना दिसत होती. आता हॉलिवूडच्या बर्‍याचशा चमत्कारिक, अद्भूत मालिकांनी स्थान मिळवल्यामुळे सॉरी शक्तीमानला किती प्रतिसाद मिळेल हे सांगता येणे कठीण आहे पण आठवणी जागवल्या जाणार आहेत हे नक्की.

First Published on: March 16, 2019 4:46 AM
Exit mobile version