‘हा’ नवा बायोपिक लवकरच…

‘हा’ नवा बायोपिक लवकरच…

बॉलीवूडने आजवर नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले आहेत. वेगेवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे बॉलीवूडपटांनी नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत बॉलीवूडमध्ये ‘बायोपिकची’ लाट आली आहे. प्रसिद्ध व्यक्तीमत्वांच्या जीवनावर आधारलेल्या या बायोपिक्सना प्रेक्षकांनीही पसंती दिली. नुकताच आलेला ‘संजू’ सिनेमा याचं उत्तम उदाहरण आहे. आता लवकरच एक नवा बायोपिक तुमत्या भेटीला येणार आहे. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नंदामुरी तारक रामराव अर्थात एन.टी. रामराव यांचा हा बायोपिक असेल. या चित्रपटात एन.टी. रामराव यांचं राजकीय आणि खासगी आयुष्य उलगडण्यात येणार आहे. बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन या बायोपिकमध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. बाहुबली फेम अभिनेता राणा डुगुबत्ती हा देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे.

‘विद्या’ची खास भूमिका

या चित्रपटात विद्या बालन रामराव यांच्या पत्नी बसवतारकम यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. यामुळे विद्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा तिला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. विद्याने आजवर नेहमीच आशयप्रधान चित्रपट केले आहेत. चित्रपट बॉक्सऑफिसवर हिट होवो अथवा फ्लॉप, विद्याने तिची भूमिका नेहमीच ताकदीने वठवली आहे. एखादं पात्रं उभं करताना तिने नेहमीच त्या भूमिकेच्या खोलात शिरुन, त्याचा संपूर्ण अभ्यास करुन अभिनय केला आहे. त्यामुळे या बायोपिकमधूनही विद्या तिच्या अभिनयाची छाप पाडेल हे नक्की.

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री- दिवंगत एन.टी.रामराव

दरम्यान या बायोपिकचं नाव आणि प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये. विशेष म्हणजे एन.टी.आर. यांचे सुपुत्र बालाकृष्णा हे चित्रपटामध्ये आपल्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत.

कोण होते एन.टी. रामराव?

एन.टी. रामराव हे सात वर्ष आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री होते. एन.टी.आर हे स्वत: चांगले अभिनेते होते. राजकारणात प्रवेश घेण्यापूर्वी त्यांनी चित्रपटांमधून अभिनय केला आहे. याशिवाय ते एक नावाजलेले चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकही होते. चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना एकूण ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. वैयक्तिक पातळीवरसुद्धा एन.टी.आर यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे.

एका सिनेमातील भूमिकेमध्ये- दिवंगत एन.टी.रामराव

बॉलीवूडचे हिट बायोपिक्स

First Published on: July 10, 2018 3:20 PM
Exit mobile version