संयुक्त राष्ट्राकडून ‘बालहक्क सनद’ची निर्मिती

संयुक्त राष्ट्राकडून ‘बालहक्क सनद’ची निर्मिती

बुधवार, २० नोव्हेंबर. जागतिक बालदिन. लहान मुलामुलींमध्ये सांप्रदायिक आदान-प्रदान तसेच विविध संप्रदाय आणि धर्मांबाबतचे समंजस्य वाढून जगभरातील मुलामुलींचे आयुष्य अधिक चांगले बनवण्याची संकल्पना रुजावी या हेतूने बालदिन म्हणजेच चिल्ड्रन्स डे साजरा करण्यात येतो. ऑक्टोबर १९५३ मध्ये सर्वात पहिला बालदिन साजरा करण्यात आला. यासाठी जिनीव्हाच्या आंतरराष्ट्रीय बालकल्याण संघटनेचा पुरस्कार लाभला होता. त्यानंतर व्ही.के. कृष्णमेनन यांनीसुद्धा आंतरराष्ट्रीय बालदिनाची संकल्पना उचलून धरली व १९५४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने ती स्वीकारली. १९५४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेत पहिल्यांदाच बालदिन साजरा करण्यात आला. २० नोव्हेंबर १९५९ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने बालहक्कांची सनद (डिक्लरेशन ऑफ चिल्ड्रन्स राइट्स) स्वीकारली. तसेच २० नोव्हेंबर १९८९ मध्ये याच दिवशी बालहक्कांच्या मसुद्यावर स्वाक्षरी करण्यात आल्या. आतापर्यंत १९१ राष्ट्रांनी हे हक्क मान्य केले आहेत. १९६४ पूर्वी भारतातसुद्धा २० नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येत असे. १९६४ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. आपणा सर्वांना माहीतच आहे की, पंडित जवाहरलाल नेहरु यांना लहान मुलांविषयी जिव्हाळा होता. लहान मुले त्यांना खूप आवडत. त्यामुळेच भारताने १४ नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.
आजचे बालक हे उद्याचे देशाचे नागरिक असल्याकारणाने त्यांच्या हक्कांचे जतन होणे गरजेचे आहे. बालकांना आयुष्याचा आनंद घेण्याचा, मौजमस्ती करण्याचा हक्क आहे. यातूनच शरीराने आणि मनाने आरोग्यसंपन्न नागरिक घडणार आहेत, पण आज जगभरातील अनेक बालके त्यांच्या मूलभूत गरजा, हक्कांपासून वंचित असल्याचे चित्र आहे. यामध्ये बालकामगार, शाळांपासून वंचित राहिलेली लहान मुले आदिंचा समावेश आहे. सरकारी पातळीवर या मुलांसाठी उपाययोजना आखण्यात येत असल्या तरी त्या तुटपुंज्या ठरत आहेत. अशा वेळी सामाजिक जाणिवेतून प्रत्येकाने स्वतःहून पुढाकार घेत या मुलांना त्यांचे हक्क, आनंद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वप्रथम पालकांनी आपल्या पाल्यामध्ये इतरांनासुद्धा आनंदात सहभागी करून घेण्याबाबतची जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. पालकांनी ही जाणीव आपल्या मुलांच्या मनात रुजवली तर भारताचे भावी नागरिक सुज्ञ आणि समजूतदार बनतीलच शिवाय कायमच वंचित आणि नकारात्मक जगणे वाट्याला आलेल्या एखाद्या दुर्दैवी बालकालाही आपल्या या प्रयत्नांमुळे चांगले आयुष्य मिळू शकेल. चाचा नेहरूंचा जन्मदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून बालदिन साजरा करण्यापुरते बालदिनाचे महत्त्व असू नये, तर यासाठी चाचा नेहरुंचे विचार समजून घेणे गरजेचे आहे. मुलामुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे तसेच त्यांना आपले आयुष्य फुलवण्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात भर घालण्याच्या समान संधीही मोठ्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत. बालदिनाच्या निमित्ताने आपणांपैकी प्रत्येकाला मुलांच्या कल्याणासाठी काहीतरी करण्याबाबतच्या आपल्या वचनबद्धतेची आठवण राहते.
बालदिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगलने देखील यंदा भारतातील बालदिनानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी गुगल डूडल समर्पित केले होते. व्हेन आय ग्रो अप या संकल्पनेवर लहान मुलांना डूडल रेखाटण्यास दिले होते. यावेळी ७ वर्षीय मुलीने काढलेले चालत्या वृक्षांचे चित्र डूडलसाठी निवडण्यात आले. दरवर्षी गुगलकडून बालदिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे गुगलप्रमाणेच लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ मिळवून देणार्‍या स्पर्धांचे आयोजन करून बालदिन साजरा करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

First Published on: November 20, 2019 6:35 AM
Exit mobile version