सुमीतने ‘महानगरची’ बातमी केली शेअर; अशा आल्या प्रतिक्रिया

सुमीतने ‘महानगरची’ बातमी केली शेअर; अशा आल्या प्रतिक्रिया

सुमीत राघवनने शेअर केला अनुभव

नाशिकच्या महाकवी कालिदास नाट्यगृहात नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडलेला प्रकार ‘आपलं महानगर’ ने प्रेक्षकांसमोर आणला. नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांच्या त्रासामुळे सुमीत राघवनला प्रयोग थांबवावा लागला होता. या दरम्यान सुमीतने सविस्तर पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये सुमीत म्हणाला, नाटकाचा प्रयोग सुरू असताना वेगवेगळ्या लोकांचा मोबाईल वाजले. त्यात एका गृहस्थाने दरवाजा उघडून आत बाहेर केलं,तसं करण्याला अजिबात आक्षेप नाही पण ते दार दर वेळी आदळायचं आणि मोठा आवाज व्हायचा, पुढे एक वयस्कर बाई दुस-या बाईला “अहो हळू बोला” असं बोलली,त्यावर‌ ती बाई दाराच्या बाहेर जाऊन बोलू लागली आणि ते बोलणं स्टेजवर एकू येत होतं आणि शेवटी एका पहिल्या रांगेतील प्रेक्षकाचा फोन वाजला आणि मी चिडून नाटक बंद केलं.
या दरम्यान स्वानंदी टिकेकर आणि सुमीत स्टेजवर होते. नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि एका प्रेक्षकाचा फोन वाजला. सुमीतने प्रयोग थांबवून त्या व्यक्तीकडे बघितले तर त्याने हाताने इशारा करत “तुमचं चालू द्या” असं म्हटलं.

या सगळ्यावर सुमीत राघवनने राग व्यक्त केला आहे. तिकिट काढलं म्हणजे तुम्ही विकत घेतलं का आम्हाला? का म्हणून करावं‌ आम्ही नाटक? हा अपमान करून घेण्याकरता? असा सवाल सुमीतने विचारला आहे. पु़ढे सुमीत म्हणतो, एकीकडे नाट्यगृहांची दुरावस्था आहेच,तशा बकाल नाट्यगृहात काम करा वर आता प्रेक्षकांकडून अप्रत्यक्षरित्या असा अपमान सहन करा. अशा तीव्र शब्दात सुमीतने राग व्यक्त केला आहे.

सुमीतच्या या पोस्टवर कमेंटसचा पाऊस पडला आहे. सुमीत राघवन यांनी नाटक बंद करून योग्य निर्णय घेतला, अशा प्रेक्षकांना धडा शिकवलाच पाहिजे अशा अनेक प्रतिक्रिया सुमीतच्या पोस्टवर येत आहेत. त्याचप्रमाणे अनेक प्रेक्षकांनी नाटकादरम्यान त्यांना आलेले वाईट अनुभवही शेअर केले आहेत.

First Published on: June 4, 2019 3:11 PM
Exit mobile version