‘या’ कलाकाराने सोडला ‘द कपिल शर्मा शो’

‘या’ कलाकाराने सोडला ‘द कपिल शर्मा शो’

सोनी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ हा नेहमीच लोकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या शोमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना अल्पावधीतच प्रसिद्धी मिळते. त्यामुळे असे अनेक कलाकार आहेत जे या शोमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असतात. पण या शोमध्ये काम करणाऱ्या कलाकारांमध्ये हा शो सोडण्याची संख्या देखील कमी नाही. आजवर अनेक नावाजलेल्या कलाकारांनी ‘द कपिल शर्मा शो’ची साथ सोडलेली आहे. नुकतेच अभिनेता कृष्णा अभिषेक याने या कार्यक्रमामधून माघार घेतली. त्यानंतर आता आणखी एका कलाकाराने हा शो सोडला असल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेता कृष्णा अभिषेक याने मानधनाच्या कारणामुळे हा शो सोडला होता. कृष्णा या शोच्या नव्या पर्वाच्या प्रोमोमध्ये दिसला होता. परंतु त्यानंतर त्याने मानधनाच्या कारणामुळे या शोला रामराम ठोकला. आता या शो मधील प्रसिद्ध कॉमेडियन कलाकार सिद्धार्थ सागरने देखील कपिल शर्मा शो सोडला आहे. सिद्धार्थ सागर याने या कार्यक्रमामध्ये सेल्फी मौसी, उस्ताद घरचोरदास, सागर पगलेटू आणि फनवीर सिंग असे पात्र साकारले होते. यातील ‘सेल्फी मौसी’ हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ सागरने कपिल शर्मा शोच्या निर्मात्यांकडे मानधन वाढवून मागितले होते. या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद देखील सुरु होते, अशी माहिती समोर आली आहे. सिद्धार्थला आपल्या मानधनात वाढ हवी होती, परंतु शोच्या निर्मात्यांनी मानधन वाढवण्यास नकार दिल्याने सिध्दार्थने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ सागर हा ‘द कपिल शर्मा शो’च्या चित्रीकरणासाठी मुंबईमध्ये शिफ्ट झाला होता. पण आता त्याने या शोला रामराम ठोकल्याने तो आता पुन्हा त्याच्या दिल्लीच्या घरी परतला असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – अनुष्का शर्मा आणि विराट कोहली मुंबई एअरपोर्टवर स्पॉट

याआधी प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता सुनील ग्रोवर, अली असगर, उपासना सिंग, चंदन प्रभाकर, कृष्णा अभिषेक, भारती सिंग यांनी देखील हा शो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोडलेला आहे. त्यामुळे अनेकदा कलाकारांच्या शो सोडण्यामुळे हा कार्यक्रम कायमच चर्चेचा विषय ठरला.

First Published on: February 2, 2023 4:10 PM
Exit mobile version