जगायला लावणारं गाणं!

जगायला लावणारं गाणं!

कामजीवन प्रकाशनचे जीवन मोहाडीकर अशाच एका गाण्याचे आपल्या जीवनावरचे उपकार मानायला विसरले नव्हते. ते गाणं होतं अर्थातच, ’या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे!’ मंगेश पाडगावकरांनी लिहिलेलं, यशवंत देवांनी संगीत दिलेलं आणि अरूण दातेंनी गायलेलं ते जीवनाला आणि जगण्याला अमर्याद प्रेरणा देणारं गाणं त्यांच्या आयुष्याला संजीवक कलाटणी देणारं ठरलं होतं.

ह्या गाण्याचे त्यांच्यावर इतके उपकार होते की त्यातून उतराई होण्यासाठी त्यांनी वीस-बावीस वर्षांपूर्वी प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिरात ह्या गाण्याच्या शब्दांचं शीर्षक देऊन खास कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी दस्तुरखुद्द त्या गाण्याचे गायक अरूण दातेंना त्यांनी खास बोलवलं होतं आणि त्यांची सगळी मृदूमुलायम भावगीतं गायचं निमंत्रण दिलं होतं. अरूण दातेंनीही ते निमंत्रण आनंदाने स्विकारलं होतं.

’या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ ह्या गाण्याचे जीवन मोहाडीकर आपल्यावर खूप उपकार मानत त्याचं कारणही तसंच होतं. झालं होतं असं की जीवन मोहाडीकरांच्या आयुष्यात एकदा असा एक प्रसंग आला होता की त्यांना त्यांच्या व्यवसायात प्रचंड कर्ज झालं होतं. तो कर्जाचा डोंगरच इतका अफाट होता की त्यांना तो पेलवण्याच्या पलिकडचा होता. या कर्जामुळे ते इतके विटले होते की काही काळाने त्यांना त्यांच्या जीवनात राम वाटेनासा झाला आणि त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले होते. पण ज्या ज्या वेळी आत्महत्येच्या काळ्या ढगांचे विचार त्यांच्या मनात दाटायचे तेव्हा एक गोष्ट ते न चुकता करायचे. ते ’या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ हे गाणं आपल्या टेपरेकॉर्डरवर लावायचे आणि शांतपणे ते गाणं पुन्हा पुन्हा ऐकायचे. या गाण्यामुळे, त्या गाण्यात मांडलेल्या जीवनासक्त विचारामुळे, जीवनावरच्या अतोनात प्रेमामुळे मोहाडीकरांच्या मनात दाटणारे आत्महत्येच्या विचारांचे ते काळे ढग कुठल्या कुठे विरून जायचे आणि मोहाडीकरांचं मन जगण्याबद्दलच्या, जीवनाबद्दलच्या नव्या विचारांनी ताजेतवाने होऊन जायचे.

मोहाडीकरांच्या मनात जेव्हा जेव्हा आत्महत्येचा विचार गर्दी करू लागायचा तेव्हा तेव्हा मोहाडीकर हे गाणं ऐकत आणि त्या गाण्यापासून जगण्याची उर्मी मिळवत. हे गाणं म्हणजे मोहाडीकरांसाठी नकोशा विचारांवरचं एक जालीम औषध ठरलं होतं.
पुढे अथक कष्ट करून मोहाडीकरांनी आपल्या आयुष्यातल्या त्या संकटावर मात केली. आपल्या आयुष्यातला तो कर्जाचा डोंगर बेचिराख करून टाकला आणि आपलं पूर्वीचं ते सुखाचं जीवन नव्याने जगू लागले. पण तोपर्यंत ’या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या गाण्याने त्यांच्या संकटसमयी त्यांना केलेली लाखमोलाची मदत ते कधीच विसरू शकले नाहीत..आणि म्हणूनच ’या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या गाण्याचे आपल्यावरचे उपकार मानण्यासाठी त्यांनी रविंद्र नाट्य मंदिरात अरूण दातेंच्या त्या गाण्याचा खास सोहळा आयोजित केला होता.

