महिला दिन अष्टनायिका

महिला दिन अष्टनायिका

Women's Day

प्रा. नीता खानविलकर, कीर्तनकार
नीता खानविलकर ही व्यवसायाने प्राध्यापिका आहेत. तळागाळातील गावपातळीवरील महिलांशी सुसंवाद साधता यावा, त्यांच्या समस्या जाणून घेता याव्यात यादृष्टीने कीर्तनकला ही तिला जवळची वाटलेली आहे. ती शास्त्रशुद्ध पद्धतीने सादर केली तर त्याचा प्रभाव पडू शकतो या एका हेतूने नागपूरच्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातून तिने पदवी संपादन केलेली आहे. विशारद, अलंकार अशा पदवी संपादन केल्यानंतर कीर्तन मधुकर या पदवीसाठी ती अभ्यास करत आहे. युवकांसाठी कार्य करणार्‍या अनेक संघटनांचे नेतृत्त्व तिने केलेले आहे. त्याविषयीचे स्तंभलेखन अनेक वर्तमानपत्रात तिने केलेले आहे. मुलांमध्ये प्रबोधनाचे कार्य व्हावे यासाठी स्नेहसंमेलन, कॅम्प, शिबिर, कार्यशाळा यांच्यासाठी कीर्तनाचे कार्यक्रम ती करत असते.

माणूस सुशिक्षित होत आहेत म्हटल्यानंतर महिलांच्या समस्या या कमी व्हायला हव्यात. शासनाने महिलांच्या गरजा ओळखून उपक्रम राबविले पाहिजेत. अंगणवाडीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. या महिला जर आपले कुटुंब अलिप्त ठेवून मुलांच्या जडणघडणीसाठी दिवसभर राबतात, तर त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. फक्त समानतेची भाषा बोलली जाते, पण प्रत्यक्षात स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. मान-सन्मान हा फक्त एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो व्यापक व्हायला पाहिजे. बचत गटाला प्रेरणा दिल्याने छान कार्य होऊ शकते. बरेचसे बचत गट दुर्गम भागात जाऊन मुलांना शिकवतातच शिवाय पोषक आहारही खाऊ घालतात.

विद्या सदाफुले, लावणी नृत्यांगणा
विद्या सदाफुले-वाघमारे ही वाद्यवृंदाच्या क्षेत्रात गेली पंधरा वर्षे कार्यरत आहे. लावणी नृत्यांगणा म्हणून तिच्या नावाला वलय आहे. यानिमित्ताने अमेरिका, साऊथ आफ्रिका इथे महाराष्ट्रातल्या लावणीचे दर्शन घडवणे तिला शक्य झालेले आहे. अशोक हांडे यांच्यावतीने जेवढ्या म्हणून कार्यक्रमांची निर्मिती केली जाते, ज्यात लावणीचा संबंध येतो त्या बर्‍याचशा कार्यक्रमात विद्याचा सहभाग राहिलेला आहे. मी मराठी, प्रथम कलामंच, महाराष्ट्राची लोकधारा अशा कितीतरी कार्यक्रमात ती सातत्याने दिसलेली आहे. सुभाष नकाशे यांच्यावतीने जे अनेक कार्यक्रम सादर केले जातात, त्यातसुद्धा विद्याचा सहभाग राहिलेला आहे. लावणीचे अनेक प्रकार आहेत, त्याविषयीचा तिचा स्वत:चा अभ्यास आहे.

लावणीला राजदरबारात मानाचे स्थान मिळालेले आहे. परंपरेतून आलेली ही कला बरेचजण आपल्या पद्धतीने जपत आहेत, परंतु जनमाणसात तिला जी प्रतिष्ठा लाभायला हवी ती अद्याप लाभलेली नाही. लावणी म्हणजे शृंगार असे जरी म्हटले गेले असले तरी प्रेक्षक त्याचा गैर अर्थ लावतात. पैसे उधळणे, स्पर्शाचा आग्रह धरणे या गोष्टी आजही होताना दिसतात. ग्रामीण भागात कार्यक्रम करायचा झाला तर स्त्री कलाकारांमध्ये प्रथम भीतीचे वातावरण निर्माण होते. पोलीस यंत्रणा स्त्रियांच्या बाजूने कार्य करते, पण महिलांनीही काळजी घेऊन समाजात वावरायला हवे. त्यासाठी आवश्यक असणारे पुरेसे आत्मबळ तिने स्वत:च मिळवायला हवे. यासाठी घरच्यांचे सहकार्य जर असेल तर मुलगी कलेच्या प्रांतात अपेक्षित कार्य करू शकते.

