बासरीवादक पन्नालाल घोष

बासरीवादक पन्नालाल घोष

पन्नालाल घोष हे एक प्रख्यात बासरीवादक होते. त्यांचे पूर्ण नाव अमल ज्योती घोष असे होते. त्यांनी बासरी या वाद्यात अनेक सुधारणा केल्या, तसेच बासरी वादन हे भारतीय गायकीच्या जवळ नेऊन ठेवले. त्यांचा जन्म २४ जुलै १९११ रोजी बारिसाल (बांगला देश) येथे झाला. पन्नालाल घोष यांचे वडील अक्षयकुमार घोष हे उत्तम सतारिये होते. वयाच्या चौदाव्या वर्षीच पन्नालाल बासरीकडे आकृष्ट झाले. पुढे १९३४ मध्ये पन्नालाल घोष यांनी मास्टर खुशी महम्मद या संगीतकाराचे शिष्यत्व पत्करले. ‘सराईकेला नृत्यमंडळी’त ते काही काळ संगीत दिग्दर्शक होते. ‘सराईकेला नृत्यमंडळी’बरोबर १९३८ मध्ये पन्नालाल घोष यांना युरोपचा प्रवास घडला. गिरिजा शंकर चक्रवर्ती ह्यांच्याकडे १९३९ मध्ये आणि पुढे १९४७ च्या सुमारास उस्ताद अल्लाउद्दीन खाँ ह्यांच्याकडे पन्नालाल घोष यांनी संगीताचे अधिक शिक्षण घेतले.

पन्नालाल घोष हे चित्रपटक्षेत्रात १९४० ते १९४४ ह्या काळात संगीत दिग्दर्शक म्हणून होते व पुढेही तेथेच १९५६ पर्यंत बासरीवादक होते. या काळात पन्नालाल घोष यांनी बासरीवादनाचे स्वतंत्र कार्यक्रमही केले. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रात १९५६ पासून पन्नालाल घोष हे वाद्यवृंद निर्देशक होते. पन्नालाल घोष हे १९४० साली मुंबई येथे वास्तव्यास होते. त्यांनी बॉम्बे टॉकीजमध्ये संगीत दिग्दर्शकाचे आणि बासरीवादनाचे काम केले. पन्नालाल घोष यांनी बासरीत आमूलाग्र परिवर्तन घडविले, बासरीची लांबी ४०-४२ इंचांपर्यंत वाढविली. तसेच बासरीवर बोटे ठेवण्याचे वेगळे तंत्र विकसित केले. तसेच पंडितजींनी अनेक नवीन रागांची निर्मिती केली त्यातील राग जयंत हा एक महत्त्वाचा राग आहे.

पन्नालाल घोष हे बासरीवादनाच्या क्षेत्रातील एक युगप्रवर्तक होत. वेणुवादनाला भारतात दीर्घकालीन इतिहास असला तरी बासरीवादनाला एक स्वतंत्र व स्वायत्त दर्जा मिळवून देण्यात पन्नालाल घोष यांचा फार मोठा वाटा होता. ख्यालगायनातील आलापासारखे विलंबित संगीतविस्तार आणि सतार, सरोद इ. तंतुवाद्यातील ‘झाला’ सारखे द्रुत वादनप्रकार या दोहोंना बासरीवादनात अंतर्भूत करून पन्नालाल घोष यांनी या वाद्याची सांगीतिक विकसनक्षमता विस्तृत केली.

यासाठी त्यांनी संशोधन करून मोठ्या व्यासाची, अधिक लांबीची व परिणामतः अधिक स्वरक्षेत्राची बासरी तयार केली. अर्ध, पाव इ. स्वरांतरे आणि मींडकामासारखे संगीतालंकार पन्नालाल घोष यांनी बासरीवादनातून यशस्वी करून दाखविले. संगीत दिग्दर्शक आणि रचनाकार म्हणूनही पन्नालाल घोष यांनी कीर्ती मिळविली. पन्नालाल घोष यांच्या इतजार, बसंत ह्या चित्रपटांच्या संगीतरचना व ‘आशा’, ‘बागेश्री’, ‘ऋतुराज’, ‘कलिंगविजय’, ‘भैरवी’, ‘ज्योतिर्मय अमिताभ’ इ. वाद्यवृंदरचना गाजल्या आहेत. त्यांच्या शिष्यगणांत हरिप्रसाद चौधरी, देवेंद्र मुर्डेश्वर, बेडा देसाई इ. प्रसिद्ध बासरीवादकांचा समावेश होतो. अशा या श्रेष्ठ बासरीवादकाचे २० एप्रिल १९६० रोजी निधन झाले.

First Published on: July 24, 2021 3:45 AM
Exit mobile version