चित्रपटासाठी सलीलला मिळाली परदेशी निर्मात्यांची साथ

चित्रपटासाठी सलीलला मिळाली परदेशी निर्मात्यांची साथ

डॉ सलील कुलकर्णी यांचे दिग्दर्शन असलेला मराठी चित्रपट ‘वेडिंगचा शिनेमा’बाबत अनेक रहस्ये एकेक करून उलगडत असताना आणखी एक नवीन व अभिमानास्पद बाब समोर आली आहे, ती चित्रपटाच्या निर्मात्यांबद्दल. या चित्रपटाची सह-निर्मिती करणाऱ्या ‘गेरुआ प्रोडक्शन्स’चे चारही संस्थापक हे परदेशी मराठी माणसे असून त्यांनी ही निर्मिती मराठीच्या प्रेमापोटी केली आहे. “अमेरिकेत राहूनही आमची मराठीवरील श्रद्धा कमी झालेली नाही, उलट ती वाढलीच आहे. मराठी भाषेसाठी आणि या भाषेतील कलेसाठी, संगीतासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती आणि त्यातूनच या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती झाली आहे.

गेरूआ प्रोडक्शन

सिएटलचे मोहित चिटणीस म्हणाले की, मुक्ता बर्वे, अलका कुबल, शिवाजी साटम, भाऊ कदम, प्रवीण तरडे, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, संकर्षण कऱ्हाडे, त्यागराज खाडीलकर, ऋचा इनामदार, शिवराज वायचळ अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट सर्वांसाठीच एक निखळ मनोरंजन करणारा अनुभव असेल याची आम्हाला खात्री आहे. “गेरुआ प्रॉडक्शन्सतर्फे पुढेही असेच उत्तम दर्जेदार चित्रपट करायला मिळावे अशी आमची मनापासून इच्छा आहे,”

बोस्टन येथे राहणाऱ्या अरुंधती दाते, बे एरियातील अनुप निमकर, न्यू जर्सी येथील अतुल आठवले आणि सिएटलचे मोहित चिटणीस यांनी गेरुआ प्रॉडक्शन्सची स्थापना केली आहे. डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या “बादरा  रे” या गाण्याची निर्मिती करण्याच्या निमित्ताने या चौघांनी दोन वर्षांपूर्वी ‘गेरुआ प्रॉडक्शन’ची स्थापना केली आणि कलानिर्मितीचा एक निखळ आनंददायी अनुभव मिळवला. त्याआधी हे सर्व आपापल्या शहरांमध्ये स्थानिक मराठी मंडळे, बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि इतर संस्थांच्या माध्यमातून मराठी संगीत, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि चित्रपट-नाटकांची आयोजने करत आले आहेत.

पारंपारिक रीतीरिवाजांपासून आधुनिक फॅशन-तऱ्हा आणि पद्धती यांचा मिलाफ आणि त्यातून भरपूर कौटुंबिक ‘वेडिंगचा शिनेमा’ १२ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये एका लग्नाची तयारी, त्यासाठी केले जाणारे प्री-वेडिंग चित्रीकरण, घरातील माणसांची नृत्याची तयारी, चालीरीतींवरील चर्चा या गोष्टी ट्रेलरमधून पुढे येतात.

या चित्रपटाची कथा सलील कुलकर्णी यांनी लिहिली आहे. सलील कुलकर्णी यांनी कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल.

First Published on: March 31, 2019 4:33 PM
Exit mobile version