चंद्रकांत पाटलांची कोती वृत्ती!

चंद्रकांत पाटलांची कोती वृत्ती!

समाजात वावरणार्‍या कोणाही व्यक्तीने मनाचा मोठेपणा राखला पाहिजे, अशी साधारण अपेक्षा असते. ज्या व्यक्ती राजकारणाशी संबंधित आहेत त्यांनी तर अधिक समजदारीने वागलं पाहिजे. दुदैवाने अलीकडे तसं घडत नाही. आपल्या विरोधकाला धडा शिकवण्यात अनेकांचा वेळ जातो आहे. इतरांवर आरोप करताना आपण किती पाण्यात आहोत याचा विचार न करता टीकेला टीकेने उत्तर देण्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्थेला हात घालण्याची काहींना खूपच खोड आहे. राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी तर या सगळ्या परिस्थितीत इतरांना आदर्शवत ठरेल, अशी भूमिका वठवणं अपेक्षित असताना तेच चिथावणीचा उद्योग करू लागले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात राज्यभर पोलीस केसेस दाखल करण्याचा आदेश देत आपण किती कोते आहोत हे दाखवून दिलं आहे. राजकारणात अशा वृत्तीला अजिबात थारा असता कामा नये. राजकीय व्यासपीठावर टीका-टिपण्णीचे असंख्य प्रसंग अनेक नेत्यांविरोधात यापूर्वीही घडले. पण ते तात्कालीक होते. एखाद्याच घटनेची दखल घेतली गेली. पण तीही तेवढ्या पुरतीच. समृध्द लोकशाहीचं आणि परिपक्व लोकप्रतिनिधींचे हेच द्योतक मानलं जातं. लोकशाहीमध्ये सुडबुध्दी कामाची नसते. लोकप्रतिनिधींनी आपल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या ऊर्जेचा सकारात्मक उपयोग करून घ्यायचा असतो, एकदा का कार्यकर्त्यांना नकारात्मक कृती करायची सवय लागली की, त्यांना मग आवरणे अवघड होऊन बसते. सध्या भाजपची तशी अवस्था होऊन बसली आहे, कारण वरचा कुणी तरी नेता काही तरी वक्तव्य करतो, म्हणून खालच्या पातळीवरचे नेते आणि कार्यकर्ते खालची पातळी गाठतात. त्यामुळे समाजामध्ये कलुषित वातावरण निर्माण होते. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी गेल्या दोन वर्षात भाजपच्या नेत्यांनी सगळा जोर लावला, पण सरकार काही पडले नाही, त्यामुळे आता ते लोकशाही प्रक्रियेला न शोभणारी कृत्ये करून स्वत:चे हसे करून घेत आहेत. गुन्हे दाखल करण्याचा चंद्रकांत पाटलांचा हा फतवा म्हणजे राज्यातील राजकारणाची खालावलेली पातळीच होय. आपण विरोधकांना वाटेल तसं बोलायचं, नेत्यांच्या बापजाद्यांचा उद्धार करायचा, मुख्यमंत्र्यांचा बाप काढायचा, त्यांच्या पत्नीविषयी काहीही बरळायचं, पवारांना दरोडेखोर संबोधायचं, उपमुख्यमंत्र्यांना ते राज्य विकून खातील असली शेरेबाजी करायची आणि इतरांनी काही टीका केली की कार्यकर्त्यांना कामाला लावायचं हा उद्योग चंद्रकांत पाटलांनाच शोभतो. आपल्या पक्षातल्या या बोलघेवड्या आणि उपद्व्यापींना रोखण्याचा प्रयत्न पालक म्हणून चंद्रकांत पाटील यांनी कधी केल्याचं ऐकायला आलं नाही. उलट शेलक्या शेरेबाजीत त्यांचंच नाव आघाडीवर असतं. यामुळेच विरोधी नेत्यांविरोधात पत्रकार परिषदा घेऊन खोटेनाटे आरोप करणार्‍या, त्यांच्या विरोधात खोट्या केसेस लावण्यात माहीर असलेल्या आपल्या नेत्यांना त्यांनी कधी रोखल्याचं पाहायला मिळालं नाही. ही जबाबदारी हाताळायची नाही आणि पंतप्रधानांच्या संकटाचं निमित्त करत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरोधात केसेस नोंदवण्याचा आदेश द्यायचा ही पाटलांची कृती भलतीच आगलावी म्हटली पाहिजे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविषयी भाजपच्या नेत्यांनी काय टिपण्ण्या केल्या होत्या, हे एकदा चंद्रकांत पाटलांनी जाणून घेतलं पाहिजे. त्यांना कुलटा, पांढर्‍या पायाची, बारगर्ल असल्या शेलक्या शब्दांची लाखोली वाहणारे दुसरे तिसरे कोणीही नव्हते. ते चंद्रकांत पाटलांच्या भाजपचेच नेते होते. तेव्हा या नेत्यांचे कोणी कान धरले नाहीत की त्यांना कोणी समजही दिली नाही. सोनिया गांधी वा राहुल गांधींनी त्यांच्या विरोधात पोलीस तक्रारी केल्या असत्या तर पक्षातील किती तरी जणांची पंचाईत झाली असती? पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा टीव्हीवरच्या चर्चेत अनेकदा विरोधी नेत्यांसाठी कोणत्या भाषेचा वापर करतात, याची एकदा खातरजमा प्रदेशाध्यक्षांनी केली पाहिजे. म्हणजे आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कार्ट ही आपली वृत्ती त्यांना कळू शकेल, अशी अपेक्षा आहे. शरद पवार यांच्यासाठी युतीचं सरकार असताना भाजप-सेनेच्या नेत्यांनी कोण कोणत्या शब्दांचा वापर केला होता, तेही एकदा चंद्रकांत पाटलांनी पडताळून पाहिलं पाहिजे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पवारांची निर्भत्सना कोणत्या शब्दात करायचे, हे राजकारणात पहिल्या क्रमांकाच्या राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर पोहोचलेल्या चंद्रकांत पाटलांना कळू नये, याचं अजब वाटतं. अशा शब्दांचा वापर करूनही पवारांनी कधी त्यांच्याविषयी तक्रारी केल्या नाहीत. गोपीनाथ मुंडे यांनी तर पवारांचे दाऊदशी संबंधांची चर्चा शपथेवर केली होती. मुंडेंना अखेरपर्यंत त्यातील सत्य पुढे आणता आलं नाही. पुढे मुंडे राज्याचे गृहमंत्री झाले. पवारांना गोत्यात आणण्यासाठी त्यांनी जंगजंग पछाडले. विधिमंडळाच्या संरक्षणाचं निमित्त करत मुंडे यांनी पवारांवर नको नको ते आरोप केले. पुढे आरोपात काहीच तथ्य नसल्याचं त्यांना मान्य करावं लागलं. आपल्या विरोधकांवर आरोपांची राळ उठवण्यासाठी अनेकजण आमदारकीचं हक्काचं व्यासपीठ निवडतात. तिथे वाटेल तसे आरोप करता येतात. ते खोटे ठरले तरी काहीही कारवाई होत नाही. मुंडेंनी आरोप केले म्हणून पवार न्यायालयातही गेले नाहीत की त्यांनी कुठल्या पोलीस ठाण्याचाही आधार घेतला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौर्‍यादरम्यान झालेल्या सुरक्षेतील त्रुटींमुळे मागे परतावं लागणं ही बाब कोणालाही भूषणावह नाही. राजकीय वैर कितीही असलं तरी पंतप्रधानांच्या सुरक्षेसंबंधी कुठलीही तडजोड करता नये. पंजाबच्या गृहविभागाच्या अर्धवटपणाचा हा प्रताप त्या सरकारला भोगावा लागेलच. पण त्यानिमित्त टीका झाली म्हणून गुन्हे दाखल करण्याची भाषा वापरणं हे गैरच नव्हे तर कायदा आपल्यासाठीच राबतो, असं समजण्यासारखं आहे.

