प्रमोद म्हणतो येऊ का

प्रमोद म्हणतो येऊ का

Dada Kondke

14 मार्च म्हणजे दादा कोंडके यांचा स्मृतीदिन हे चित्रपट शौकीनांना, चित्रपटाशी संबंधित असलेल्या कलाकारांना, तंत्रज्ञांना सांगायला नको. मराठी चित्रपट ठरावीक अशा साच्यातून चालला होता. विनोदी चित्रपटांची ज्यावेळी वाणवा होती, त्यावेळी दादांनी ‘सोंगाड्या’ चित्रपटाची निर्मिती करून प्रेक्षकांना खळखळून हसवले. इतकेच काय तर हिंदी चित्रपटातही त्यांनी आपला प्रभाव दाखवला. सलग सिल्व्हर ज्युबली चित्रपट देणारे ते एकमेव अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक होते. त्यांचा चित्रपट म्हणजे प्रथम वाद नंतर तडजोड न करता सुटका असे काहीसे ठरलेले होते. त्याला कारण म्हणजे एका शब्दात दडलेले दोन अर्थ. दादा ते पटवून सांगायचे अणि आपल्या चित्रपटाची सुटका करून घ्यायचे. त्यांची गाणी सहसा दूरदर्शनवर, आकाशवाणीवर फारशी ऐकवली जात नव्हती, म्हणून त्यांची लोकप्रियता कधी कमी झालेली नाही.

हमखास हिट चित्रपट देणारे निर्माते म्हणून त्यांची ख्याती होती. वास्तविक निर्माता, कलाकाराचे निधन झाल्यानंतर फारफारतर तीन ते चार वर्षे स्मृती जागवल्या जातात, परंतु दादा कोंडके हे एकमेव असे अभिनेते आहेत की रिअ‍ॅलिटी शोंनी ज्यांच्या गाण्यांचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. नंतरच्या काळात प्रती दादा कोंडके चित्रपटात कसे येतील हे अनेक दिग्दर्शकांनी पाहिले. पण कोणालाही दादा नावाची जागा घेता आलेली नाही. ई टीव्हीने त्यांच्या नावाने त्यावेळी स्पर्धा घेतली होतीआणि महाराष्ट्रातून अनेक दादा कोंडके स्पर्धेत सहभागी झाले होते. संतोष परब दादा कोंडके कुटुंबियांना सोबत घेऊन आजही त्यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करतो. शाहीर, लेखक, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता असा त्यांचा मुख्य प्रवास राहिलेला आहे. या क्षेत्रात योगदान देणार्‍या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.

डॉ. प्रमोद नलावडे यांना वैद्यकीय क्षेत्रापेक्षा कलाप्रांताची भुरळ अधिक पडलेली आहे. निर्माता, नृत्य कलाकार, वेशभूषाकार, मिमिक्री अशी काहीशी त्यांची ओळख आहे. सुरुवातीला अनेक चित्रपटांत, नाटकांत त्यांनी कामही केले; पण दादा कोंडके यांच्या सान्निध्यात काही कामाच्या निमित्ताने आल्यानंतर प्रती दादा कोंडके आपल्याला होता येईल का याचा त्यांनी सराव केला. अनेक प्रतिष्ठेच्या सोहळ्यात, स्पर्धेत साकारही केले. निर्माते, अभिनेते मुकेश खन्ना यांनी जेव्हा अर्धा गुंगू, अर्धा गोंद्या ही चित्रपट करायचा ठरवला त्यावेळी या चित्रपटात प्रेक्षकांचा लाडका प्रती दादा कोंडके यावा अशी त्यांची तीव्र इच्छा होती. भूमिकेला आवश्यक असणारे सर्व गुण प्रमोदमध्ये आहेत म्हटल्यानंतर ही भूमिका त्यांनी त्याला दिली होती. प्रमोदसाठी दादा कोंडके फक्त आदर्श नाहीत तर दादांवर त्यांची मोठी श्रद्धा आहे. 14 मार्च स्मृतीदिनाचे निमित्त घेऊन प्रमोद वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत असतो.

यंदा दाजी कट्ट्यावर संध्याकाळी 6.30 वाजता ‘दादा म्हणतो येऊ का’ या नावाने तो कार्यक्रम करणार आहे. प्रख्यात दिग्दर्शक, अभिनेते याकुब सईद आणि दादा कोंडके यांचे कुटुंब यावेळी उपस्थित राहणार आहे. दादा कोंडके म्हटल्यानंतर त्यांचे विनोद हे ठरलेले आहेत. तेव्हा प्रमोदने स्मृतीदिनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यापद्धतीने कार्यक्रम सादर करण्याचे ठरवलेले आहे. मॉरिशसमधील मराठी प्रेक्षकांसाठी मुलाखत वजा त्यांचे वेशभूषेसह संवाद असा काहीसा कार्यक्रम त्याने केला होता. दाजी कट्ट्यावरसुद्धा प्रेक्षकांना अपेक्षित दादा साकार केल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रश्नांनाही उत्तर देण्याची तयारी दाखवलेली आहे. दादांच्या स्मृतीदिनी आपल्याला प्रती दादा साकार करायला मिळत असल्याचा आनंद प्रमोदने व्यक्त केला आहे. साहित्य संघाच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे.

First Published on: March 13, 2019 4:44 AM
Exit mobile version