खोया खोया चाँद…

खोया खोया चाँद…

 

‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात, सख्या रे आवरही सावरही चांद रात…’ सुरेश भटांचं हे चांदणं मराठी रसिकांच्या मनांतून मावळलेलं नाही. ‘चंद्र चांदणे सरले आता, निरस जाहली जीवन गाथा…’ म्हणणार्‍या आशा भोसले आणि अजित कडकडेंना सजल नयनांतून पाझरणार्‍या याच शांताराम नांदगावकरांच्या नीळसर चंद्रानं भुरळ घातली. हे चंद्रगारुड मराठी मनात कायम घर करून राहिलं आहे.

हे सुरांनो चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
तिच्या विरहवेदनेतून उतरलेलं हे आर्जव चंद्राला कुसुमाग्रजांनी ‘ययाती देवयानी’च्या नाट्यगीतातून केलं होतं. विरहाचं हे चांदणं प्रत्येक पिढीनं मनांतल्या ढगाआड जपलं आहे. पुन्हा आशा भोसले यांच्याच आवाजात सरल्या काळातल्या आठवांची पुनव साजरी करणारा हा चंद्र साक्षीला मराठी रसिकांच्या मनांत कायमच प्रकाशमान असतो, इथं अमावस्या कधीच होत नाही. तर पाऊस, उन्हाळा, हिवाळा अशी ऋतुंची बंधनही या चंद्राला इथं नसतात.
चंद्र, चांदणं, चंद्रबिंब, चंद्र म्हणजे सखा, मित्र, मनातलं हितगुज समजणारा आणि आकाशातल्या निळ्या घरात चांदण्यांच्या घोळक्यात राहूनंही कुणाकडेही कागाळी न करणार्‍या चंद्रबिंबाचं गीतकार, कवी आणि रसिकमनांच्या खोल डोहात प्रतिबिंब न पडणं केवळ अशक्य. चंद्र कलेकलेनं बदलत असतो. त्याच्या आभा निराळ्या असतात. भाकरीच्या चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली… म्हणणार्‍या नारायण सुर्वेंना ‘शारद सुंदर चंदेरी रात्रीत’ल्या रोमँटीक चंद्रात पोटातली भूक दिसते. जब्बार पटेलांच्या ‘उंबरठा’ मध्ये ‘चांद मातला मातला, त्याला कशी आवरू…अंगी वणवा चेतला…’ या गाण्यात चंद्र, मन आणि देह या दोन्ही पातळीवरची घुसमट समोर आणतो. तर दिवसा बाळाला चिऊकाऊचा घास भरवणार्‍या आईच्या मदतीला लिंबोणीच्या झाडामागे लपलेला चांदोमामा येतो. चंद्र कधीच संपत नसतो, बदलत नसतो, कमी होत नसतो…हिंदी पडद्यालाही चंद्र कायम भुरळ पाडतो.

मोरा गोरा अंग लैले
मोहे शाम रंग दैदे
छुप जाऊंगी रात ही में
मोहे पी का संग दै दे                                                                                                                                  चंद्रासोबत असा लाडीक संवादवजा व्यवहार बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’मध्ये पडद्यावर नूतनने केला. चंद्राला शब्द रुप देणार्‍या गुलजार यांचं हे पहिलं गाणं. लता मंगेशकर यांच्या स्वरातील. याच गाण्यात पुढे निरागस चेहर्‍याची नूतन म्हणते. ढगाआडून हा कठोर चंद्र मला चोरून पाहतोय आणि माझ्या मनातल्या विरहवेदनेवर हा वैरी हसतोय..असा लटका राग नूतननं इथं व्यक्त केलाय.

बदली हटा के चंदा
छुपके से झाके चंदा
तोहे राहू लागे बैरी
मुस्काए जी जलाईके

‘धीरे धीरे चल चाँद गगन में…असं रफीसाहेब मान हलवत, डोळे मिचकावत, हेलकावे खात निर्जन शुभ्र चांदणं पडलेल्या रस्त्यानं चालणार्‍या देव आनंदच्या तोंडून म्हणतात तेव्हा रफींच्या आवाजातलं कानांत गोळा होणारं चांदणं आणखी शीतल होतं तेव्हा,

‘कही ढल न जाए रात
टूट ना जाए सपने…’

अशी प्रेमाचं स्वप्न बहरण्याआधीच मोडण्याची हूरहूर चंद्रचेहर्‍याची साधना लता मंगेशकर यांच्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट पडद्यावरून मांडते. साधनाच्याच ‘वो कौन थी’ मध्ये साधनाचा अनाकलनीय गूढ व्यक्तिरेखा चंद्राच्या पडद्यावरच्या अस्तित्वाने अधिकाधिक गडद होत जाते.

