नळी फुंकली सोनारे….

नळी फुंकली सोनारे….

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा लॉकडाऊन आणखी कठोर करण्याचा इशारा दिला आहे. मुळात या विधानाला आणि इशार्‍याला काहीही अर्थ नसल्याचे लोकांना माहीत झाले आहे. ज्या देशामध्ये हात कसे धुवायचे याचे प्रशिक्षण सरकारला शाळाशाळांमधून द्यावे लागते तेथील नागरिकांना शिस्त पाळा म्हणून केलेले आवाहन अथवा इशारा किती कुचकामी असू शकतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

सध्या महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या दिशेने जात असून देशातील एकूण बाधितांच्या तुलनेत ती संख्या एक तृतीयांश आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन वाढवत वाढवत दोन महिने केले. पोलीस आणि इतर सरकारी यंत्रणांकडून १८९७ च्या साथ रोग नियंत्रण कायद्याची अमलबजावणी करून घेतली, तरीही रुग्ण संख्येचा विस्फोट होऊन महाराष्ट्र करोना संसर्गाच्या बाबतीतही देशातील एक क्रमांकाचे राज्य ठरला आहे. तेथे केवळ मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर लोकांना शिस्त येण्याची आशा बाळगण्यात काही अर्थ नाही. मुळात राज्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यात पहिला करोना रुग्ण आढळल्यापासून राज्याच्या प्रशासनाने आणि प्रशासन प्रमुखांनी लोकांवर विश्वास दाखवण्याचेच धोरण ठेवले. त्यात परदेशातील भारतीय विमानतळावर उतरल्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वारंटाईन असे शिक्के मारले व त्यांनी घरातच थांबावे असे आवाहन केले. हे सुशिक्षित आणि विमानाने परदेशांमध्ये फिरणारे नागरिकही हा होम क्वारंटाईनचा बहुमान हातावर मिरवत लोकांमध्ये फिरत होते. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जात होते. रेल्वेने प्रवास करीत होते. या समजदार आणि शहाण्या लोकांमुळेच सुरुवातीच्या काळात करोनाचा वेगाने प्रसार झाला. लोकांना याचे गांभीर्य नाही, हे सरकारी यंत्रणेला समजल्याने लोकांची हालचाल मर्यादित करण्यासाठी पावले उचलली जात होती. त्याचवेळी युरोपमधील करोनाचे संकट अत्यंत धोकादायक पातळीवर होते. सर्वात प्रगत आरोग्य सुविधा असूनही इटलीसारख्या देशात लोक उपचाराअभावी रस्त्यांवर मरून पडत असल्याच्या बातम्या येत होत्या.

भारतात त्या वेगाने करोना पसरला तर भारताची स्थिती काय असेल या कल्पनेनेच अंगावर शहारे येत होते. म्हणून अर्थव्यवस्था ठप्प झाल्यास होणार्‍या परिणामांची तमा न बाळगता देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. लोकांनी घरीच थांबावेत म्हणून कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला. पण त्या लॉकडाऊनमधून काय साध्य झाले, याचा हिशेब मांडण्याचे कुणीही धाडस करीत नाही. लोकांना घरात थांबवले तर कुणी समाजसेवेसाठी, कुणी भाजी आणण्यासाठी, कुणी औषध घेण्यासाठी, कुणी दूध आणण्यासाठी म्हणून बहाणेबाजी करीत बाहेर पडत होते. या बाहेर पडणार्‍या झुंडी रोखण्यासाठी दोन महिने पोलीस यंत्रणा २४ तास राबत होती. पोलीस आवाहन करीत होते, धाक दाखवत होते, शिक्षा करीत होते, दंड करीत होते, तसेच वाहनेही जप्त करीत होते, पण त्यातून काहीही साध्य झाले नाही. दिवसागणिक आकडा वाढतच चालला होता.

मुख्यमंत्री दर आठ-पंधरा दिवसांनी फेसबुक लाईव्ह करून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करीत राहिले, लोकांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर विश्वास ठेवून लॉकडाऊन काळात घरातच कसे थांबायचे याचा दाखला स्वानुभवातून देत राहिले; पण काहीही फरक पडला नाही. अखेर या महामारीविरोधात लढण्यासाठी पुरेसी आरोग्य साधने म्हणजे पीपीई कीट, एन ९५ मास्क, व्हेंटिलेटर्स निर्माण करणे शक्य झाल्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या जागेवर अनलॉक करण्याचा निर्णय घेतला. त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू केले. टप्प्याटप्प्याने सर्व सेवा, व्यवसाय, उद्योग, वाहतूक सुरू करण्याच्या दिशेने उचललेले ते पाऊल होते. दुकाने उघडली आणि राज्यभरातील लोक मुख्य बाजारपेठांमध्ये ओसंडून वाहू लागले. ‘मिशन बिगिन अगेन’ लागू करताना लोकांनी शिस्त पाळावी, सामाजिक अंतराचे पालन करीत एकमेकांपासून किमान ६ फूट अंतरावर उभे राहावे, मास्कचा वापर करावा, असे प्रशासनाला अपेक्षित होते. मात्र, लॉकडाऊन संपले म्हणजे जणू करोना विषाणू हद्दपार झाल्याच्या अभिनिवेशात लोक रस्त्यांवर उतरत आहे, हे बघून काळजी आणखी वाढली आहे.

सध्याची करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आणि रोज तीन हजाराच्या आसपास आढळणारे नवे रुग्ण बघता सरकारकडे एवढ्या मोठ्या संख्येने येणार्‍या रुग्णांवर उपचाराची व्यवस्था नाही. यामुळे लक्षणे नसलेले व आजाराची तीव्रता कमी असणार्‍या रुग्णांवर घरीच उपचार करण्याच्या विचारात सरकार आहे. याचा अर्थ एवढाच आहे, की सरकार केवळ चाचण्या करणार आहे. त्यातील बाधित रुग्णांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर बरे कसे व्हायचे हे ठरवायचे आहे. यामुळे सरकारच्या या निर्णयाचा अर्थ नागरिकांनी समजून घेऊन काळजी घेणे गरजेचे आहे. तो समजला नाही, तर लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधी व्यक्त केलेली भीती अनलॉकच्या काळात खरी ठरणारच नाही याची कुणी हमी देऊ शकणार नाही. तसेही कुरुक्षेत्राच्या मैदानावर आपल्या नातेवाईकांना कसे मारू या संभ्रमात सापडलेल्या अर्जुनाला उपदेश केलेल्या गिताख्य अमृताचे सेवन करीत आपल्या हजारो पिढ्यांचे पोषण झाले आहे. त्यात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला एक महत्त्वाचा संदेश दिला होता. अर्जुना या लोकांना तू मारले नाहीस, म्हणून ते मरणारच नाहीत,असे नाही. ते काही अमर होणार नाहीत. तो उपदेश आपल्या नागरिकांनी फारच गांभीर्याने घेतलेला दिसतोय. करोनाचा संसर्ग होऊन मेलो नाही, म्हणून आपण अमर राहणार नाहीत, याची जाणीव ठेवूनच कदाचित लोक एवढ्या बेफिकीरीने वागत असावेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आवाहन त्यांच्यासाठी नळी फुंकली सोनारे…. प्रमाणे आहे.

First Published on: June 11, 2020 8:21 PM
Exit mobile version