छोटे ‘सूर वीर’ करणार बाप्पाचं जोरदार स्वागत!

छोटे ‘सूर वीर’ करणार बाप्पाचं जोरदार स्वागत!

सुर नवा ध्यास नवा

चौसष्ट कलेची देवता अशी ओळख असलेला लाडका गणराया लहान मुलांचा सर्वात आवडता देव! गणरायांच्या आगमनाचे या बालमित्रांना कायमच वेध लागलेले असतात. अनेकांसाठी तो आपला लाडका बाप्पा असतो तर काही जणांसाठी तो खास दोस्तही असतो. ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमातील छोट्या सूरविरांनाही वेध लागलेत या बाप्पाचे. या सगळ्या सूरवीरांनी मिळून गणेशाची स्थापना केली आहे. अतिशय दणक्यात गणरायांचं स्वागत केलं आहे. छोट्या कलाकारांच्या गायकीने आणि गणेश गीतांनी सजलेले हे गणपती विशेष भाग येत्या सोमवार, मंगळवार आणि बुधवारी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.

उत्कर्षने साकारली गणेश मूर्ती

 उत्कर्षने बनवली गणेश मूर्ती

आपल्या गाण्याने सर्वांची मने जिंकणारा नागपूरचा उत्कर्ष वानखेडे इतरही कलांमध्ये पारांगत आहे. तो एक उत्तम मूर्तिकार आहे. उत्कर्षचे आजोबा आणि वडील हे सुद्धा दरवर्षी स्वतःच शाडूच्या मातीची गणेश मूर्ती बनवतात. उत्कर्ष त्यांच्याकडूनच ही कला शिकला. त्यामुळे सूर नवा ध्यास नवासाठीही उत्कर्षने एक खास मूर्ती तयार केली. या कामात त्याला आपला मॉनिटर म्हणजेच हर्षद नायबळच्या वडिलांनी, अंगद नायबळ यांनी विशेष मदत केली. अंगद नायबळ सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच घरी गणपतीची मूर्ती तयार करतात. उत्कर्षने ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर बाकीच्या बच्चे कंपनीनेही उत्साह दाखवत इतर सजावटीची जबाबदारी उचलली आहे.

महेश काळे

महेश काळेंचा ‘सूर निरागस हो’चा नजराणा

आपल्या गायकीने केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात आपले चाहते ज्यांनी तयार केले असे गायक म्हणजे महेश काळे.महेश काळेंच्या सुरांची हीच अनुभूती या गणपती विशेष भागामधून प्रेक्षकांना येणार आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटामधील ‘सूर निरागस हो’ या गाण्यामधून त्यांनी गणरायाला सुरांजली वाहिली आहे.

छोट्या सूरवीरांनी आळवला गणेशभक्तीचा राग

सूर नवा ध्यास नवाचा हा गणपती विशेष भाग म्हणजे गणेश भक्तांसाठी खास मेजवानी असणार आहे. यात छोट्या सूरविरांनी एकाहून एक गणेशभक्ती गीते गायली. ज्यामध्ये सक्षम सोनावणेने ‘तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता’, उत्कर्ष वानखेडेने ‘तूच माझी आई देवा तूच माझा बाप’, चैतन्य देवडेने ‘देवा श्रीगणेशा’, आदी भरतीयाने ‘प्रथम तुला वंदितो’, अभिषेक कांबळेने ‘देवा तुझ्या दारी आलो’, साहिल पांढरेने ‘ओंकार स्वरुपा’ ही गाणी सादर केली. तर मुलींमध्ये अंशिका चोणकरने ‘उठा उठा हो सकळीक’, नेहा केणेने ‘तुज मागतो मी आता’, विश्वजा जाधवने ’रांजण गावाला गावाला’, स्वराली जाधवने ‘आधी गणाला रानी आणला’, मीरा निलाखेने तुझ्या कांतीसम, सृष्टी पगारेने ‘बंधू येईल माहेरी न्यायला’ ही गाणी सादर केली.

याशिवाय मॉनिटर हर्षदने या बालगणेश मंडळात काय धमाल उडवून दिली हे सुद्धा बघता येणारआहे. तेव्हा सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरचे हे गणपती विशेष भाग अजिबात चूकवू नका.

First Published on: September 14, 2018 10:25 PM
Exit mobile version