डॉ. मृण्मयी भजक,निवेदिका
डॉ. मृण्मयी भजक ही दूरदर्शनची वृत्तनिवेदिका आहे. शिवाय सूत्रसंचलन, निवेदन याही जबाबदार्‍या पार पाडते. अनेक मुलाखती प्रभावीपणे तिने घेतलेल्या आहेत. मराठी, हिंदीबरोबर इंग्रजी भाषेवरही तिचे प्रभूत्व आहे. त्यामुळे आवश्यक तिथे प्रेक्षक बघून दोन्ही भाषांचा निवेदनात प्रयोग करत असते. अनेक लघुपटांना तिने आवाज दिलेला आहे. मानसिक आरोग्य, ताणतणाव याविषयी महिलांना मार्गदर्शन करत असते. महिलांच्या समस्या जानून घेण्यासाठी थेट त्यांच्या संपर्कात राहते. परिसंवाद, शिबिराचे आयोजन करून सुसंवाद कसा साधायचा, आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी योगाचेही प्रशिक्षण ती देत असते.

महिला दिनी ज्या पद्धतीने महिलांचा विचार होतो, तसा विचार वर्षभर करावा असे मी म्हणणार नाही. त्याचे कारण म्हणजे 8 मार्च हा महिलांसाठी सेलिब्रेशनचा दिवस असतो. त्याचे महत्त्व कमी होऊ नये, असे मला प्रामाणिकपणे वाटते, पण या महिला दिनाचे निमित्त घेऊन अनेक कंपन्या जे मार्केटींग करतात, त्याला आळा घालायला पाहिजे. सौंदर्य प्रसाधने, अलंकार यासाठी दिल्या गेलेल्या ऑफर म्हणजे महिला दिन नव्हे. जग पुष्कळ मोठे आहे. त्या पातळीवर महिलांच्या बाबतीत ज्या गोष्टी घडतात, त्यांचा पुरेसा विचार वर्षभर व्हायला हवा. त्यांच्या हक्कांची पूर्तता झाली की नाही याचा विचार वर्षभर होणे गरजेचे आहे. प्रत्येक महिला ही दोन वेळा जन्म घेत असते. एक जन्म झाला म्हणून आणि दुसरे म्हणजे आपण स्त्री आहोत हे कळायला लागल्यानंतर.

सुलभा जाधव,लोककलावती
सुलभा जाधव हिचा नाटक, चित्रपट, मालिका या सर्वच क्षेत्रात वावर असला तरी लोकनाट्य हा तिच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. विनोदी पद्धतीने आणि हजरजबाबीपणे मोकळी-ढाकळी गावरान भाषा, अभिनय आणि देहबोली यांचा समन्वय साधून ती भूमिका झकास साकार करते. उचलली जीभ, मर्दानी झाशीची राणी, बायकोचो बैल, गुरू, कोंबडीशिवाय उरुस, नवरा हिंदुस्थानी अशा अनेक कार्यक्रमात तिने विविध भूमिका निभावलेल्या आहेत. सोनी सब या वाहिनीसाठी जॉनी लिव्हर अभिनीत पार्टनर या मालिकेमध्ये जी महिला हवालदार दाखवलेली आहे, त्या भूमिकेसाठी अनेक महिलांच्या ऑडिशन घेण्यात आल्या होत्या. त्या सगळ्यांमधून सुलभाची निवड झाली आणि तिने आपली निवड सार्थकी ठरवली. लोककलावती म्हणून तिच्या नावाला वलय आहे.

आम्हा कलाकारांना महिला दिन म्हणून वेगळी वागणूक मिळते आहे, असे नाही. दररोज ज्या अनुभवातून जावे लागते त्याच अनुभवातून महिला दिनीही जावे लागते. बरेचसे कार्यक्रम हे रात्री उशिरा संपतात. त्यावेळी माझ्याबरोबर अन्य कलावतींना परतीचा प्रवास करणे तसे कठीणच जाते. फार वर्षांपूर्वी हार्बर, सेंट्रल लाईनवर प्रवास करत असताना रात्री डब्यात हवालदार पहायला मिळत होते. वेस्टर्न लाईनवर मात्र तसे नव्हते. महिलांनी एकत्र येऊन आवाज उठवला तेव्हा कुठे या लाईनवरही पोलीस हवालदार असायला हवा असे वाटायला लागले. हे सांगण्याचे कारण म्हणजे सरकारने आंदोलन, मोर्चे याचा विचार न करता आवश्यक तिथे सुरक्षा व्यवस्था पुरवायला हवी. महिलांना सन्मानाची वागणूक द्या त्यामुळे त्यांची भीती नाहीशी होईल.

