शब्द आणि सुरांची केमिस्ट्री!

शब्द आणि सुरांची केमिस्ट्री!

harmonium

दोन कलाकारांच्या मनाचे धागेदोरे जुळणं, हल्लीच्या भाषेत सांगायचं तर केमिस्ट्री जुळणं आणि त्यातून एक छान कलाकृती निर्माण होणं हा जवळ जवळ एक गुरुत्वाकर्षणासारखा नियम आहे. लेखकाची दिग्दर्शकाशी, अभिनेत्याची अभिनेत्रीशी जशी केमिस्ट्री जुळते तशीच संगीतात आणखी एक केमिस्ट्री जुळत असते ती गीतकार आणि संगीतकाराची.

ही एक अशी केमिस्ट्री असते की ज्यात गीतकाराने लिहिलेल्या शब्दात लपलेली चाल संगीतकाराला सहज सापडते. त्यासाठी त्याला हार्मोनियमशी फार झटापट करावी लागत नाही आणि संगीतकाराने आधीच चाल तयार केली असेल तर गीतकारालाही त्या चालीत दडलेले शब्द शोधायला फार डोकं चालवायला लागत नाही. कारण यातल्या एकाने ‘त’ म्हटलं की ताकभातच, हे दुसर्‍याच्या चटकन लक्षात येतं.

शंकर-जयकिशन ही संगीतकार जोडगोळी जोरात होती तेव्हा त्यांचा कवी शैलेंद्रशी जरा जास्तच दोस्ताना होता. शंकर-जयकिशनच्या हातात शैलेंद्रनी लिहिलेल्या गीताचा कागद पडला की त्यांना चाल लावायला वेळ लागत नसे. ‘तिसरी कसम’ मधलं ‘सजन रे झुठ मत बोलो’ हे गाणं जेव्हा शैलेंद्रनी लिहिलं तेव्हा त्याला शंकर-जयकिशननी काही क्षणात चाल लावली. हे गाणं करताना शैलेंद्रनी बालपण, तारूण्य आणि म्हातारपण या माणसाच्या आयुष्यातल्या तीन अवस्थांचं वर्णन तीन वेगवेगळ्या अंतर्‍यांमध्ये केलं; पण आयुष्यातल्या प्रत्येक अवस्थेसाठी वेगळा अंतरा ही संकल्पना शंकर-जयकिशनना रूचत नव्हती. त्यांनी शैलेंद्रना तसं सरळ सांगितलं.

शैलेंद्रनी त्यांना त्यांची त्याबद्दलची अपेक्षा विचारली. ते शैलेंद्रना म्हणाले, ‘माणसाच्या आयुष्यातल्या तीन अवस्थेसाठी तीन वेगवेगळे अंतरे का खर्ची घालतो आहेस? त्यापेक्षा एकाच अंतर्‍यातल्या तीन ओळीत या तीन अवस्था लिहून मोकळा हो ना! त्याने जास्त चांगला परिणाम साधता येइल!‘ शैलेंद्रना शंकर-जयकिशनचं हे मत पटलं आणि शैलेंद्रनी शब्द लिहिले- ‘लडकपन खेल में खोया, जवानी निंद भर सोया, बुढापा देख कर रोया’…माणसाच्या आयुष्यातल्या तीन अवस्था तीन ओळीत तितक्याच प्रतिभेने लिहिणं हे तसंं इतर कोणत्या ऐर्‍यागैर्‍या कवीसाठी आव्हानच ठरलं असतं. पण शैलेंद्रनी ते आव्हान लिलया पेललं. लहानपण हे लहानपणीच्या खेळण्यासारखं हरवतं, जे तारूण्य काहीतरी करून दाखवण्यासाठी असतं ते झोपण्यात घालवलं जातं आणि शेवटी आयुष्याच्या संध्याकाळी म्हातारपण बघून रडू येतं, या मानवी आयुष्याबद्दलच्या अतिशय आशयघन ओळी शैलेंद्रनी लिहून शंकर-जयकिशनच्या अपेक्षा पूर्ण केल्या त्या केवळ शंकर-जयकिशनसोबत त्यांच्या मनाचा धागा जुळला होता म्हणूनच!

सुधीर फडके आणि ग.दि. माडगुळकर या संगीतकार-गीतकार जोडीने तर तमाम महाराष्ट्राला अजरामर गाण्यांचा खजिना बहाल केला. माडगुळकरांच्या हस्ताक्षरातला गाण्याचा कागद सुधीर फडके म्हणजे बाबुजींच्या हातात आला की माडगुळकरांच्या शब्दांना काय अपेक्षित आहे. याची चाहूल बाबुजींना काही क्षणात लागायची आणि लागलीच एक नितांत सुंदर गाणं आकाराला यायचं. ‘मधुराणी तुला सांगू का, तुला पाहुनी चाफा पडेल फिका’; ‘थकले रे नंदलाला’; ‘का रे दुरावा, का रे अबोला’; ‘कुणीतरी बोलवा दाजिबाला’; ‘कानडा राजा पंढरीचा’ अशी कित्येक गाणी करताना या दोघांनी एकमेकांची मनं जाणली…आणि यावरचा कळस ठरला तो म्हणजे गीतरामायण. गीतरामायणाने तर रेडिओच्या त्या काळात इतिहास निर्माण केला.

