‘बॉली’वूडवर ‘टॉली’वूड भारी!

‘बॉली’वूडवर ‘टॉली’वूड भारी!
भारतात सर्वात जास्त लोकप्रिय समजली जाणारी चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलीवूड. हिंदी सिनेमांचा चाहता वर्ग हा देशापुरताच मर्यादित नव्हे तर जागतिक पातळीवर पाहायला मिळतो. मात्र सध्या बॉलीवूडला मागे टाकणारी चित्रपटसृष्टी ट्रेडिंगमध्ये आहे. ती म्हणजे टॉलीवूड, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी. युवावर्गाला सर्वाधिक आकर्षित करणाऱ्या या दाक्षिणात्य चित्रपटाचे क्रेज ही सध्याच्या सर्वत्र प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून टीव्हीवरील हिंदी सिनेमांच्या चॅनेल्सवरही टॉलीवूडचे चित्रपटच हिंदी डब करून दाखवले जात आहे. अर्थातच प्रेक्षकांचा टीआरपी या चित्रपटांना असल्यामुळे चॅनेल्समध्ये हे दाक्षिणात्य चित्रपट दाखवण्याची चढाओढ पाहायला मिळते. शिवाय सध्याच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही टॉलीवूड चित्रपटांचाच डंका वाजताना दिसतो आहे. दाक्षिणात्य पण हिंदी डब केलेल्या या सिनेमांनी बॉलीवूडचे मार्केट खाऊन टाकले आहे, असे म्हटल्यास वावग ठरणार नाही.
गेल्या दीड वर्षापासून देशात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे लोकांना घरी बसण्याशिवाय पर्याय नाही. अशावेळी मनोरंजनासाठी टीव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्म, यु ट्यूब, सोशल मीडिया आदींचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातही प्रेक्षकांनी हिंदीपेक्षा दाक्षिणात्य चित्रपट पाहण्यास पसंती दर्शवल्याचे दिसते. त्याला कारणही तसेच आहे. या चित्रपटातील अॅक्शन, भन्नाट डान्स स्टेप्स, कोणालाही थिरकायला लावतील असे म्युझिक आणि चित्रपटाची पटकथा यांनी प्रेक्षकांचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. युवापिढी तर आवर्जून टॉलीवूड सिनेमे पाहत असल्याचे दिसते. टीव्ही किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मसह अगदी युट्यूब किंवा चित्रपटांच्या अॅप्सवरही दाक्षिणात्य सिनेमे सर्वाधिक पाहिले जात असल्याचे दिसते.

सुपरस्टार्सचीही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये कमी नाही. एकापेक्षा एक सुपरस्टार आणि उत्तम अभिनय येणारे कलाकार या चित्रपटसृष्टीत आहे. सध्याच्या काळात विजय, महेश बाबू, अल्लू अर्जुन, सुर्या, राम चरण, प्रभास, यश, विक्रम यांच्यासह जुन्या काळापासून चालत आलेले नागार्जून, चिरंजिवी, कमल हसन, थलयवा रजनीकांत या अभिनेत्यांच्या सिनेमांचा मोठा चाहता वर्ग आहे. शिवाय अभिनेत्रींमध्येही अनुष्का शेट्टी, समन्था अक्कीनेनी, रश्मिका, प्रियामणी, श्रेया सरणा यांच्या सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सध्याच्या दर्जाहिन आणि पटकथा नसलेल्या हिंदी सिनेमांना दाक्षिणात्य चित्रपटांनी मागे टाकले आहे. मनोरंजनाकडे आकर्षिला जाणारा सर्वाधिक प्रेक्षकवर्ग हा युवापिढी असतो. या युथला दाक्षिणात्य चित्रपटांतील कथा, स्पेशल इफेक्ट, स्टंट, अॅक्शन, डान्स यांची भुरळ पडली आहे. कन्नड, तेलगू, तामिळ, मल्याळम या भाषा समजत नसल्यातरी हिंदीत डबींग केलेले हे दाक्षिणात्य सिनेमे आजच्या काळात ट्रेडिंगला आहेत.

हेही वाचा –

First Published on: June 2, 2021 12:45 AM
Exit mobile version