सनीचा ‘बायोपिक’ नव्या वादात !

सनीचा ‘बायोपिक’ नव्या वादात !

सनी लिओनी (प्रातिनिधिक फोटो)

सनी लिओनने आजवर बॉलीवूडमध्ये आपले अधिराज्य गाजवले आहे. सध्या सगळीकडे चर्चा आहे ती सनी लिओनच्या बायोपिकची. हा बायोपिक एक वेब सिरीज असून, ‘करणजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन’ असं या सिरीजचं नाव आहे. एका पॉर्न स्टारपासून ते अभिनेत्रीपर्यंतचा सनीचा प्रवास हा थक्क करणारा आहे. तिच्या याच प्रवासातील न उलगडलेली गुपितं या बायोपिकच्या निमित्ताने लोकांसमोर येणार आहेत. नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला चाहत्यांची तुफान पसंती मिळत असली, तरी ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच कोणत्या ना कोणत्या वादाला तोंड फुटत आहे. आता पुन्हा एकदा सनी लिओनचा बायोपिक एका नव्या वादामध्ये सापडला आहे. सोशल मीडियावर हा वाद जोरदार रंगतो आहे. त्यामुळे सनीचा बायोपिक रिलीज होण्याआधीच अनेक अडथळे येत असल्याचं म्हणत, चाहते आपली नराजी व्यक्त करत आहेत.

‘कौर’ नाव हटवा

सनीच्या बायोपिकचं नाव ‘करणजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन’ असं आहे. या नावावरुनच आता नवा वाद निर्माण झाला आहे. सिनेमाच्या नावामधून ‘कौर’ हे नाव हटवण्याची मागणी केली जात आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे (एसजीपीसी) प्रवक्ता दिलजीत सिंह बेदी यांनी हा आक्षेप नोंदवला आहे. सिनेमाच्या शिर्षकातून ‘करणजीत कौर’  हे नाव काढून टाकण्याची माणगी बेदी यांनी केली आहे. स्वत:चा धर्म बदललेल्या सनी लिओनला ‘कौर’ नाव वापरण्याचा हक्क नसल्याचे बेदी यांनी म्हटले आहे. तसंच या बायोपिकला ‘कौर’ नाव देणं हे शिख समाजातील लोकांच्या भावना दुखावणारं कृत्य असल्याचं, बेदी यांचं म्हणणं आहे. यासंदर्भात ते प्रशासनाकडे तक्रार दाखल करणार असल्याचंही म्हटलं आहे. दरम्यान सनी लिओन किंवा बायोपिकच्या निर्मात्यांकडून याबाबत कोणतीच प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही.

असा आहे या बायोपिकचा ट्रेलर

ट्रेलरची सुरुवात सनी ग्रीन रुममध्ये एका मुलाखतीसाठी तयार होत आहे अशी दाखवण्यात आली आहे. ‘बॉलीवूडची अशी अभिनेत्री, जिच्यावर प्रेम करणारे जितके आहेत, तितकेच तिचा तिरस्कार करणारे आहेत’, अशीच या मुलाखतीमध्ये सनीची ओळखच अशी करून देण्यात आली आहे. सनीचा जन्म कॅनडामध्ये झाला. तिचं खरं नाव करणजीत कौर वोहरा आहे. या ट्रेलरमध्ये सनीच्या घरातील आर्थिक परिस्थितीमुळं पॉर्न इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी कसं पाऊल उचलावं लागलं हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.

First Published on: July 14, 2018 11:20 AM
Exit mobile version