‘गुमनाम हैं कोई’ मानवी मनाचा भूलभूलैय्या

‘गुमनाम हैं कोई’ मानवी मनाचा भूलभूलैय्या

Gumnaam hai koi

मराठी रंगभूमीवर आलेल्या नाटकांचा मागोवा घेतला तर ऐतिहासिक, संगीत नाटके, पौराणिक नाटके मोठ्या प्रमाणात येऊन गेलेली आहेत. याही नाटकांची निर्मिती करणे तसे अवघड असते. पैसा खर्च केला म्हणजे अशा नाटकातून जे दाखवायचे आहे ते प्रत्यक्षात उतरेल याची खात्री देता येत नाही. तरीपण अशा विषयांवर नाटके आलेली आहेत. उत्कंठा वाढवणार्‍या, रहस्य निर्माण करणार्‍या नाटकाची सहसा कोणी निर्मिती करायला मागत नाही. त्यातूनही काही वर्षांतील रहस्यमयी नाटकांचा मागोवा घेतला तर ठरावीक अशाच नाटकांनी यश मिळवलेले आहे. ‘कोणीतरी आहे तिथं’ ते अगदी आताच्या ‘ओवी’ पर्यंतच्या नाटकांचा मागोवा घेतला तर रहस्यमयी नाटकांची अवस्था काय आहे याची कल्पना येते. अशा स्थितीत काही निर्माते आपल्या पद्धतीने नाटक रंगमंचावर आणत आहेत. ‘गुमनाम है कोई’ ही भद्रकाली नाट्य संस्थेची निर्मिती आहे. कविता कांबळी त्याच्या निर्मात्या आहेत तर प्रसाद कांबळी हे त्याचे सादरकर्ते आहेत. शिल्पा नवलकर हिने लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन मंगेश कदम याने केलेले आहे. पहिल्या प्रयत्नात खरा गुन्हेगार कोण याचा प्रेक्षक जेव्हा अंदाज बांधतात तेव्हाच नाटक खर्र्‍या अर्थाने फोल ठरलेले असते. परंतु यात प्रेक्षकांची शोधकवृत्ती वाढते, तेव्हा नाटक यशस्वी आहे याची पावती मिळते. ‘गुमनाम है कोई’ हे नाटक पावती मिळवणारे आहे. मानवी मनाचा भूलभूलैय्या यात अनुभवायला मिळतो.

ही कथा आहे रेवती नामक लेखिकेची. तिचा स्वत:चा असा वाचकवर्ग आहे. आपली प्रतिमा वाचकांत अजून उंचावली जावी यासाठी लेखनात, कादंबरीत कसं दिसायला हवं यासाठी तिची अनेक वर्षे धडपड आहे. कादंबरी वाचनीय होण्याच्यादृष्टीने ती त्यात गुंतलेली आहे. विशाखा ही त्यांच्या परिवारातील एक स्नेही आहे. तिला रेवतीच्या लेखनाबद्दल नेहमीच कुतूहल राहिलेले आहे. हे जरी खरे असले तरी ती आपली कथा चोरुन वाचत आहे, याचा धसका रेवतीने घेतलेला आहे. विशाखाचे रेवतीच्या पतीबरोबर मैत्रीचे नाते आहे. ते संपुष्टात आणण्याच्यादृष्टीने रेवती आपल्याबरोबर वागत असल्याचे विशाखा तर्कवितर्क लावत असते. यातून प्रश्न सुटण्यापेक्षा प्रत्येकाच्या मनात संशयात्मक गूढ निर्माण होईल अशा घटना गॅरेजमध्ये घडत असतात. रेवतीला कादंबरीतील यामिनी नामक नायिका प्रत्यक्षात दिसत असल्याचे सांगायला लागते. तिचे हे असे वागणे अनेकांच्यादृष्टीने विक्षिप्त आणि मनोरूग्ण असल्याची खात्री देत असले तरी घरातील सदस्यांना, स्नेहींना मोठ्या मनस्तापातून जावे लागते. शोध घेतल्यानंतर धक्का बसेल असे अनेक प्रसंग इथे घडायला लागल्याचे जाणवायला लागते. या धक्का तंत्रात पती, मुलगा, मैत्रिण असे सर्वजण सहभागी असतात. अशा या ‘गुमनाम है कोई’ या नाटकात नेमकं काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर हे नाटक अवश्य नजरेखालून घालायला हवे.

शिल्पा नवलकर ही या नाटकाची लेखिका आहे. तिचे अभिनंदनच करावे लागेल. कारण नाटक लिहिणार्‍या अनेक महिला आहेत, परंतु रहस्याच्या माध्यमातून हटके प्रयत्न करणार्‍या महिला लेखिका फार कमी आहेत. सामाजिक जाणीवेचे नाटक लिहिताना शिल्पाने रहस्यमयी नाटकात आपली लेखिकेची प्रतिमा दाखवून दिलेली आहे. अशा नाटकाला दिग्दर्शक, कलाकार, संगीतकार यांच्या इतकेच नेपथ्यही महत्त्वाचे असते. त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे रहस्यमयी नाटक सांगता येईल. दिग्दर्शक मंगेश कदम याने त्यातली उत्कंठा कायम ठेवून हे नाटक दिग्दर्शित केलेले आहे. शटर वर जाणे, कामिनीचे अनपेक्षीतपणे येणे, खुनाचा प्रयत्न करणे याच्यापलीकडे प्रेक्षक चकीत व्हावेत अशा आणखीन काही संकल्पना दिग्दर्शकाला लढवता आल्या असत्या. यात हे नाटक रहस्यमयी वाटावे यासाठी कलाकार, नेपथ्यकार यांनी घेतलेली मेहनत महत्त्वाची वाटते.

रेवतीची मुख्य व्यक्तिरेखा मधुरा वेलणकर हिने केलेली आहे. तिच्यासाठी ही वेगळीच भूमिका म्हणावी लागेल. पत्नी-आई-मैत्रिण यांचे एकत्रित दर्शन घडवताना अवस्थता, बिथरलेपणा आणि मनोरुग्णता या सार्‍या गोष्टी अभिनयातून दिसतील हे तिने पाहिलेले आहे. अंगद म्हसकर(मिलिंद), शैला काणेकर(माधवी), प्राजक्ता दातार(विशाखा), रोहित फाळके(सिद्ध) हे या कुटुंबाचे सदस्य आहेत. कळकळ तितकाच मनस्ताप हे अभिनयातून, देहबोलीतून व्यक्त होण्याच्यादृष्टीने भूमिकेत जी काळजी घ्यायला हवी ती या सर्व कलाकारांनी घेतलेली आहे. मधुराचा अभिनय, शिल्पाचे लेखन, प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य-प्रकाश ही या नाटकाची जमेची बाजू आहे.

First Published on: January 10, 2019 5:59 AM
Exit mobile version