हम करे सो कायदा…

हम करे सो कायदा…

central agency

आणखी एक चर्चा जोरात सुरू आहे ती म्हणजे केंद्रीय स्वायत्त संस्थांचा गैरवापर. सीबीआय, ईडी या संस्थांची नको तेवढी अलीकडच्या काळात होणारी चर्चा आणि गैरवापर त्या त्या राज्यातील विकासाला हानिकारक ठरत आहे. याचा सूक्ष्म अभ्यास केल्यावर हेच दिसते की, ‘हम करे सो कायदा’ याच भूमिकेतून जर काही गोष्टी होत असतील तर सर्वसामान्यांच्या पथ्यावर पडत असतात. युवकांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपला स्वतःचा मार्ग निवडला तर काहीतरी योग्य साध्य होऊ शकते. पण डोळे झाकून एखादा आदर्श निवडला की, आपली अवस्था इकडे आड तिकडे विहीर होते.

उन्हाळा सुरू झाला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणातली उष्णता शरीराची लाही लाही करत आहे. त्यातच भोंग्याचं राजकारणदेखील तितकचं तापत आहे. यामध्ये नुकसान कुणाचे आणि फायदा कुणाचा हे ओळखण्यासाठी जनता एवढी दूधखुळी नाही हेही तितकेच खरे… पण या गोष्टींच्या पाठीमागे धावत जाऊन स्वतःचे नुकसान करून घेणारे काही महाभाग असतात. कुठेतरी काहीतरी नवीनतेचा ध्यास घेणार्‍या पिढीला वेगळ्या मार्गाला लावणारे कोणत्याही काळात कमी नाहीत. सगळीकडेच राजकारण तापत असताना तरुणांचा वापर भलत्याच कामासाठी करून घेणार्‍या राजकीय व्यक्ती स्वतःची पोळी भाजू पाहत आहेत. वैयक्तिक राजकारण ज्यावेळी शिगेला पोहोचते त्यावेळी तेथील जनतेला याचे परिणाम भोगावे लागतात. परिणामी विश्वासार्हता कमी होऊन पाठिंबादेखील कमी होतो हे आजच्या राजकीय व्यक्तींना कळू नये ही मोठी शोकांतिका आहे. पूर्वीच्या काळी विरोधक एकमेकांचा आदर करून सभागृहात बोलत असत. एवढेच नव्हे तर कोणी उभा राहून बोलत असेल तर तेवढ्याच ताकतीने ऐकून घेत असत, वैचारिक विरोध होत असे. पण आज मात्र तशी परिस्थिती सभागृहांमध्ये काय कुठेच पाहायला मिळत नाही. आणि ही या काळाची भाषा होऊ शकत नाही हे आपण मान्य केले पाहिजे.

आणखी एक चर्चा जोरात सुरू आहे ती म्हणजे केंद्रीय स्वायत्त संस्थांचा गैरवापर. सीबीआय, ईडी या संस्थांची नको तेवढी अलीकडच्या काळात होणारी चर्चा आणि गैरवापर त्या त्या राज्यातील विकासाला हानिकारक ठरत आहे. याचा सूक्ष्म अभ्यास केल्यावर हेच दिसते की, ‘हम करे सो कायदा’ याच भूमिकेतून जर काही गोष्टी होत असतील तर सर्वसामान्यांच्या पथ्यावर पडत असतात. युवकांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपला स्वतःचा मार्ग निवडला तर काहीतरी योग्य साध्य होऊ शकते. पण डोळे झाकून एखादा आदर्श निवडला की, आपली अवस्था इकडे आड तिकडे विहीर होते.
या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर सध्या आणखी एक मजेशीर गोष्ट सुरू आहे जी आजच्या युवकांना अधोगतीकडे घेऊन जात आहे. किंबहुना नुकसानदायी ठरत आहे. ती गोष्ट म्हणजे सध्या सुरू असलेले आयपीएल क्रिकेट… सुरुवाती- सुरुवातीला खेळ म्हणून पाहणारे युवक आता आयपीएल वर सट्टा लावत आहेत. ड्रीम इलेव्हन, गेम जी, माय इलेव्हन सर्कल या आणि अशा विविध बेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून रीतसर हजारो रुपये युवक या मॅचमध्ये लावतात. चार तास कोट्यवधीची स्वप्नं पाहणारे युवक शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त विनिंग झोनमध्ये राहतात. मॅच पाहत असताना प्रत्येक वेळी अपडेट पाहणे, आपल्याला किती पॉईंट्स मिळाले हे पाहणे, तसेच इतरांच्या आणि आपल्या टीममध्ये काय फरक आहेत हे पाहणे यामध्ये चार तास कसे निघून जातात हे देखील समजत नाही. परिणामी वेळ तर वाया जातोच जातो सोबतच खिशात असणारे पैसे जातात. जरी ह्या गोष्टी कायदेशीर असल्या तरी नुकसान मात्र ठरलेले आहे. एखाद-दुसर्‍या मित्राला हे बक्षीस प्राप्त होते. पण असे हजारो युवक आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे बक्षीस मिळत नाही. एकीकडे ‘दिमाग का खेल ’ असे सांगितले जाते पण वास्तव हे देखील आहे की, एनवेळी वेगळीच टीम समोर येऊन पहिल्या क्रमांकाचे बक्षीस जिंकते. यात देखील मोठ्या प्रमाणात फ्रॉड होऊ शकतो आजचा युवक हे विसरलेला दिसतो. एखादा चित्रपट पाहताना किंवा सिरीयल पाहत असताना प्रत्येक वेळी अशा बेटिंग अ‍ॅपच्या जाहिराती एवढा भडीमार करतात की, युवक तिकडे आपोआप ओढला जातो.

