चित्रपटाच्या सेटवर सुषमा स्वराज यांनी दिला रितेशला आर्शिवाद!

चित्रपटाच्या सेटवर सुषमा स्वराज यांनी दिला रितेशला आर्शिवाद!

भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. स्वराज यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या या अचानक एक्झिटमुळे सगळ्यांनाच दुख: अनावर झाले आहे. अनेकजणांनी सोशलमिडीयाचा आधार घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. अभिनेता रितेश देशमुखही सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे भावूक झाला. त्यांने ट्वीटरवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. रितेश देशमुख याने सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

२००३ मध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची भूमिका असलेला ‘तुझे मेरी कसम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामध्ये रितेश आणि जेनेलिया या दोघांची मुख्य भूमिका होती. विशेष म्हणजे ज्यावेळी २००१ मध्ये या चित्रपटाचं रामोजी फिल्मसिटीमध्ये चित्रीकरण सुरु होतं. त्यावेळी सुषमा स्वराज यांनी या दोघांची भेट घेतली होती. या आठवणींना रितेशने ट्विटरच्या माध्यमातून उजाळा दिला असून एक पोस्ट शेअर केली आहे.

‘२००१ मध्ये माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या भेटीचा योग आला होता. त्या रामोजी फिल्मसिटीमध्ये आल्या होत्या. तिथे माझा आणि जेनेलियाचा पहिला चित्रपट ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होतं. यावेळी सुषमा स्वराज यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि आम्हाला यश मिळावं यासाठी प्रार्थना केली होती. त्यावेळी कलाविश्वात आम्ही नवीनच होतो. धन्यवाद सुषमा स्वराज मॅडम’, असं ट्विट रितेशने केलं आहे.

First Published on: August 7, 2019 11:59 AM
Exit mobile version