गाण्यामुळे जगण्याच्या वाटेकडे पुन्हा फिरल्याचा अनुभव आला होता तो मुंबईतल्या अशाच एका प्राध्यापिकेला. रोजघडीचं सुखाचं जीवन जगता जगता तिच्या वैवाहिक आयुष्यात घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे तिचं संपूर्ण जीवन उध्वस्त व्हायची पाळी आली होती. प्रचंड निराशेने ग्रासलेल्या तिच्या मनात नंतर नंतर आत्महत्येचे विचार घर करू लागले. तिला तहानभूक लागेना, झोप येईना. आता आपलं जीवन संपवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असा विचार तिच्या मनात प्रबळ व्हायचा. पण ज्या ज्या वेळी हा काळाकुट्ट विचार तिच्या मनात यायचा तेव्हा तेव्हा तिला एक गाणं आठवायचं…’काटों से खिंच के ये आंचल, तोड के बंधन बांधे पायल, कोई ना रोको फिर दिल की उडान को, दिल वो चला…आज फिर जीने की तमन्ना हैं, आज फिर मरने का इरादा हैं’…शैलेंद्रजींनी लिहिलेलं, एस.डी. बर्मननी संगीत दिलेलं आणि लता मंगेशकरांनी गायलेलं हे गाणं तिने ऐकलं की तिच्या मनाला नवी उभारी मिळायची, जीवन जगण्याबद्दलचा नवा आशावाद मिळायचा आणि आयुष्यातलं हे संंकट कधी तरी आपण दूर करू शकू अशी उमेद तिच्या मनात आपोआप आतून जागायची.

मुळात, ’आज फिर जीन की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है’ हे शैलेंद्रंनी त्या गाण्यात लिहिलेले शब्द तिला तिच्या त्या काळात एक वेगळाच आधार देऊन जायचे. पुढे तिच्या आयुष्यातल्या त्या संकटातून तिनेच मार्ग शोधला आणि ती पुन्हा आपल्या सुखाच्या जगण्याकडे वळली. पण पुढचं आयुष्य जगताना ती ’काटों से खिंच के ये आंचल’ या गाण्याला कदापि विसरली नाही. मुळात, त्या गाण्यातल्या ’आज फिर जीन की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है’ या दोन ओळींचे तिने आपल्या आयुष्यात मनोमन आभार मानले, उपकार मानले.

अशीच एक गोष्ट आहे ती सैनिकाचा पेशा पत्करणार्‍या एका तरूणाची. त्याने कधीकाळी ’जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रूसंगे युध्द आमचे सुरू’ हे गाणं रेडिओवर ऐकलं आणि ते गाणं लहानपणी त्याच्या मनात राष्ट्रप्रेमाची अशी काही ज्योत जागवून गेलं की त्याने कायम सैन्यात जाण्याचा ध्यास घेतला. या गाण्याने त्याच्या मनात असा काही मुक्काम ठोकला की शेवटी त्याने सैन्यात जाण्याच्या सगळ्या अटी जीव टाकून पूर्ण केल्या आणि अखेर तो सैन्यात गेलाच. त्याच्या मनात घोळत राहिलेल्या त्या गाण्याने त्याचा कायम पिच्छा पुरवला म्हणूनच त्याच्या इच्छाआकांक्षा पूर्ण झाल्या.

थोडक्यात काय तर गाणं हे माणसाच्या जगण्याला नवा आधार देतं, नवा आकार देतं आणि जगण्याची वाटही मिळवून देतं…आणि तशीच हळवी माणसं असतात जी त्या गाण्यांचं आपल्यावर असलेलं ऋण मान्य करतात. कोणे एके काळी म्हटलं जायचं की दीप राग गाऊन दिवे प्रकाशमान व्हायचे, मल्हार राग आळवून पाऊस पडायचा. त्यातलं किती खरं, किती खोटं हे आज आपण नक्की सांगू शकत नाही. पण आज गाण्याने प्रभावित केलेल्या अशा हळव्या लोकांच्या जीवनाच्या कथा ऐकल्या की गाण्यात, संगीतात काय जादू आहे, हे नक्की सांगू शकतो!

First Published on: February 24, 2019 4:55 AM
Exit mobile version