सर्वकाही सैनिकांसाठी

सर्वकाही सैनिकांसाठी

Vacuum Cleaner

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून भारतीय जवानांची हत्या केली. या दु:खातून भारतीय नागरिक अजून सावरलेला नाही. पाकिस्तानचा निषेध पाकिस्तान मुर्दाबाद असाच राग व्यक्त करणार्‍या आरोळ्या घुमत आहेत. आता पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने उभे रहावे हा जनमाणसाचा कौल आता पुढे येऊ लागला आहे. संवेदनशील, भावनिक मनाची माणसे वीरमरण आलेल्या सैनिकांच्या नातेवाईकांना धीर देण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही संघटना, संस्था आपल्यापरिने आर्थिकदृष्ठ्या मदतही करीत आहेत. सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणार्‍या कलाकारांनीसुद्धा या हल्ल्याचा निषेध करीत जाहीरपणे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करून आपले मत व्यक्त केले आहे.

मराठी नाट्यसृष्टीतल्या कलाकारांनी फक्त मत व्यक्त केलेले नाही तर प्रत्यक्ष कृती करण्याला महत्त्व दिलेले आहे. प्रेक्षकांना अभिवादन करताना सैनिकांच्या त्यागाचे, बलिदानाचेही स्मरण आता प्रत्येक प्रयोगाच्या सुरुवातीला होऊ लागले आहे. व्हॅक्यूमक्लिनर हे विनोदी नाटक सध्या रंगमंचावर सुरू आहे, पण प्रेक्षकांनी दखल घ्यावी अशी गंभीर कामगिरी या नाटकाच्या टीमने केली आहे. चिन्मय मांडलेकर लिखित, दिग्दर्शित या नाटकाची निर्मिती दिलीप जाधव, निवेदिता सराफ, संज्योत वैद्य, श्रीपाद पद्माकर यांनी केली आहे. या नाटकात अशोक सराफ, निर्मिती सावंत या सेलिब्रिटी कलाकारांचा सहभाग असला तरी नाटकाला होणार्‍या बुकिंगचा अंदाज लगेच लावता येत नाही. या पार्श्वभूमीवर या टीमने थिएटरचे भाडे, प्रवास खर्च वगळता संपूर्ण रक्कम हुतात्मा झालेल्या सैनिकांना दिली जाईल, असे या नाटकाच्या जाहिरातीत म्हटले होते.

प्रेक्षकांनी या प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्हॅक्यूमक्लिनरच्या टीमला आशादायी वाटावे अशी गोष्ट इथे घडली. या प्रयोगातून एक लाख वीस हजार ही रक्कम सैनिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे सुपुर्द केली आहे. नाटकाचे लेखक, दिग्दर्शक चिन्मयने त्यातही आणखीन एक मोठेपणा दाखवलेला आहे. तो म्हणजे नाटकाचे निमित्त जरी असले तरी ही रक्कम प्रेक्षकांच्या सहकार्याने प्राप्त झालेली आहे, त्यामुळे सर्व प्रेक्षकांच्यावतीने ही रक्कम केंद्र सरकारच्या सुपूर्द केलेली आहे. श्री आर्यादुर्गा क्रियेशन, अभिजित नाट्यसंस्था यांनीसुद्धा एक अभिनव प्रयोग करण्याचे ठरवले आहे.

आजवर या संस्थेने देशासाठी त्याग करणार्‍या क्रातिविरांच्या कथा नाट्य सादरीकरणात आणलेल्या आहेत. टिळक आणि आगरकर याशिवाय होय मी सावरकर बोलतोय या नाटकांचे प्रयोग ते आपल्या पद्धतीने सादर करीत आले आहेत. दिग्दर्शन आणि निर्मिती सुनिल जोशी याची आहे. २८ फेब्रुवारी ते २ मार्च या दरम्यान या नाटकाच्या तीन प्रयोगांचा खर्च वगळता होणारा फायदा पुलवामा येथे धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना दिला जाणार आहे. आकाश भडसावळे, संध्या म्हात्रे, सुनिल जोशी, बहार भीडे, सचिन घोडेस्वार, सुमित चौधरी, हर्षल सुर्यवंशी, तेजस जेऊरकर, गायत्री दीक्षित या नवकलाकारांबरोबर पद्मश्री नयना आपटे यासुद्धा सहभागी झाल्या आहेत.

First Published on: February 25, 2019 4:37 AM
Exit mobile version