सेलिब्रिटीजही असुरक्षितच ! सुष्मिता सेनचा खुलासा, १५ वर्षीय मुलाने केला होता विनयभंग

सेलिब्रिटीजही असुरक्षितच ! सुष्मिता सेनचा खुलासा,  १५ वर्षीय मुलाने केला होता विनयभंग

मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेन

‘सहा महिन्यांपूर्वीची घटना आहे. मी एका पुरस्कार सोहळ्यात होते आणि पत्रकारांचा घोळका माझ्या आजूबाजूला होता. एका मुलाने विनयभंग केला आणि गर्दी असल्याने मी त्याला पकडू शकणार नाही असे त्याला वाटले. जेव्हा मी त्याचा हात पकडून त्याला पुढे खेचले तेव्हा मला धक्काच बसला. तो १५ वर्षांचा मुलगा होता. या घटनेबद्दल मी वाच्यता केली तर तुझे आयुष्यच संपेल, असे जेव्हा मी त्याला म्हणाली तेव्हा यापुढे असे कधीच कोणासोबत करणार नाही, असे बोलून त्याने माझी माफी मागितली.’

या धक्कादायक प्रकाराचा खुलासा मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेन हिने एका मुलाखतीत केला. एका कार्यक्रमात १५ वर्षीय मुलाकडून माझा विनयभंग झाल्याचे सुष्मिताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. सुरक्षारक्षक आणि प्रसारमाध्यमांच्या घोळक्यातही सेलिब्रिटीज सुरक्षित नाहीत, याबाबत तिने खंत व्यक्त केली.

बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षाच द्यावी…
सेलिब्रिटींना इतकी सुरक्षा असते, त्यांच्यासोबत कधीच काही घडू नाही शकतं, असे अनेकांना वाटते. पण ते खरे नसते. स्वत:च्या सुरक्षेसाठी मुलींनी, तरुणींनी काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. लैंगिक अत्याचार आणि बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षाच देण्यात यावी, असे सुष्मिता यावेळी म्हणाली.

‘मिस युनिव्हर्स ‘ची २४ वर्ष
२१ मे १९९४ रोजी सुष्मिता सेन हिने मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. या घटनेला काल २४ वर्ष पूर्ण झाली. त्या गोड क्षणांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सुष्मिताने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली. “अवघ्या १८ वर्षांच्या वयात मिस युनिव्हर्सची स्पर्धा जिंकली होती. आता माझे वय ४२ वर्ष आहे. आजही मी मिस (अविवाहीत) आहे. फक्त वर्ष सरतं गेली, त्याव्यतिरिक्त माझ्या आयुष्यात कोणताही बदल झालेला नाही. तुमच्या शुभेच्छा, गिफ्टस्, कार्ड्स आणि पत्रांसाठी आभारी आहे.”

First Published on: May 22, 2018 10:28 AM
Exit mobile version