‘इसमें तेरा घाटा’ला तुफान प्रतिसाद

‘इसमें तेरा घाटा’ला तुफान प्रतिसाद

गायक गजेंद्र वर्मा

प्रेक्षकांना कधी काय आवडेल हे अजिबात सांगता येत नाही. सध्या ‘इसमें तेरा घाटा’ हे गायक गजेंद्र वर्माचं गाणं तुफान गाजत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेलं हे ४ मिनिट २५ सेकंदाचं गाणं आतापर्यंत ९.६ कोटी लोकांपेक्षा अधिक लोकांनी युट्युबवर पाहिलं आहे. हे गाणं मे महिन्यात प्रदर्शित झालं होतं. मात्र अजूनही हे गाणं सोशल मीडियावर गाजत आहे. टीव्ही अभिनेत्री करिष्मा शर्मा आणि गायक गजेंद्र वर्मा या दोघांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. हे गाणं त्यातील असलेल्या अर्थ आणि चालीमुळं बरंच प्रसिद्ध झालं असून अजूनही तुफान प्रतिसाद मिळत आहे.

केवळ ह्रदयानं नाही तर, डोक्यानं पण विचार करा

एखाद्याकडून नकार मिळाल्यानंतरही रागानं काही करून घेण्यापेक्षा डोक्यानं विचार करून शांत बसणं किती गरजेचं आहे ही या गाण्याची थीम आहे. त्यामुळं प्रत्येक वेळी ह्रदयानं विचार करण्यापेक्षा डोक्यानं विचार करणंही गरजेचं आहे असं या गाण्यातून दर्शवण्यात आलं आहे. आयुष्यात व्यावहारिक होऊन जगणं गरजेचं असतं. स्वतःला कमी लेखण्यापेक्षा तू माझ्या आयुष्यात निघून जाणं हा तुझा तोटा आहे, हे सांगणारं गाणं प्रेक्षकांना सध्या भावतं आहे. गजेंद्र वर्माची याआधीदेखील काही गाणी सुपरहिट झाली आहेत. ‘एम्प्टीनेस’ या अल्बममधील ‘तूने मेरा जाना’ हे गाणंदेखील इतकं हिट झालं होतं की, आजही प्रेक्षकांना हे गाणं आवडतं. या गाण्यालादेखील दोन कोटीपेक्षा अधिक व्ह्यूज आहेत.

‘इसमें तेरा घाटा’चे म्युझिकल व्हिडिओ पण हिट

या गाण्याचे म्युझिकल बनवूनसुद्धा लोक सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. गाण्याच्या ओळी साधारण असल्या तरी प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहेत. त्यामुळं आपल्या आयुष्याशी निगडीत असणारा अर्थ काढून लोक या गाण्याशी जोडले जात आहेत. सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर हे गाणं प्रसिद्ध आहे.

First Published on: July 31, 2018 1:12 PM
Exit mobile version