हे सर्व आजूबाजूचं आभासी आणि फसवं वातावरण पाहिल्यानंतर प्रत्येक वेळी आम्हा युवकांना प्रश्न पडतो की, आपल्या करियरची सुरुवात नेमकी कुठून करावी. तर याचे उत्तर आपल्याला स्वतःजवळ सापडेल. एखादी सक्सेस स्टोरी आपल्यासमोर असेल तर त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. सुरुवात कुठून करावी..? हा जर प्रश्न वारंवार पडत असेल तर मला वाटतं सुरुवात कुठूनही करता येऊ शकते. इथे प्रवीण तांबे या अष्टपैलू क्रिकेटरचं उदाहरण देणं महत्त्वाचं वाटतं. नुकताच प्रदर्शित झालेला ‘कोण प्रवीण तांबे’ हा चित्रपट पाहण्यात आला. बालपणापासून क्रिकेटचे वेड असणारा प्रवीण तांबे वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत एका संधीची वाट पाहत होता. जिद्द चिकाटी आणि मेहनत काय असते हे प्रवीण तांबेकडं आजच्या काळात पाहून शिकता येतं. प्रत्येक वेळी यश पदरात मिळालं पण जे ठरवलं होतं ते मात्र त्याला मिळालं नाही. रणजी क्रिकेट खेळण्याचा त्याचं स्वप्न अखेर त्याने वयाच्या 41 व्या वर्षी पूर्ण करून दाखवलं. मनामध्ये इच्छा असेल तर आपल्यासाठी मार्ग खुले होऊ शकतात. हेच प्रवीणचा जिद्दीचा प्रवास सांगून जातं.

इथे आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक वेळी आजच्या युवकांना केअरलेस आणि युझलेस समजणं… कदाचित हे दोन पिढ्यांमधल्या अंतर असू शकत. आजचा युवक हा केअरलेस नाही असे कधीकधी वाटते. पण त्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं….तसेच आजचा युवक युजलेस नाही, पण त्याचा वापर करून घेणं तितकंच महत्त्वाचं. कारण युवकांची क्रयशक्ती उगाचच वाया जाऊ देण्याऐवजी त्याला चांगल्या कामात गुंतवून ठेवून त्याच्या अर्थार्जनासाठी फायदा होऊ शकतो. प्रत्येक वेळी आपल्याकडे युवा धोरण येतं पण कागदावरच राहतं. बेरोजगारी ही समस्या आजचा तरुण समोरची आहे. नेमके हेच ओळखून काही कंपन्या अशाप्रकारे वेगवेगळे अ‍ॅप निर्माण करतात की युवकांनी त्यामध्ये गुंतून राहावे. अशाच प्रकारचे रमी सर्कल हे अ‍ॅप देशभरात कार्यरत आहे. सुरुवाती सुरुवातीला थोडेफार पैसे जिंकू देणे आणि नंतर मात्र खिशातून पैसा काढून घेणे. हे तत्व या सर्व कंपन्यांचे आहे. आजच्या युवकांनी या काळाची फसवी पावले ओळखून स्वतःला सावध करणे गरजेचे आहे. आपल्या वेगळ्या संधी ओळखून आहे त्याच ठिकाणाहून, त्याच वेळेपासून सुरूवात केली तर येणारा दिवस आपला असेल हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. असेही व्यक्तींची सुद्धा आपल्या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जाहिरात होते की तो व्यक्तीच आपले दैवत आणि सर्व काही वाटून. आपण हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे की व्यक्तीपूजा ही माणसाला सर्वनाशाकडे घेऊन जात असते. आपला फायदा व ओळखून संभाव्य नुकसान टाळयचे असेल तर आजच्या काळातल्या व्यक्ती पूजेला पूर्णविराम देणे कधीही चांगले.

– धम्मपाल जाधव

First Published on: April 10, 2022 6:00 AM
Exit mobile version