‘ये रात ये चाँदनी फीर कहाँ…
सुन जा दिल की दास्तां….’

हातात गिटार घेऊन नायिका गीता बालीकडे तक्रार करणारा ‘जाल’ मधला देव आनंद विस्मृतीत जाणारा नाही. चंद्रावर रागावलं जातं, त्याकडे तक्रार केली जाते. मनातली विरहवेदना त्याला विश्वासानं सांगितली जाते. संजय खानने ‘अब्दुल्ला’मध्ये पडद्यावर चंद्राला बोलतं केलं,‘मैने पुछा चाँद से के देखा है कही मेरे यारसा हँसी,’ यावर…‘चाँदने कहा चांदनी की कसम नही..नही,’ असं रफीसाहेबांच्या आवाजातून चंद्रानं दिलेलं उत्तर लक्षात राहतं. यात या रफीसाहेबांच्या आवाजामुळे हे चांदणं आणखीच मधाळ होतं. पुढे हाच प्रश्न पलक, बाग यांनाही रफीसाहेब विचारतात, मात्र त्यांचंही उत्तर तिच्यापेक्षा कुणीच सुंदर नाही, असं एकच असतं.

‘चाँद मेरा दिल..चांदनी हो तूम..
चांदसे है दूर, चांदनी कहा…’

रफीसाहेबांचा आठवणीत राहणार्‍या अनेक चंद्रांपैकी ‘हम किसेसी कम नही’ मधला चंद्र महत्त्वाचा आहे.

‘चंदा ओ चंदा…किसने चुराई तेरी मेरी निंदीया
जागे सारे रैना तेरे मेरे नैना’

लता आणि किशोर या दोघांनी हे गाणं ‘लाखों में एक’ ( १९७१) साठी गायलं. चंद्राशी संवाद साधण्यात मेहमूदचा किशोर की राधा सलुजांच्या लता मंगेशकर यापैकी कोण जास्त यशस्वी झालंय, हे ओळखणं कठीण आहे.
आयुष्याच्या एकाकीपणात चंद्र कायम सोबतीला असतो. ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नही…’हे गुलजारांचं ‘आँधी’ मधलं गाणं आपल्या ओळखीचं असतं. त्यात संजीव कुमार आणि सुचित्रा सेनमध्ये झालेल्या शाब्दीक संवादात हा चंद्र मागे सरलेल्या कित्येक दशकातल्या विरहाचा साक्षीदार असतो.‘ये जो चाँद है ना, ये दिन में नही निकलता…’असं संजीव म्हणतो तर सुचित्रा म्हणते, ‘…हां मगर बिच में अमावस आ जाती है…’ पुढे या संवादात चंद्र दोघांच्या १४ वर्षांच्या विरहाची अमावस्या शब्दांतून बोलती करतो. ‘चाँद चुराके लाया हूँ..चल बैठे चर्च के पिछे…’ संजीव कुमारनं शबानासाठी पडद्यावरच्या प्रसंगात चर्चच्या मागे आठवणींचा चंद्र नेलेला असतो. हा सिनेमा देवता नावाचा असतो.

 

मेरी आवारगीने मुझको आवारा बना डाला,’                                                                                                   दुनियेनं आवारा ठरवलेल्या ‘आझाद’ नावाचा या उपेक्षित अनिल कपूरच्या एकाकीपणाला ही गुलाम अलींनी गायलेली गझल पुरेपूर न्याय देते. शहरातल्या सडकेवर पावसाच्या पाण्यात पडलेलं एकाकी चंद्रबिंब या गझलेत वेदना देणारं ठरतं.  पडद्यावरचा काळ बदलत असतो; पण चंद्र तोच असतो, इथं आठवणींचा चंद्र कलेकलेनं बदलत नाही.

 

हिंदी पडद्यावरचं अवखळ चांदणं

ना ये चाँद होगा…(शर्त )
चाँद फिर निकला (पेइंग गेस्ट )
चौदवी का चाँद हो (चौदवी का चाँद)
ये चाँद सा रोशन चेहरा (कश्मीर की कली)
चाँद सी मेहबुबा हो मेरी कब (हिमालय की गोद में)
चाँद जैसे मुखडे पे बिंदीया सितारा (स्वामी)
चंदा रे चंदा रे (सपने)
चाँद ने कुछ कहा (दिल तो पागल है)
जाने कितनो दिनों के बाद गली में आज चांद निकला (जख्म)
चाँद छुपा बादल में ( हम दिल दे चुके सनम)
चंदा मामा सो गया ( मुन्नाभाई एमबीबीएस)
चाँद सिफारीश जो करता हमारी (फना)
पुरे चाँद की ये आधी रात है (राम लीला)

 

First Published on: August 2, 2018 8:00 AM
Exit mobile version