करोना आणि मृत्यूनंतरची फरपट

करोना आणि मृत्यूनंतरची फरपट

दोन दिवसांपूर्वी सायन रुग्णालयातल्या कोविड १९ वार्डातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. वार्डातल्या खाटांवर काळ्या रंगाच्या प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवलेले करोनाग्रस्तांचे मृतदेह आणि त्यांच्या बाजूच्याच कॉटवर करोनावरच उपचार घेणारे रुग्ण बघून भल्याभल्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. करोनाच्या संसर्गाचा धोका माहीत असूनही मृतदेह तात्काळ शवागरात न नेता वॉर्डात ठेवल्यावरून सायन रुग्णालय प्रशासन व महापलिकेला सगळ्यांनीच धारेवर धरलं, पण यावर काही तांत्रिक कारणाबरोबरच करोना मृतांचे नातेवाईकच मृतदेह घ्यायला येत नाहीत, असे रुग्णालय प्रशासनाने दिलेलं थंड उत्तर सगळ्यांनाच निरुत्तर करून गेलं. कारण कटू असलं तरी ते सत्य आहे.

कारण आपण तर करोनाची लागण झाल्याचं कळाल्यापासूनच संसर्गाच्या भीतीने त्या रुग्णाला व त्याच्या कुटुंबाला प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे बहिष्कृत केलेलं असतं. तिथूनच तर खरी त्याची लढाई सुरू होते. जर करोनाशी लढून तो बरा होऊन घरी परतला तर टाळ्या व ढोलताशाच्या गजरात त्याचं स्वागत केलं जातं, पण जर तो करोनाशी लढता लढता हरला आणि गेला तर…. त्याच्या जाण्याच्या दु:खापेक्षा आपला हल्ली कुठे त्याच्याशी किंवा त्याच्या कुटुंबियांशी संपर्क तर झाला नव्हता ना हे आठवण्यासाठी आपण मेंदूच्या नसांवर ताण देत असतो. तेव्हा सगळ्या माणुसकीच्या संवेदना आटलेल्या असतात. डोक्यात भिनत असतो तो फक्त आपला जीव कसा वाचवता येईल याचा विचार. संसर्ग होण्याइतपत आपण त्याच्या संपर्कात नव्हतो याची खात्री पटली की मग कुठे जीव भांड्यात पडतो. त्याचदरम्यान मग मध्येच देशविदेशातील सायन रुग्णालयातील व्हिडिओ सारखे असंवेदनशील वाटणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. आपण पुन्हा ते बघून काही क्षणांपुरते संवेदनशील होतो, पण काही वेळापुरतेच. कारण सध्यातरी भारतातच नाही तर जगभरात संसर्गाच्या भीतीने करोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईक पुढे धजावत नसल्याचेच चित्र पाहावयास मिळत आहे.

करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून मृत्यूनंतरही विषाणूचा प्रसार होतो या समजातूनच करोनाग्रस्ताला मृत्यूनंतर खांदा द्यायला तर सोडाच; पण रुग्णालयातून त्याचा मृतदेह नेण्यासही नातेवाईक पुढे येईनासे झाले आहेत. यामुळे करोनाची लागण ते मृत्यूनंतरचा करोनाग्रस्तांचा प्रवास शारीरिक यातनेबरोबरच मानसिक यातना देणारा ठरत आहे. असंच काहीसे चित्र लेटीन अमेरिकेतील एक्वेडोर येथे पाहायला मिळत आहे. येथे तर करोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठीही जागा शिल्लक नसल्याने अनेक जणांचा उपचाराविना घरातच मृत्यू झाला, पण हे मृतदेह दफन करण्यासाठीही दफनभूमीत जागाच शिल्लक नाहीये. यामुळे हे मृतदेह घराबाहेर ठेवण्यात येत असून आरोग्य कर्मचारी क्रमवारीप्रमाणे गल्लोगल्लीत फिरून हे मृतदेह गोळा करतात. नंतर शहरापासून लांब असलेल्या मोकळ्या जागी या मृतदेहांचे सार्वजनिक दफन करण्यात येत आहेत, तर अनेक ठिकाणी मृतांच्या तुलनेत ते उचलणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांची संख्या अपुरी पडत असल्याने रस्त्याच्या कडेला पाच सहा दिवसांपासून पडलेले मृतदेहाचे खच दिसत आहेत, तर स्पेन, इराक, इटली मध्येही थोड्याफार फरकाने अशीच काहीशी परिस्थिती आहे. करोनाचा संसर्ग होईल या भीतीने घरातल्या व्यक्तीच मृतदेह रस्त्यावर टाकत असतानाचे विदारक दृश्य आजही युरोपात बघायला मिळत आहे. अमेरिकेतही करोना मृतांपासून कुटुंबियांनी पाठ फिरवल्याने अनेक मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत रस्त्याच्या कडेला उभे करण्यात आलेल्या तात्पुरत्या शवागरात व फ्रिझर ट्रकमध्ये पडून आहेत. यामुळे चौदा दिवसांच्या आत मृतदेहाचा ताबा घेण्यास नातेवाईक न आल्यास सरकार मृतदेहाची विल्हेवाट लावेल, असे फलकच जागोजागी लावण्यात आले आहेत.

करोना हा जीवघेणा असल्याने व मृत्यूनंतरही त्याचे व्हायरस मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांवर असण्याची शक्यता असल्याने चीनने मात्र मृतदेहाची विल्हेवाट सरकारच लावेल असे आधीच सांगितले होते. यामुळे चीनमध्ये मृतदेहांची एवढी हेळसांड झाली नाही. कारण दररोज ट्रक भरून मृतदेह गावकुसाबाहेर जाताना नागरिक बघत होते. तिथे ते जाळले जात होते. त्यानंतर त्यांची अस्थी व राख घेण्यासाठी लोकांना टोकन देण्यात आले . जेणेकरून सरकारला त्यांच्या भावनाही जपता आल्या. नागरिकांनीही ते मान्य केले. दरम्यान, करोनाचा संसर्ग मृतदेहातून होतो असा दावा कोणत्याही तज्ज्ञाने केलेला नाही, पण करोना मृतदेह हाताळताना खबरदारी घेणे गरजेचे असल्याने ते सोपस्कार आरोग्य कर्मचार्‍यांनीच करणे आज अपेक्षित आहे. यामुळे एक मात्र खरे करोना हा नुसताच संसर्गजन्य आजार राहिलेला नसून तो माणसासाठी शाप ठरत आहे. यामुळे करोनाने मृत्युमुखी पडलेल्यांची मृत्यूनंतरही फरपट होताना दिसत आहे.

First Published on: May 10, 2020 4:36 AM
Exit mobile version