यामी गौतम सध्या ‘या’ गोष्टीत आहे व्यस्त

यामी गौतम सध्या ‘या’ गोष्टीत आहे व्यस्त

यामी गौतम

आदित्य धार दिग्दर्शित ‘उरी’ चित्रपटात यामी गौतमची वर्णी लागली आहे. या चित्रपटात यामी इंटेलिजन्स ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी यामी सध्या कसून मार्शल आर्ट्सचा सराव करत आहे. उरीमधील आपली भूमिका नीट वठवता यावी यासाठी यामीने सध्या मिक्स्ड मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली आहे.

फार कमी वेळात यामी गौतमने बॉलीवूडमध्ये आपली अशी एक छाप उमटवली आहे. काबिलच्या यशानंतर यामीला जास्त चित्रपटात तिच्या चाहत्यांनी पाहिले नाही. आता लवकरच यामी ‘उरी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातील भूमिकेसाठी ती सध्या खूप मेहनत करत असल्याची बातमी आहे. स्वरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण ती सध्या घेत आहे. आपल्या प्रशिक्षणासंदर्भात यामीने सांगितले की, ‘नुकतीच उरीच्या प्रशिक्षणाची तयारी सुरु झालीये. मिक्स्ड मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण हे त्या स्क्रिप्टची मागणी आहे. भूमिकेसाठी एक विशिष्ट शारीरिक ठेवणीची गरज असल्यामुळे सध्या त्याचा सराव सुरु आहे. मार्शल आर्ट्सच्या प्रशिक्षणामुळे या भूमिकेला एक वेगळा उठाव येईल असेही तिने यावेळी नमूद केले.’

जूनपासून या चित्रपटाच्या चित्रिकरणाची सुरुवात होत असल्याची माहितीदेखील यामीने यावेळी दिली. सप्टेंबर २०१६ मध्ये झालेल्या उरी हल्ल्याशी संबंधित चित्रपटाची कथा असून आरएसव्हीपी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
दरम्यान, यामी गौतम सध्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून यामध्ये ती शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूरसह काम करत आहे. या चित्रपटात ती वकिलाची भूमिका साकारणार आहे.

First Published on: May 19, 2018 9:47 AM
Exit mobile version