प्रगल्भ, सशक्त वाय सो गंभीर

प्रगल्भ, सशक्त वाय सो गंभीर

why so gambhir

एकांकिका स्पर्धा म्हटली की अमोल भोरचे नाव आवर्जून घेतले जाते. हमखास बक्षीस मिळवणारा हा दिग्दर्शक असल्यामुळे त्याची बरीचशी नाटके ही व्यावसायिक रंगमंचावर आलेली आहेत. मनोरंजन, प्रबोधन हा त्याचा फॉर्म्युला असला तरी कल्पकता, नावीन्य ही त्याची आणखीन एक खासियत राहिलेली आहे. सामूहिक परिणाम साधणारी नाटके त्याने बर्‍याचवेळा सादर केलेली आहेत. ‘वाय सो गंभीर’ हे नाटक शीर्षकाप्रमाणे गंभीरच म्हणावे लागेल. दोन अंकात दोन कथा सादर केलेल्या आहेत. पहिल्या अंकात आयक्यू टेस्ट तर दुसर्‍या अंकात मासिक पाळीतील समस्या हा विषय घेतलेला आहे. नाटकात जे कलाकार काम करतात, तेच कलाकार या दोन्ही कथा सादर करतात. त्यासाठी नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, पात्रांची नावे ही तीच राहिलेली आहेत. एक वेगळी संकल्पना लढवून अमोल भोर आणि गिरीश दातार यांनी हे नाटक सादर केलेले आहे. नाटकाचा नायकच काव्य आणि संवाद यांचं मिश्रण असलेलं गीत प्रेक्षकांसमोर सादर करून कथेतील दुवा साधतो. नामावलीपूर्वी प्रेक्षकांना ज्या सूचना दिल्या जातात, त्यांचा अंतर्भाव या काव्यात आहे. प्रथम रंगमंचाच्या पडद्याबाहेर आणि नंतर सुसंवाद साधत असताना नायकाचे प्रत्यक्ष नाटकात सहभागी होणे हा वेगळा प्रयत्न नाटक काही वेगळे सांगणारे आहे यासाठी प्रेक्षकांची मानसिक तयारी करून घेते.

सौरभ गंभीर हा या नाटकाचा नायक आहे. मानसी ही त्याची पत्नी आहे. बहीण, आई, बाबा असा हा परिवार आहे. एकत्र वावरत असले तरी प्रत्येकाची स्वतंत्र अशी विचारसरणी आहे ज्यात बुद्धीचातुर्याचा विचार केला जातो. आपली श्रेष्ठता पटावी यासाठी साधलेला सुसंवाद विचारांची देवाणघेवाण करणारा असला तरी कोण हुशार हा प्रश्न अबाधित राहतो आणि मग आयक्यू टेस्ट करण्याची आवश्यकता वाटते. प्रज्ञा ही त्याविषयीचा प्रोजेक्ट तयार करत असते. ती घरातल्या सदस्यांना तशी कल्पना देऊन त्यांच्या आयक्यू टेस्ट घेते. प्रोजेक्टचा एक भाग म्हणून जो काही उच्चांक आहे त्यांची अदलाबदल केली तर व्यक्तीमध्ये काय बदल होईल हे जाणून घेण्याचा तिचा प्रयत्न असतो. नंतर ती तो उलगडून सांगत असली तरी अशा निर्णयामुळे दोन व्यक्तीत एकोपा निर्माण होतो हे तिच्या लक्षात येते. दुसर्‍या अंकातही असाच प्रयत्न झालेला आहे ज्याचा विषय मासिक पाळी हा आहे. या अवस्थेत घरातील सदस्यांनी प्रत्येक स्त्रीला सहकार्य करून समजून घ्यायलाच हवे, असे काही सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे.

अभिनेत्री म्हणून परिचयाची असलेली शैला काणेकर ही या नाटकाची सादरकर्ती आहे. गंभीर कुटुंब आणि त्यांच्या सानिध्यात आलेले मित्र, मैत्रिणी यांच्यामधील ही कथा आहे. सौरभची व्यक्तीरेखा आरोह वेलणकर याने केलेली आहे. सेक्स आणि बुद्धीचातुर्य याविषयी जबरदस्त आकर्षण, त्यातला उतावीळपणा भूमिकेत दिसेल असे त्याने पाहिलेले आहे. पल्लवी पाटील हिने मानसीची व्यक्तीरेखा साकार केलेली आहे. ती नव्या विचारसरणीची आहे. प्रेयसी, पत्नी यांचं नातं व्यक्त करत असताना आपलं श्रेष्ठत्व ती पहिल्या अंकात व्यक्त करते, तर दुसर्‍या अंकात पतीने मासिक पाळी दरम्यान आपल्याला समजून घ्यावे असा तिचा प्रयत्न असतो. दोन्ही अंकात भूमिकेची गरज ही वेगळी असल्यामुळे तिचे दोन पैलू यानिमित्ताने प्रेक्षकांना पहायला मिळतात. तिच्यातली समर्थ अभिनेत्री यानिमित्ताने दिसायला लागते. नाटक कौटुंबिक आहे. त्यातून काही सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. आरोह, पल्लवी यांच्यासोबत प्रदीप जोशी, अन्वीता फलटणकर, अपूर्वा कुलकर्णी, रसिका वाखारकर, आशिष दातीर यांचा कलाकार म्हणून सहभाग आहे. अजय पुजारे(नेपथ्य), सुहित अभ्यंकर(संगीत), रविंद्र करमरकर(प्रकाश योजना), अपर्णा गुराम, प्रियंका गावकर(वेशभूषा) यांनी नाटक प्रभावी होण्याच्यादृष्टीने केलेले प्रयत्न कथानकाला साजेल असे आहेत.

ही तर स्त्रियांची समस्या
ठरावीक वय उलटल्यानंतर प्रत्येक स्त्रीला ज्या समस्येला सामोरे जावे लागते तो विषय आहे मासिक पाळी, ज्यावर उघडपणे बोलायला कोणीही मागत नाही. आई सज्ञान असेल तर ती आपल्या मुलीला या समस्येची कल्पना देते. या काळात स्त्रियांना अनेक वेदनांना सामोरे जावे लागते. पण, पुरुषी वर्चस्वापुढे वेदना सहन करून त्याच्या इच्छांची पूर्तता करावी लागते. हा ही त्रास सहन न होणारा असतो. नेमकं याच विषयावर उघडपणे लेखक, दिग्दर्शकाने नाटकातील पात्रांत संवाद घडवून तो विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेला आहे. आरोह आणि पल्लवी यांना यासाठी दाद द्यावी लागेल. पती-पत्नीतील नाते संवादाबरोबर कृतीतूनही व्यक्त होण्यासाठी जो मोकळा वावर हवा असतो तो त्यांनी न संकोचता इथे उघडपणे केलेला आहे, ज्यामुळे जी वस्तुस्थिती आहे ती या दोघांच्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.

First Published on: January 31, 2019 5:16 AM
Exit mobile version