पाकिस्तानी गायकांना T-Series आणि सलमानचा दणका

पाकिस्तानी गायकांना T-Series आणि सलमानचा दणका

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ पाकिस्तानी कलाकारांवर बहिष्कार टाकला जावा, अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे. तर दुसरीकडे ‘FM वाहिन्यांनी पाकिस्तानी गायकांच्या गाण्यांवर बंदी घालत रेडिओवर त्यांची गाणी वाजवू नयेत’, असा थेट इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर T-Series या म्युझिक कंपनीनेही पाकिस्तानी गायकांना जोरदार दणका दिला आहे. टी- सीरिजनं पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान आणि आतिफ अस्लम यांची गाणी युट्यूब चॅनेलवरून हटवून टाकली आहे. गेल्याच आठवड्यात मनसेच्या सिने विभागाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ‘पाकिस्तानी गायक किंवा कलाकारांना भारतात काम देऊ नये नाहीतर मनसे धडा शिकवेल’, असा इशारा दिला होता. त्यापाठोपाठ आता टी-सिरीजने फेमस पाकिस्तानी गायकांची गाणी युट्यूबवरुन हटवत हे मोठं पाऊल उचललं आहे. टी- सीरिज हे जगातील सर्वाधिक पाहिलं गेलेलं दुसऱ्या क्रमांकाचं युट्युब चॅनेल आहे.


वाचा: पाकिस्तानचं तुणतुणं वाजवू नका – मनसेचा इशारा

राहत फतेह अली खान आणि आतिफ अस्लम या दोन पाकिस्तानी गायकांनी टी सीरिजसाठी एकत्र येऊन गाणी गायली होती. मात्र, पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांविरोधात होत असलेल्या सर्व स्तरीय निषेधानंतर टी-सिरीज कंपनीने हा निर्णय घेतला आहे. नुकतंच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी टी-सिरीजने आतिफ अस्लम यांचं ‘बारिशें’ हे गाणं टी- सीरिजनं लाँच केलं होतं. पुलवामा हल्ल्यानंतर टी-सीरिज, सोनी म्यूजिक, वीनस, टिप्स यांसारख्या म्युझिक कंपन्यांना, ‘पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणं थांबवा’, असा इशारा मनसेने दिला होता.

सलमान खाननेही नाकारले गाणे

अभिनेता सलमान खाननेही त्याच्या होम प्रॉडक्शनच्या आगामी चित्रपटांतून पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम याचं गाणं हटवलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमानने ‘नोटबुक’ या त्याच्या आगामी चित्रपटांतून आतिफ अस्लमने गायलेलं गाणं हटवलं आहे. ‘नोटबुक’ या चित्रपटाचं दिग्दर्शन नितिन कक्कर करणार असून, या चित्रपटासाठी गायक आतिफ अस्लमच्या आवाजात एक गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे. मात्र, पाकिस्तानी कलाकारांना होणारा विरोध लक्षात घेता बहुधा सलमानने हे गाणं हटवल्याचा निर्णय घेतल्याचं समजत आहे.

First Published on: February 18, 2019 7:24 PM
Exit mobile version