स्वामीनिष्ठ…

स्वामीनिष्ठ…

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

जटायू हे तसे पाहता रामायणातील पात्र! जटायू म्हणजे एक पक्षी, असे अनेकजण म्हणतील! पण, जटायू म्हणजे पक्षी नसून ती एक निष्ठा आहे!! आपल्या स्वामीच्या पत्नीला रावणाने पळवून नेल्यानंतर त्याला अडवण्यासाठी प्राणाची आहुती देणारे दैवी पात्र म्हणजे जटायू. कोणत्याही पक्ष्याचे पंख हेच त्याची ताकद असते. मात्र, आपली आपली स्वामीनिष्ठा टिकवण्यासाठी आपल्या पंखांचे बलिदान देऊन स्वामीच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करणारे फार दुर्मिळ असतात. सद्याच्या राजकीय पातळीवर पाहिल्यास असे जटायू कुठेच दिसत नाहीत.विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या उड्या मारल्या गेल्या त्या उड्यांकडे पाहिल्यास निष्ठेची विष्ठा करण्यावरच अनेकांचा भर असतो असे म्हणता येईल . अशा परिस्थितीमध्येही आपल्या साहेबांच्या म्हणजेच शरद पवारांसाठी आपली राजकीय कारकिर्द पणाला लावून जटायूची भूमिका पार पाडणारे एकमेव व्यक्तीमत्व सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे… त्या व्यक्तीमत्वाचे नाव आहे, डॉ. जितेंद्र सतीश आव्हाड!!

सन 2014 मध्ये मोदी लाट उसळली होती. या लाटेत अनेक भल्याभल्यांना पराभव पत्करावा लागला. 15 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. पण, सत्तेवर आलेले लोक हे धर्मनिरपेक्षता जपणारे नव्हते. त्यामुळे त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न सर्वात आधी आव्हाड नावाच्याच माणसाने केला. त्यामुळे या माणसाची शिव-शाहू-फुले आंबेडकरी विचारधारेप्रती असलेली प्रखर निष्ठा अधोरेखीत होत होतीच. अर्थात, हे सर्व विचार आणि त्या विचारांप्रती असलेली निष्ठा जन्माला आली कुठून? याचा शोध घेतला तर ती शोषणातूनच आलेली आहे, हेच स्पष्ट होते. कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या बंजारा/ वंजारी कुटुंबात जन्माला आल्यानंतर केवळ वैचारिक निष्ठा कायम असल्यामुळेच आज या राज्यातील सर्वात यशस्वी आमदार व आता राज्यातील महाविकास आघाडी च्या ठाकरे सरकार मध्ये ते गृहनिर्माण मंत्री म्हणून सक्षम पणे काम करत आहेत.

वास्तविक पाहता, या देशाच्या सामाजिक उतरंडीमध्ये बंजारा किंवा वंजारी समाजाला फारसे मानाचे स्थान नाहीच! त्यामुळेच या जातीलाही शोषणाचे चटके बसलेच आहेत. पण, असे म्हणतात की, चटके बसल्याशिवाय भाकर भाजली जात नाही. त्यामुळेच शिक्षण नावाच्या वाघिणीचे दूध पिऊन नामदार आव्हाडांनी आपली वैचारिक निष्ठा प्रबळ केली. आज या निष्ठेच्या जोरावरच त्यांना या देशातील अनेक राजकीय-सामाजिक नेतेमंडळी आपल्या मांडीला मांडी लावून बसवत आहेत.
जितेंद्र आव्हाड या माणसाची राजकीय कारकिर्द किती वर्षांची आहे, याच्याशी कोणाला काही देणेघेणे नाही. पण, या माणसानेे शकडो वर्षांचे सामाजिक आयुष्य जगले आहे, असे ठामपणे म्हणावेसे वाटते. त्याला कारणही तसेच आहे. कारण, शिवरायांचा इतिहास सांगणारे लोक महाराष्ट्रात कमी नाहीत; पण, शिवराय जगणारे सध्या तरी आव्हाड हे एकटेच आहेत, असे म्हणणे संयुक्तीक आहे. कारण, खर्या- खोट्या इतिहासाच्या फंदात न पडणारे अनेक विचारवंत जेव्हा घरात बसले होते. त्यावेळी याच माणसाने जेम्स लेनच्या द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकातील आपल्या राजमातेचा इतिहास कलंकित करणार्यांचा समाचार घेतला. याच जेम्स लेनला मदत करणार्यांना धडा शिकवण्यासाठी राज्यभर पायाला भिंगरी लावून सान पेटवले…. ही होती वैचारिक निष्ठा!!