असे गुन्हे नोंदवायचा निर्णय काँग्रेसचे नेते, उध्दव ठाकरेंनी वा त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी घेतला असता तर टीका करणार्‍या भाजप नेत्यांची काय अवस्था झाली असती, हे एकदा प्रदेशाध्यक्षांनी पाहिलं पाहिजे. उध्दव ठाकरेंचा बाप काढणार्‍या आशिष शेलार यांनी मुंबईच्या महिला महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कोणत्या शब्दात टीका केली होती हे पाटलांना ठावं नसेल? किरीट सोमय्या यांनी विरोधकांवर आरोप करताना कोणती संहिता पाळली, याचा हिशेब कोणी विचारला तर त्याला उत्तर काय असेल? राजकारणात असे गुणदोष असतातच. एकमेकांवर टीका करूनही आपल्यात दुरावा निर्माण होणार नाही, असं वातावरण असलं पाहिजे. भाजपच्या नेत्यांनी ज्यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली त्यांनी ते तत्व पाळलं नसतं तर आज परिस्थिती हाताबाहेर गेली असती. पोलीस ठाण्यात आणि न्यायालयातही त्यांना खेटे मारावे लागले असते. पोलीस ठाण्यात केसेस टाकणं हे भाजप नेत्यांचा हातचा खेळ झाला. कुठेतरी राहुल गांधी यांनी संघावर टीका केली म्हणून त्यांच्याविरोधात भिवंडीच्या कोण्या कार्यकर्त्याने पोलीस केस करावी, हा त्याचा मूलभूत अधिकार असला तरी तो याच राज्यात का वापरला जातो, हे चंद्रकांत पाटलांच्या आवाहनावरून कळायला वेळ लागत नाही. असे गुन्हे दाखल करून राजकारणात वैर वाढवण्याचा उद्योग चंद्रकांत पाटलांना करायचा असेल तर तो महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकारणाला रसातळाला नेण्यास कारण ठरेल.

First Published on: January 10, 2022 5:45 AM
Exit mobile version