दाक्षिणात्य सौंदर्याची मोहर

दाक्षिणात्य सौंदर्याची मोहर

(फोटो प्रातिनिधिक आहे)

देशभरातील निवडक २९ सौंदर्यवतींमधून सर्वात सुंदर चेहरा शोधण्याचा सोहळा म्हणजे फेमिना मिस इंडिया ही स्पर्धा. यंदाच्या स्पर्धेत तामिळनाडूच्या अनुकृती वासने हा किताब पटकावला. हरियाणाची मीनाक्षी चौधरी द्वितीय ठरली. तर या स्पर्धेत श्रेया राव या आणखी एका दाक्षिणात्य सुंदरीने तृतीय क्रमांक मिळवला.त्यामुळे एकूणच या वर्षीच्या स्पर्धेवर दाक्षिणात्य सौंदर्याची छाप पडली असं म्हणायला हरकत नाही.

‘मिस इंडिया २०१८ चा किताब तामिळनाडूच्या अनुकृती वास हिने पटकवला. हरियाणाची मीनाक्षी चौधरी ही फर्स्ट रनर अप तर आंध्र प्रदेशची श्रेया राव दुसरी रनर अप ठरली. मुंबईमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी माजी मिस इंडिया मानुषी छिल्लर हिने अनुकृतीला मिस इंडियाचा मुकुट घातला. मीनाक्षी चौधरी हिला सना दुआने मुकुट घातला. श्रेया रावला बिहारच्या प्रियांका कुमारीने मुकुट घातला. बॉलीवूड तारकांच्या झगमगाटाने सजलेल्या या सोहळ्यात जॅकलिन फर्नांडिस हिने ‘देसी गर्ल’ या गाण्यावर नृत्य केलं तर माधुरी दीक्षित आणि करीना कपूर यांनीही नृत्याची अदाकारी पेश केली. करण जोहर आणि आयुष्यमान खुराणा यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत उपस्थितांचं मनोरंजन केलं. यावेळी टॉप फाईव्हमध्ये वरील तिघींसह दिल्लीची गायत्री भारद्वाज आणि झारखंडची स्टेफी पटेल यांच्यामध्ये स्पर्धा होती पण अनुकृती या सर्वांमध्ये वरचढ ठरली. या स्पर्धेदरम्यान हरियाणाची मीनाक्षी चौधरी ‘मिस फोटोजेनिक, ‘मिस टेक ब्युटी आश्ना गुरव, अनुकृती व्यास ‘मिस ब्युटीफुल स्माईल किताबाच्या मानकरी ठरल्या. आंध्र प्रदेशची श्रेया राव ‘मिस मल्टीमीडिया किताबाची मानकरी ठरली. देशातील चार झोन्समधून एकूण २९ सौंदर्यवती या फेरीत पोहोचल्या होत्या. त्यांचं मेंटॉरिंग करण्यात आलं होतं. पूर्व झोनची मेंटॉर होती मिस इंडिया २००९ पूजा चोप्रा. पश्चिम आणि दक्षिण झोनच्या मेंटॉर होत्या अनुक्रमे मिस इंडिया युनिव्हर्स २०१० पूजा हेगडे आणि रकूलप्रीत सिंग, तर उत्तर झोनची मेंटॉर होती नेहा धुपिया.

सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा मिलाफ असलेली रुपगर्विता शोधणं या स्पर्धेचा मुख्य उद्देश असतो. स्पर्धेत निवड होण्यासाठी देशभरातून अनेक सौंदर्यवती प्रयत्न करत असतात. पण अंतिम स्पर्धेपर्यंत केवळ पाचच पोहचू शकतात. या स्पर्धेत तुम्ही सुंदर आणि आकर्षक असून चालत नाही तर तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे याकडेही परीक्षकांचं लक्ष असतं. तुम्ही एखाद्या समस्येवर कशा प्रकारे उत्तर शोधता हे देखील या स्पर्धेमध्ये पाहिलं जातं. सामाजिक जबाबदाऱ्यांबाबत असणाऱ्या सजगतेचाही विचार विजेतीची निवड करताना केला जातो. मुळात सर्वगुणसंपन्न व्यक्ती म्हणून वावरताना केवळ शारीरिक सौंदर्य महत्त्वाचं नसतं, ही बाब या स्पर्धेमधून अधोरेखित केली जाते. त्यामुळेच स्पर्धेला सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा संगम असणारी स्पर्धा म्हटलं जातं. या स्पर्धेचे परीक्षक विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी असतात. स्पर्धकाचं सर्व बाजूने परीक्षण करता यावं हा देखील या मागचा हेतू असतो.