सध्या गांधीवादी नेते हाताच्या बोटावर उरले आहेत. पण, गांधीजींवरील टीकात्मक हल्ला परतवून लावण्याचे सामर्थ्य एकाही गांधीवाद्यांमध्ये नसताना गांधी नावाचे एक वादळ आपल्यामध्ये जीवंत ठेवण्याची ऊर्जा जितेंद्र आव्हाड यांच्यामध्येच आहे. गांधी हत्येचे समर्थन करणारा एक वर्ग निर्माण होत असतानाच गांधींच्या हल्लेखोरी वृत्तीचा समाचार घेण्यासाठी आजही त्यांचा लढा सुरुच आहे… ही आहे गांधी निष्ठा!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातील प्रत्येक व्यक्तीला मानाचे स्थान दिले. त्यांच्या या योगदानाला विसरणे म्हणजे, आपल्या बापाला विसरण्यासारखे आहे, असे विचार बर्याचदा आपल्या भाषणातून मांडणारे डॉ. जितेंद्र आव्हाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व देऊन आहेत. म्हणूनच तर जेव्हा या देशात जेव्हा झुंडशाहीने दलित, मुस्लीमांचे बळी घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी सर्वात आधी रस्त्यावर उतरण्याचे धारीष्ट्य जितेंद्र आव्हाड यांनीच दाखवले होते. देशातील अनेक नेते जेव्हा, पराभूताच्या मानसिकतेमध्ये जगत होते. त्यावेळी जितेंद्र आव्हाड हेच संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. या देशात संविधानाची होळी करण्यात आली. त्यावेळी समविचारी नेत्यांना एकत्र करुन संविधान मार्च काढण्याची हिम्मत फक्त त्यांनीच दाखविली होती. मोहसीन खान, जुनैद, अखलाक यांच्यासह गुजरातमधील दलितांवरी हल्ले रोखण्यासाठी आक्रमकता धारण करुन लोकांना संविधानिक हक्कांसाठी संघर्ष करण्याची त्यांची लढाई संविधानावरील निष्ठेतूनच आली होती.

कार्यकर्त्यांच्या बाबतीत असे म्हटले जाते की कार्यकर्त्याने आपल्या नेत्याप्रती निष्ठावंत असले पाहिजे.. मग, नेत्याचे काय?डॉ. आव्हाड हे आपल्या नेत्याप्रती निष्ठावंत आहेत, यात वाद असण्याचा प्रश्नच नाही. पण, ते आपल्या कार्यकर्त्यांसाठीही प्रचंड निष्ठावंत आहेत. त्यामुळेच तर कधी काळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्षपदाला लाथ मारली होती. अशी निष्ठा सध्या तरी कोणत्याच नेत्यात दिसत नाही. उलटपक्षी कार्यकर्त्यांना एखाद्या बिस्कीटच्या पुड्याला असलेल्या वेष्टणासारखे समजून फेकून देणार्या नेत्यांचीच संख्या अधिक आहे. अशा स्थितीमध्ये आव्हाडांची ही कार्यकर्तानिष्ठा वाखाणण्याजोगीच आहे.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंपाची स्थिती निर्माण झाली होती . राज्यभरातील नेते सत्तेच्या बाजूला जात होते . अशा स्थितीमध्ये राष्ट्रवादीचा किल्ला सांभाळण्याचे काम जितेंद्र आव्हाड हेच अत्यंत चोखपणे करीत होते . अर्थात हे काम ते आज करीत नाहीत; तर, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे हे काम सुरु आहे. त्यासाठीच त्यांचा लढा सुरु आहे. ज्या वेळी शरद पवार यांच्या मांडीचे ऑपरेशन होते. त्यावेळी शरद पवार यांची बाजू पत्रकारांसमोर मांडण्यासाठी जितेंद्र आव्हाड हेच पुढाकार घेऊन गेले होते. शरद पवार यांच्याबाबतीत झालेला

एकही आरोप किवा टीका परतवून लावण्यासाठी छातीचा कोट करण्याची वृत्ती धारण करण्याची हिम्मंत जितेंद्र आव्हाड यांच्यामध्येच आहे. त्यामागे कारण आहे ते फक्त निष्ठेचे!! कारण, पवार यांच्यावरील त्यांची निष्ठा!!! शरद पवारांनी ज्यांना ज्यांना घडवले. त्यांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यावेळी शरद पवार नावाच्या या वादळाला साथ देण्यासाठी आव्हाड सज्ज झाले. जितेंद्र आव्हाड हे नावच मूळात शरद पवार यांनी प्रस्थापित केले आहे, असे आव्हाडांचे म्हणणे आहे. ही राजकीय निष्ठा खचीतच कोणामध्ये दिसून येते. अन् सर्वात महत्वाचे म्हणजे आव्हाडांची जनतेप्रती असलेली निष्ठा अत्यंत महत्वाची आहे… म्हणूनच तर, आम्हाला 15 वर्षे सत्ता मिळाल्याने ग ची बाधा झाली होती. ती जनतेने 2014 साली उतरविली, असे ठामपणे म्हणतात. ही जनतेप्रती असलेली निष्ठाच त्यांना उदंड आयुष्य देउण जाणार आहे.

या सर्व निष्ठा जोपासताना नक्कीच स्व उत्कर्ष साधता येणार नाही, हे शेंबडं पोरगंही सांगेल. बलाढ्य अशा सत्ताधार्यांपुढे, प्रस्थापित समाजव्यवस्थेपुढे तळागाळातून आलेल्या या जितेंद्र आव्हाड नावाच्या माणसाला मोठा संघर्ष करावा लागला व भविष्यात ही हा संघर्ष अधिक तीव्र करावा लागेल , हे उघड आहे. तरीही, आव्हाड लढत आहेत. म्हणूनच तर ते आजच्या परिस्थितीतील राजकीय जटायू ठरत आहेत.

First Published on: August 5, 2020 1:48 PM
Exit mobile version