तृप्ती जाधव,अभिनेत्री
तृप्ती जाधव ही एकांकिका चळवळीतून पुढे आलेली अभिनेत्री आहे. नाटक, मालिकेत स्थिर व्हायचे असेल तर एकांकिका चळवळीतले योगदान महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊन अनेक हिंदी, मराठी एकांकिकांमध्ये काम करून तिने पारितोषिके प्राप्त केलेली आहेत. झी गौरवच्या संभाव्य यादीत चाहुल उद्याची या नाटकासाठी सहअभिनेत्री म्हणून तिच्या नावाचा समावेश झाला होता. हिंदी नाटकासाठी शासनाच्यावतीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिची निवड झाली होती. कालचक्र या नाटकात तिचा सहभाग होता. मी मराठी वाहिनीच्या मुंबईची सुकन्या या प्रोमोसाठी तिने मुख्य भूमिका निभावली होती. नकळत सारे घडले या स्टार प्रवाहच्या मालिकेत तिचा सहभाग होता. आरण्यक हे तिचे नाटक व्यावसायिक रंगमंचावर सुरू आहे.

मुला-मुलींच्या वागण्यात मोकळेपणा आलेला आहे. घरचे सदस्यसुद्धा ही काळाची गरज आहे म्हणताना सहाकार्य करत आहेत, तरी भीतीही काही कमी झालेली नाही. सोशल नेटवर्कचा फायदा घेऊन जी बदनामी केली जाते, त्याला जबाबदार बर्‍याचवेळा मुलीलाच धरलेले आहे, त्यामुळे प्रथम मुलींनी भीतीने वावरणे टाळले पाहिजे. तिची भीती नाहीशी होणे म्हणजेच स्वतंत्रपणे वागणे हे तिला जाणवायला लागेल. स्वच्छतेच्या बाबतीत जागृती होत आहे, परंतु महिलांची जी स्वच्छतागृहे आहेत ती अधिक स्वच्छ व सुरक्षित होणे गरजेचे आहे. महिलांना जे विकार जडतात, त्याला सार्वजनिक स्वच्छतागृहही काही प्रमाणात कारणीभूत आहेत.

नम्रता वेस्वीकर,गायिका
नम्रता आता जरी व्यावसायिक रंगमंचावर दिसत असली तरी गायिका म्हणून तिची सुरुवात ही छोट्या वाद्यवृंदातून झाली. जो काही रियाज केला तो बैठकीच्या कार्यक्रमांतून दाखवला आणि यातून करिअर करावे, असा तिचा प्रवास सुरू झाला. मराठी वाद्यवृंद, हिंदी ऑर्केस्ट्रा आणि लोकसंगीत, लोकनृत्य यांच्यासाठी हमखास गायन करणारी गायिका म्हणून नम्रताचे नाव घेतले जाते. गेल्या वीस वर्षांत अनके वाद्यवृंदांसाठी तिने गायन केले असले तरी लावणी गावी तर ती नम्रताने. मराठी पाऊल पडते पुढे, मुजरा लावणीचा यासाठी ती सातत्याने वेळ देत आलेली आहे. आनंद शिंदे यांच्याबरोबर तिला गाण्याची संधी मिळालेली आहे. हिंदी ऑर्केस्ट्रामध्ये इला अरुण, लता मंगेशकर यांनी गायिलेले मोरनी हे गीत हमखास वन्स मोअर म्हणून तिला गावे लागते.

महिला दिन आमच्यासाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा असला तरी त्याचे महत्त्व एका दिवसापुरते मर्यादित राहता कामा नये. महिलांचा सन्मान म्हणजे त्यांच्यासाठी कार्यक्रम करायलाच पाहिजेत असे नाही. सन्मानाने वागणूक जरी दिली तरी महिला कलाकारांना त्याचा आनंद होईल. तमाशा हा परंपरेने आलेला लोककला प्रकार आहे, पण काही भागांत या कलेचा आजही तिरस्कार केला जातो. गायिका म्हणून वावरत असताना हे म्हणजे तमाशातले कलाकार असे हिणवले जाते. बायकाच बायकांवर दगड मारतात याचे वाईट वाटते. लोककलेचा अजून चांगल्या प्रकारे प्रचार व्हावा, असे वाटते. रात्रीचा प्रवास करताना रिक्षात किंवा टॅक्सीत बसायचे की नाही हा विचार मनात प्रथम येतो. तो नाहीसा झाला म्हणजे स्त्रिया सुरक्षित आहेत, असे वाटू लागेल.

