‘द माल्टीज फाल्कन’ काळ्या सिनेमाचा उदय

‘द माल्टीज फाल्कन’ काळ्या सिनेमाचा उदय

द माल्टीज फाल्कन

चित्रपटाचं नाव सुचवतं त्याप्रमाणे एक काळ्या रंगाचा (सोनं आणि रत्नांनी जडल्याचं मानलं जाणारा) फाल्कनचा पुतळा हा सदर चित्रपटातील महत्त्वाचा घटक आहे, किंबहुना त्यामुळेच तर सर्व काही घडत असतं. सॅम स्पेड (हम्प्री बोगार्ट) आणि माइल्स आर्चर (जेरोम कोवन) हे दोघे सॅन फ्रान्सिस्कोमधील खाजगी गुप्तहेर आहेत. सुरुवातीलाच रूथ वंडर्ली (मेरी अस्टर) ही त्यांची क्लायंट आपल्या बहिणीचा शोध घेण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवते. दुसर्‍या दिवशी ही कामगिरी करत असताना आर्चरचा खून झाल्याचं सॅमला कळतं.

मात्र रूथ मुळातच खोटं बोलत असते, नि ती कुणा बहिणीचा शोध घेण्यासाठी आलेली नसतेच. आता आर्चरच्या आणि आपल्या साथीदाराच्या मृत्यूमुळे घाबरलेली रूथ उर्फ ब्रिजिड सॅमकडे मदत मागते. त्याचा अजूनही तिच्यावर पूर्णतः विश्वास नसला तरी आर्चरच्या खुनाचा शोध आणि या ‘माल्टीज फाल्कन’ प्रकरणावर पडदा टाकणं त्याला गरजेचं वाटत असल्यानं त्याचाही यात समावेश होतो. हे झालं मूलभूत कथानक. पुढे त्यानुषंगाने अनेक ट्विस्ट्स येत राहतात, नवीन पात्रं आणि गुपितं समोर येत राहतात. पण चित्रपट एवढा सगळा गुंतागुंतीचा मामला असतानाही कथानकापेक्षा त्याच्या पात्रांच्या गडद छटा दाखवण्याबाबत, आणि त्यांच्या माध्यमातून गडद विश्व उभा करत तत्कालीन सिनेमापेक्षा वेगळ्या वाटा निवडण्यामुळे वेगळा ठरतो.

असं करताना सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्पेड या मुख्य पात्राचं ग्रे शेडेड असणं. ज्यामुळे तो तत्कालीन चित्रपटांमधील सोज्वळ नायकांहून वेगळा आणि एक माणूस म्हणून अधिक प्रभावी भासू लागतो. सगळं काही पचवण्याची क्षमता असल्याचं भासवत, प्रत्येक घटनेवर तितक्याच शांतपणे प्रतिक्रिया देणं त्याला अधिक किचकट बनवतं. आर्चर या आपल्या पार्टनरच्या पत्नीशी अफेयर सुरु आहे, पण म्हणून तो त्याच्या मृत्यूमुळे आनंदी होतो असं नाही. कसंही असलं तरी आपल्या पार्टनरचा खून झाला आहे, आणि आपल्याला काहीतरी करणं भाग आहे हे तो जाणतो. त्याची हीच विचारशैली आणि निर्णयक्षमता त्याला अभेद्य बनवते. सॅम हा धूर्त आहे, चतुर आहे, गडद छटा असलेला आहे. मात्र तरीही शेवटी तो नैतिकदृष्ट्या बरोबर आहे. भलेही सामाजिक दडपणामुळे का होईना, पण नैतिकदृष्ट्या बरोबर ते कृत्य करण्याचा निर्णय घेतोय हे महत्त्वाचं.

‘फिल्म न्वार’ चित्रपट चळवळ आणि स्पेडसारखे अँटी-हिरो हे महायुद्धानंतर अमेरिकन आदर्शवादाला गेलेला तडा आणि अमेरिकन समाजाची बिघडलेली घडी यांचा एकत्रित परिणाम होते. ज्यामुळे ते सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या एक प्रकारच्या निरसतेचं आणि निराशेचं प्रतीक होते. त्यामुळे पुढे जाऊन ‘ब्लॅक सिनेमा’ किंवा ‘फिल्म न्वार’ म्हणून उल्लेखल्या गेलेल्या समकालीन गडद छटा असणार्‍या चित्रपटांना काहीसे सरीयल स्वरूप प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त होते.

‘द माल्टीज फाल्कन’ सदर प्रकारातील सुरुवातीच्या काळातील, किंबहुना रॉजर इबर्टसारख्या समीक्षकांच्या मते ‘फिल्म न्वार’ चळवळीतील पहिला ठरून अनेक बाबतीत न्वार चळवळीला पाया प्राप्त करून देतो. ज्यात पोलीस अधिकारी, खाजगी गुप्तहेर आणि एकूणच सरकारी यंत्रणांमध्ये समावेश असलेल्या मानसिक, नैतिक द्वंद्वात अडकलेल्या अँटी-हिरोला मध्यवर्ती पात्र म्हणून समोर आणणं, आणि त्याच्या अनुषंगाने गुन्हेगारी जगताशी संबंधित गोष्टींचा केलेलं चित्रण अशा क्लासिक न्वार चित्रपटांमध्ये आढळणार्‍या बाबींचाही समावेश होतो.

‘द माल्टीज फाल्कन’ने केवळ एका चळवळीची पायाभरणीच केली असं नाही, तर हा चित्रपट हम्प्री बोगार्ट, सिडनी ग्रीनस्ट्रीट, पीटर लॉरे या अमेरिकन चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या अभिनेत्यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट ठरला. ग्रीनस्ट्रीटचं तर पदार्पणदेखील या चित्रपटाद्वारे झालं. दिग्दर्शक जॉन ह्युस्टनने स्टुडिओच्या मतांशी घेतलेली फारकत यात महत्त्वाची ठरली. तोही पुढे जाऊन चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा दिग्दर्शक बनला हे सांगणं न लगे. आता ‘द माल्टीज फाल्कन’ पाहण्यासाठी एवढी कारणं पुरेशी असावीत.

First Published on: December 1, 2018 5:37 AM
Exit mobile version