‘उमराव जान’चा २० वर्षांनंतर धमाकेदार परफॉर्मन्स

‘उमराव जान’चा २० वर्षांनंतर धमाकेदार परफॉर्मन्स

अभिनेत्री रेखाची एक अदा

बॉलीवूडची ‘उमराव जान’ अर्थात रेखानं वीस वर्षांनंतर पुन्हा आपल्या नृत्याची जादू प्रेक्षकांवर केली आहे. बँकॉकमध्ये झालेल्या आयफा २०१८ च्या पुरस्कार सोहळ्यात सर्वात मोठं आकर्षण होतं ते रेखाचा परफॉर्मन्स. वयाच्या ६५ व्या वर्षीदेखील तितकीच नजाकत आणि त्याच अदांनी रेखानं उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना घायाळ केलं. मधुबालाचं ‘प्यार किया तो डरना क्या’ आणि ‘सलामे-ए-इश्क मेरी जा’ या सदाबहार गाण्यांवर रेखानं परफॉर्मन्स देत सर्वांचंच मन जिंकलं.

रेखाची अजूनही जादू कायम

थायलंडची राजधानी असणाऱ्या बँकॉकममध्ये १९ व्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी (आयफा) चा पुरस्कार सोहळा सियाम निरामित थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला. आयफाची सुरुवात ही बँकॉकमधूनच झाली होती. रेखाचा परफॉर्मन्स हे यावेळच्या सोहळ्याचं वैशिष्ट्य होतं. रेखा नक्की कोणत्या गाण्यावर परफॉर्म करणार याचीच चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये रंगली होती. रेखा व्यतिरिक्त रणबीर कपूर, वरूण धवन, अर्जुन कपूर, क्रिती सनॉन, बॉबी देओल, कार्तिक आर्यन यांनीदेखील स्टेज परफॉर्मन्स दिला. मात्र सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या त्या रेखाच्या परफॉर्मन्सवर. या परफॉर्मन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून रेखाची जादू अजूनही कमी झालेली नाही हेच यातून दिसत आहे.

इतर कोणी दिले परफॉर्मन्स?

रेखा व्यतिरिक्त रणबीर कपूरनं आपल्या हिट गाण्यांवर जबरदस्त परफॉर्मन्स दिला असून बॉलीवूडचा नवा ‘हार्टथ्रोब’ कार्तिक आर्यननंदेखील आपल्या परफॉर्मन्सनं प्रेक्षकांचं मन जिंकलं. तर बॉबी देओलनंदेखील पुन्हा एकदा सात वर्षांनी स्टेजवर परफॉर्मन्स दिला. या सोहळ्यांसाठी रितेश देशमुख आणि करण जोहरनं आपल्या नेहमीच्या अंदाजात निवेदन केलं.

First Published on: June 25, 2018 2:20 PM
Exit mobile version