देवयानी मोहोळ,ढोलकीपटू
देवयानी मोहोळ-मोरे. महाराष्ट्राची ढोलकीपटू म्हणून तिची ओळख आहे. सह्याद्री वाहिनीच्यावतीने दिला जाणारा हिरकणी पुरस्कार तिला दिला गेलेला आहे. ती फक्त ढोलकीपटू नाही तर निर्मातीसुद्धा आहे. माझी रमाबाई, देवयानी रॉक्सबॅण्ड या दोन कार्यक्रमांची निर्मिती तिने केलेली आहे. या कार्यक्रमांचे वैशिष्ठ्य म्हणजे सर्व महिलांचाच एकत्रित असलेला हा ऑर्केस्ट्रा आहे. अनेक नामवंत गायक कलाकारांबरोबर देवयानीने अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया इथे ढोलकीवादनाचे कार्यक्रम केलेले आहेत. स्वबळावर इस्रायलचा दौराही तिने पूर्ण केलेला आहे. कलेच्या प्रांतात महिलांनी यावे या दृष्टीने ती सतत प्रयत्न करत असते. मुंबई विद्यापीठाची वाद्य वादनासाठी असलेली पदवी तिने संपादन केलेली आहे.

मुलीने शिक्षण घेतले तर थोडीफार प्रगती होऊ शकते यावर तिचा विश्वास आहे. त्यासाठी कुटुंबातील पुरुष सदस्यांनी पुढाकार घ्यायला हवा. महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याला कारण अपुरे शिक्षण हे आहे. कोणाच्यातरी सांगण्यावरून घटस्फोट घेणे, गर्भपात करणे याला शिक्षणाचा अभाव सांगता येईल. सर्वच गोष्टींवर न्याय मिळू शकेल असा कायदा अस्तित्वात आहे, तो प्रथम महिलांना ज्ञात करून द्यायला हवा. शहरातच नव्हे तर खेडेगावातही महिला छुप्या मार्गाने व्यसन करतात. तो मोह त्यांनी आवरायला हवा. महिला दिनाच्या निमित्ताने या वाईट व्यसनांना कायमचे हद्दपार केले पाहिजे. जीवनात येणारा नवरा हा निर्व्यसनी असायला हवा हे ठरवण्याचा अधिकार केवळ शिक्षण झाले असेल तर तुम्हाला घेता येईल, असे ती सांगते.

कविता कोळी,शास्त्रीय नृत्यांगणा
कविता कोळी ही कृती कला प्रतिष्ठान आणि आस्मिक रंगमंच या संस्थेची संचालिका आहे. नर्तिका, नृत्य दिग्दर्शिका, प्रशिक्षिका अशी तिची ओळख आहे. भरतनाट्यम् नृत्यशैलीतून तिने विशारद संपादन केलेले आहे. शिवाय मुंबई विद्यापीठाची बॅचलर ऑफ आर्ट्स ही पदवी घेऊन ठाणे, मुंबईत त्याविषयीची कार्यशाळा गेली अनेक वर्षे घेत आहे. सणांच्या ग माहेरी या कार्यक्रमाची निर्मिती करून महाराष्ट्रभर लोककलेचे दर्शन तिने घडवलेले आहे. निवेदन, सूत्रसंचलन, मॉडेलिंग, अभिनय यातही तिने नोंद घ्यावी, अशी कामगिरी केलेली आहे. शास्त्रीय नृत्याचा प्रचार हा तिचा मुख्य उद्देश असला तरी नृत्याचे प्रशिक्षण घेऊ पाहणार्‍या विद्यार्थिनींमध्ये बॉलिवूड डान्सचे आकर्षण आहे. त्याचेही प्रशिक्षणही ती देते. शाळेच्या रंगमंचासाठी स्वत:हून पुढाकार घेऊन निधी उभा केला होता.

कविता ही नृत्याचे शिक्षण देत असल्यामुळे समाजातील सर्व थरातील महिलांशी तिचा जवळचा संबंध येतो. या प्रत्येकीकडे वेगळे काही शिकण्याची ऊर्जा दिसते, पण प्रत्यक्ष जेव्हा रंगमंचावर कार्यक्रम करायचे ठरते तेव्हा नकार देणार्‍या महिलांची संख्या ही अधिक पहायला मिळते. यातून एक गोष्ट लक्षात येते की समाजात स्त्रियांना स्वबळावर उभे राहण्याची प्रेरणा दिली जात असली तरी प्रथम घरातून त्याची सुरुवात व्हायला हवी असे कविताला वाटते. स्वयंपाक, मुलांचे संगोपन करणे म्हणजे स्त्री परिपूर्ण असा अर्थ न लावता आत्मिक आनंद हासुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. या कामी घरातील सदस्यांनी सहकार्य केले तर आज महिला दिनाच्या निमित्ताने सोहळे होताना त्यांच्या दुबळेपणाविषयी बोलले जाते ते कमी होऊ शकते. तिने काम करावे, राबावे हा विचार जसा होतो, तसा तिने कला जोपासायला हवी हाही विचार पुढे यायला हवा.

First Published on: March 8, 2019 5:16 AM
Exit mobile version