अंकुश चौधरी विचारतोय ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’?

अंकुश चौधरी विचारतोय ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’?

सुख म्हणजे नक्की काय असतं

सुखाची परिभाषा प्रत्येकाची वेगवेगळी असते. सुख मिळवण्यासाठी आपण आपला प्रत्येक क्षण वेचत असतो आणि आपापल्या परीने सुखी राहण्याचा मार्ग शोधत असतो. दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी नेहमीच आपल्या कलाकृतीतून जगण्याचे वेगवेगळे पदर उलगडले आहेत. चित्रपटगृहाबाहेर पडणाऱ्या प्रेक्षकाला सुख म्हणजे काय असतं याचं उत्तर देत सत्य घटनेवर प्रेरित अमेरिकेत घडणारी कथा सुख म्हणजे नक्की काय असतं’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. ‘लॉस एंजलिस मध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात येणार आहे.

अनेक महिन्यांतर अभिनेता अंकुश चौधरी या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. तो या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहे. तर अनेक जाहिरांतीतून झळकलेली झीनल कामदार नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून झीनल मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे.

अंकुश चौधरी, झीनल कामदार

‘वेगळ्या प्रयोगाचा तसेच नावाजेल्या निर्मिती संस्थेसोबत काम करण्याचा आनंद व्यक्त करतानाच ‘सुखातील समाधान की समाधानातलं सुख’ हे अधोरेखित करून दाखवणारा हा चित्रपट प्रत्येकाला निखळ आनंद देईल’, असा विश्वास चित्रपटाच्या लेखिका आणि दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी व्यक्त केला.  एक चांगली कथा मराठी प्रेक्षकांसाठी आणल्याचं समाधान निर्माते शिवकुमार यांनी व्यक्त केलं. लॉस एंजलिस स्थित ‘फाईव्ह डायमेंशन्स एंटरटेन्मेंट’ ही कंपनी या चित्रपटाचे लाईन प्रोड्यूसर म्हणून काम पहाणार आहेत.

तर चित्रपटाविषयी अंकूश चौधरी म्हणाला, ‘दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणे हे खरं सुख’ असं सांगत, हा चित्रपटही हे हसू आणि सुख तुम्हाला निश्चितच देईल. तर पदार्पणातच मान्यवरांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद अभिनेत्री झीनल कामदार हिने व्यक्त केला. सुख म्हणजे नक्की काय असतं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मे महिन्याच्या अखेरीस लॉस एंजलिस येथे सुरुवात होणार आहे.

 

First Published on: March 9, 2019 3:11 PM
Exit mobile version