लकी’ नक्की हिट होणार

लकी’ नक्की हिट होणार

Lucky movie

संजय जाधवने ‘दुनियादारी’, ‘चेकमेट’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ आदी हिट चित्रपट दिलेले आहेत. काही चित्रपट फारसे न चालल्याचीही नोंद आहे. ठरावीक कलाकारांना घेऊन चित्रपट केल्याचा ठपका त्याच्यावर लावला गेलेला आहे. त्यामुळे यंदा त्याचा ‘लकी’ हा नवा चित्रपट फ्रेश चेहर्‍यांना घेऊन ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. अभय महाजन, दिप्ती सती ही जोडी यात यानिमित्ताने चमकणार आहे. चित्रपट खर्‍या अर्थाने लकी ठरावा, प्रेक्षकांच्या आकर्षणाचा भाग व्हावा यासाठी संजयने यापूर्वीच्या चित्रपटात जे प्रयत्न केले ते याही चित्रपटात त्याने केलेले आहेत. ट्रेलर लाँच सोहळ्याला कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते. सर्वांनीच ‘लकी’ नक्की हिट होणार अशी आशा व्यक्त केली.

एकतर या चित्रपटाच्या निमित्ताने संजयने आपले वडील शांताराम यांच्या नावाचे ‘एस’ हे आद्याअक्षर आपल्या स्वत:च्या नावासोबत पडद्यावर दाखवणे सुरू केलेले आहे. या चित्रपटातील एक गीत बप्पी लहरी यांना गायला लावलेले आहे. योगायोग म्हणजे यंदा त्यांच्या कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. अभिनेते जितेंद्र यांचे ‘हिंमतवाला’ या चित्रपटातील गाणे ज्या पद्धतीने चित्रीत झाले तसे या चित्रपटातील एक गाणे चित्रीत झालेले आहे. ते एकप्रकारचे यादगार असल्याचे सांगून साक्षात जितेंद्र यांना या ट्रेलर लाँचच्या सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. त्यांचा चिरंजीव तुषार कपूर हाही त्यावेळी उपस्थित होता. ‘गोलमाल’ नावाने जेवढे म्हणून चित्रपट आले त्यात तुषार होता आणि त्यातील त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे नाव ‘लकी’ असे होते हाही योगायोग म्हणावा लागेल.

First Published on: January 18, 2019 5:05 AM
Exit mobile version