कविवर्य मंगेश पाडगावकर आणि यशवंत देव यांचं नातं म्हणजे शब्द आणि सुरांची घनिष्ट मैत्री. मुळात यशवंत देव हे कवीचं मन अचूक जाणणारे आणि त्यातही पाडगावकरांच्या शब्दकळेतली नजाकत आणि हळवेपणा तर सुरांच्या सुरेल चौकटीत अचूक बसवणारे. पाडगावकरांनी फोनवर नुसते शब्द सांगितले तरी देवांच्या मनात गाण्याची चाल घोळू लागायची आणि पुढच्याच क्षणी गाणं अंतर्‍याच्या चालीसकट तयार व्हायचं. ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘मान वेळावुनी धुंद बोलू नको’, ‘अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी’, ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’अशी कित्येक गोड गाणी या जोडगोळीने जन्माला घातली. पाडगावकर आणि देव हे खरोखरच शब्द-सुरांचं अवीट नातं होतं.

पाडगावकरांच्या शब्दांचं असंच नातं होतं ते संगीतकार श्रीनिवास खळेंच्या संगीताशी. खळेंचं संगीत ऐकलं की ते आत्मशोध घेत आहेत असं वाटतं, असं रविंद्र नाट्य मंदिरातल्या एका समारंभात जाहीरपणे खळेंचे समकालिन संगीतकार यशवंत देवांनी म्हटलं होतं. ‘श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीमधारा’सारखं पाडगावकरांनी लिहिलेलं खळेंचं गाणं ऐकताना तर खरंच देवांच्या म्हणण्याचा प्रत्यय येतो. या गाण्याचे शब्द पाडगावकरांनी खळेंना मुंबईच्या लोकलमध्ये ऐकवले आणि शेवटचं स्टेशन येईपर्यंत खळे त्या शब्दांना चाल लावून मोकळेही झाले. गीतकार आणि संगीतकाराच्या मनाचे धागेदोरे जुळल्याशिवाय अशा कलाकृती निर्माण होत नाहीत.

संगीतकार अरूण पौडवाल आणि गीतकार शांताराम नांदगावकर हे कोणे एके काळी शॅहो नावाच्या एका ऑर्केस्ट्रात होते. तेव्हापासून त्यांचं जवळीकीचं नातं होतं. त्यामुळेच संगीतकार आणि गीतकार अशी त्यांची एकमेकांशी एक अतूट सोबत होती. दोघांनी मिळून सूर आणि शब्दांच्या देवाणघेवाणीचे व्यवहार एकमेकांमध्ये बर्‍याचदा केले होते, त्यामुळे ते एकमेकांची मनं जाणून होते. एके दिवशी अरूण पौडवालांनी हार्मोनियमवर शांताराम नांदगावकरांना एक चाल ऐकवली. ही चाल वेगवान, पण ऐकताना खिळवून ठेवणारी होती. नांदगावकरांकडून त्यांना त्या चालीवर गाणं लिहून हवं होतं. नांदगांवकरांना त्या वेगवान चालीत शर्यत दिसली. त्यांनी पौडवालांना शब्द सांगितले – ‘ससा तो ससा की कापूस जसा, त्याने कासवाशी पैज लाविली, वेगे वेगे धावू नि डोंगरावर जाऊ, ही शर्यत रे आपुली.’ गीतकार आणि संगीतकार यांच्या मनोमिलनातून हे जे गाणं तयार झालं ते आजही मराठी मनाला भुरळ घालत आहे.

मिलिंद इंगळेने ‘गारवा’ हे गाणं करताना या गाण्यातली मधली ‘प्रिये’ ही हाळी किंवा हाक कवी सौमित्र म्हणजे किशोर कदमला तशीच्या तशी ठेवून शब्द लिहायला सांगितले. कवी सौमित्रनेही तो शब्द तसाच ठेवून ‘गारवा’ हे लोकप्रिय गाणं लिहिलं. गीतकार आणि संगीतकार यांच्यातल्या कलाकाराचं मन जुळतं तेव्हाच असं घडून येतं. एका अर्थी एका मनाची भाषा दुसर्‍या मनाने जाणणं असतं…आणि तिथेच मनामनात पोहोचणारं गाणं असतं!

First Published on: January 13, 2019 4:48 AM
Exit mobile version