या वेळच्या स्पर्धेत मानुषी छिल्लर, क्रिकेटर के. एल. राहुल, इरफान पठाण, बॉबी देओल, कुणाल कपूर, मलाईका अरोरा, गौरव गुप्ता, फाये डिसुजा यांनी परीक्षणाचं काम केलं. या स्पर्धेत विविध फेऱ्यांमधून सौंदर्यवतीची परीक्षा पाहिली जाते. प्रश्नोत्तर फेरी, इंडियन कूचर फेरी, इव्हिनिंग कूचर फेरी आणि एफबीबी डिझाईन फेरी अशा क्रमानं चार फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा घेतली जाते. प्रत्येक फेरीमध्ये निकषांची चाळणी लावली जाते आणि अत्यंत निवडक सौंदर्यवतीच अंतिम फेरीपर्यंत पोहोचतात. त्यानुसार पहिल्या फेरीत १४ तरुणी बाद ठरल्या तर दुसऱ्या फेरीसाठी १५ जणींची निवड झाली. या १५ पैकी पाचजणी अंतिम फेरीपर्यंत पोहोचल्या. या पाचजणींमधून किताबासाठी अनुकृतीची निवड झाली. एकोणीस वर्षीय अनुकृती चेन्नईच्या लॉयला कॉलेजमध्ये शिकते. स्वत:ला सामान्य मुलगी समजणाऱ्या अनुकृतीला साधं राहायला आवडतं. खरं तर तिला टॉमबॉय लूकमध्ये राहायला आवडतं. त्यामुळे तिच्यासाठी टॉमबॉय ते सुकोमल रुपगर्विता हा प्रवास नक्कीच आव्हानात्मक होता. तिला नृत्य आणि प्रवासाची आवड आहे. अनुकृती तामिळनाडूमधील त्रिची या शहरात वाढली. एका परंपरावादी घरात ती लहानाची मोठी झाली. संध्याकाळी सहानंतर मुलींनी घराबाहेर पडायचं नाही असा दंडक असलेल्या घरातील मुलीने या किताबाला गवसणी घालणं ही साधीसुधी बाब नाही. अनुकृतीच्या मते, ‘मुलींना चुकीच्या रुढी पाळायला लावणं हे त्यांची प्रगती रोखण्यासारखंच आहे. मी एक मुलगी म्हणून कोणत्याही अनिष्ट प्रथेला स्वत:पर्यंत फिरकू न देण्याचा प्रयत्न करत असते. माझ्याकडून इतर मुलींनी प्रेरणा घ्यावी आणि मार्ग निर्धारीत करावा. त्यानंतर यश तुमचंच असेल.

लॉयला महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या अनुकृतीला साहित्यातही रुची आहे. तिने अभ्यासासाठी फ्रेंच साहित्याची निवड केली आहे. ती केवळ अभ्यासू किडा नाही तर उत्तम खेळाडूदेखील आहे. अनुकृतीला जगभर फिरण्याची इच्छा आहे. तिला साहसी क्रीडाप्रकार विशेष आवडतात. मित्रमैत्रिणींनी सुचवल्यावरून तिने पॅराग्लायंडिंग हा प्रकार अनुभवायचं ठरवलं आहे. याशिवाय अॅथलीट असल्यामुळे अशा क्रीडाप्रकारांसाठी आवश्यक असलेली तंदुरुस्तीही तिच्यात आहे. पॅराग्लायडिंगसाठी तिने हिमाचलला जाण्याची इच्छाही प्रदर्शित केली आहे. अनुकृतीचा आणखी एक शौक म्हणजे मोटारबाईक चालवणं. तिला सुसाट वेगाने बाईक पळवायला आवडतं. फॅशन दिवा म्हणून प्रसिद्ध असलेली सोनम कपूर, कायली कार्दिशियन तिच्या फॅशन आयडॉल आहेत. अभिनेत्यांमध्ये रणवीर सिंग तिला आवडतो. तिला लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होती. सूपरमॉडेल बनण्याचं तिचं स्वप्न या किताबामुळे पूर्ण झालं आहे.

या स्पर्धेत दुसरी आलेली मीनाक्षी चौधरी मूळची हरियाणाची आहे. तिचे वडील आर्मीतून निवृत झाले आहेत. त्यामुळे शिस्त काय असते याची तिला पूर्ण जाणीव आहे. खरं तर तिला डॉक्टर व्हायचं होतं, त्यानुसार बीडीएसला अॅडमिशनही घेतली पण आकर्षक व्यक्तिमत्वामुळे या क्षेत्राचा मोह पडला. त्यानंतर सौंदर्यस्पर्धांमधला तिचा प्रवास सुरू झाला. या स्पर्धेत श्रेया राव काम वरापु तृतीय ठरली. मूळची आंध्र प्रदेशची असलेली श्रेया या स्पर्धेत अनुकृतीनंतर दुसरी दाक्षिणात्य सौंदर्यवती आहे. श्रेयाचा जन्म १९९९ मध्ये हैद्राबाद इथं झाला. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असलेल्या श्रेयाचं या स्पर्धेतील विजयानंतर फॅनफॉलोइंर्गही वाढलं आहे. याआधीही तिने अनेक सौंदर्यस्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्यामुळे सौंदर्यस्पर्धांमध्ये स्वत:ला कसं सादर करावं याची तिला पुरेपूर जाणीव आहे. २०१७ मध्ये तिने मिस आंध्र प्रदेशचा किताब पटकवला होता. श्रेया पेशाने आर्किटेक्ट आहे. श्रेया केवळ अभ्यासातच हुशार नाही तर उत्तम खेळाडूदेखील आहे. ती राज्यस्तरीय बास्केटबॉल खेळाडूही आहे. फिटनेसबाबत जागरुक असलेल्या श्रेयाला चित्रकलेची विशेष आवड आहे.


– अमृता पाटील

First Published on: June 29, 2018 12:57 PM
Exit mobile version