विवाह सोहळा विस्तारतोय

विवाह सोहळा विस्तारतोय

Shruti & Kartik

प्रेक्षकांना टीव्हीसमोर बसवण्यासाठी वाहिन्यावाल्यांना जे दोन चार कार्यक्रम महत्त्वाचे वाटतात, त्यात रिऍलिटी शो ज्यात नृत्य, गायन, मिमिक्री यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. गुन्हेगारी प्रधान मालिका प्रेक्षकांकडून अधिक पाहिल्या जातात. त्यातूनही कौटुंबिक मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा मोठा आहे. जवळजवळ सर्वच वाहिन्यांवर त्याचे प्रस्थ वाढलेले आहे. कुटुंबासाठी आवश्यक असणारे वातावरण सर्वच मालिकात सारखेच असले तरी त्यातसुद्धा वेगवेगळ्या युक्त्या करुन तमाम प्रेक्षक आपल्याकडे कसा आकर्षित होईल हे मालिकावाले पहात असतात. त्यासाठी महाएपिसोड, दुसर्‍या मालिकेतील सेलिब्रिटी कलाकारांना निमंत्रित करणे या गोष्टी केल्या जातात. प्रत्यक्षात कुठल्याही कुटुंबात गाण्याने, नृत्याने एकोपा दिसत नाही. पण प्रेक्षक मात्र मालिकेतल्या कुटुंबात मात्र डोकवायला लागलेले आहेत. त्यातूनही बर्‍याच वाहिन्यावाल्यांना विवाह सोहळे, बाळाचे नामकरण या सारख्या गोष्टींना महत्त्व देण्याची गरज वाटायला लागलेली आहे.

कौटुंबीक मालिका म्हटली की आदर, स्नेह, जिव्हाळा या गोष्टी आल्याच पण त्याचबरोबर कटुता, राग, द्वेष हे कथासूत्रात कसे येतील हे पाहिले जाते. या सगळ्या गोष्टी करत असताना विवाहबाह्य संबंध, बुवाबाजी, वेळप्रसंगी खून, अत्याचार या गोष्टी लेखकाला मालिकेत आणाव्याच लागतात. त्यात आणखीन एक आवर्जून गोष्ट केली जाते ती म्हणजे विवाह सोहळा जो मालिकेत हमखास दाखवला जातो. हनिमून त्यासाठी महाराष्ट्राबाहेर शूटींग यासारख्या गोष्टी आपल्याला नवीन राहिलेल्या नाहीत. छोट्या पडद्यावरचा विवाह सोहळा विस्तारतोय असे म्हणण्याचे कारण म्हणजे नव्याने सुरु झालेल्या मराठी सोनी वाहिनीवर एक नव्हे दोन नव्हे तर सलग तीन दिवस विवाह सोहळा आणि त्यातील रितीरिवाज परंपरेने आणि सांस्कृतिक रचनेत सादर करण्याचे ठरवलेले आहे. असे रितीरीवाज सामान्य माणसाच्या वाट्याला येत नाहीत. एकाच दिवशी साखरपुडा, हळद, लग्न या गोष्टी उरकल्या जातात. याच वाहिनीवर ‘सारे तुझ्याचसाठी’ ही जी मालिका दाखवली जाते, त्यात प्रत्येक दिवशी हा सोहळा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. तशी लग्नपत्रिकाही तयार केलेली आहे. या मालिकेचा नायक कार्तिक याची पहिल्या दिवशी बॅचलर पार्टी, दुसर्‍या दिवशी मेहेंदीचा कार्यक्रम, तिसर्‍या दिवशी हळद आणि चौथ्या दिवशी लग्नसोहळ्याच्या माध्यमातून मनोमिलन. श्रृती कार्तिक यांचा हा लग्नसोहळा असणार आहे. एका अर्थाने बॉक्सिंग आणि संगीत अशा दोन कला जोपासणार्‍या जोडीचे हे लग्न आहे. तो शाही थाट वाटावा असा प्रयत्न वाहिनीकडून केला गेलेला आहे.

-नंदकुमार पाटील

First Published on: November 22, 2018 5:20 AM
Exit mobile version