करोनाला निरोप देण्याची वेळ!

करोनाला निरोप देण्याची वेळ!

करोना विरोधातील युद्ध सुरू झालंय. जगात हाहा:कार माजवणार्‍या या महामारीशी आपणही लढत आहोत, पण या युद्धात अनेक राष्ट्रांनी हात टेकले असले तरी भारत आणि पर्यायाने महाराष्ट्र आणि मुंबई हे या युद्धात जिंकून बाहेर पडतील, हा विश्वास मलाच नाही, तर समस्त जनतेला आहे, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. करोनाच्या या महामारीमुळे ब्रिटिशांच्या काळात पुण्यात आलेल्या प्लेग या साथीच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. प्लेगची लक्षणं दिसून आली की त्याला ओढत नेत रुग्णालयात डांबलं जायचं, अशा नोंदी आहेत. आज तसंच काहीसं आहे. करोनाच्या या महामारीमुळे पसरलेल्या विषाणूची लागण झालेल्यांना रुग्णालयात दाखल केलं जातं. त्यांच्यावर उपचार केले जातात. आसपासच्या लोकांना बाधित किंवा संसर्ग टाळण्यासाठी त्यांना वेगळे ठेवले जातं. त्यांची तपासणी केली जाते. तो काळ आणि आजचा काळ यांची तुलना केली तरी आजच्या प्रगत काळातही या आजाराचे औषध नाही. त्याची लस नाही. असं खेदानं कबूल करावं लागतं. तरीही आपण इतरांच्या तुलनेत यावर मात करणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे. ज्या चीनला आणि इतर राष्ट्रांना या करोनातून सावरण्यासाठी पाच ते सहा महिने घालवावे लागले, तिथं मुंबईसह महाराष्ट्र आणि भारत त्यापेक्षा कमी कालावधीतच करोनामुक्त झालेला असेल.

करोनाचा पहिला रुग्ण मुंबईत ११ मार्च रेाजी सापडला. खरं त्यापूर्वी चीनमधील वुहानसह अन्य राष्ट्रांमध्ये करोनामुळे हाहा:कार माजवला होता. त्यामुळे पहिला रुग्ण आढळून येताच खर्‍या अर्थाने मुंबईसह राज्यात २० मार्चपासून टाळेबंदी अर्थात लॉकडाऊन करण्यात आला. त्यानंतर देशात संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली. परंतु, पहिला रुग्ण मिळाल्यापासून महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आयामावशी व पॅरामेडिकल स्टाफसह रुग्णालयातील सुरक्षा रक्षक व इतर कामगार डोळ्यात तेल घालून आणि जीव धोक्यात घालत २४ तास काम करत आहेत. यासह महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांसह घनकचरा व्यवस्थापन, इतर अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवेचे कामगार झटत आहेत. माझ्यासाठी सीमेवर लढणार्‍या जवानांप्रमाणे, सैनिकांप्रमाणेच हे आहेत. या सर्वांना आपला सलाम. सुरुवातीच्या काळापासून हे सर्व सैनिक दिवसरात्र सेवेत मेहनत घेत आहेत. यातील काहींशी करोनाची गळाभेटच झालेली आहे. त्यामुळे आज कार्यरत असलेल्या डॉक्टर, नर्सेससह इतर रुग्णालयीन कर्मचारी व महापालिकेचे कर्मचारी करोनाला बळी पडत आहेत. मात्र, ही सर्व माहिती लपवण्याचे काम प्रशासनाकडून योग्य प्रकारे होत आहे. जे.जे. रुग्णालय म्हणा किंवा नायर रुग्णालय म्हणा किंवा केईएम म्हणा किंवा शीव रुग्णालय म्हणा, असे सर्वच रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेससह इतर पॅरॉमेडिकल स्टाफना करोनाची लागण होऊनही कोणाचीही माहिती समोर येत नाही. आज प्रत्यक्षात या सर्वांशी करोनाने गळाभेटी करायला सुरुवात केली. त्यामुळे साहजिकच भीती आहे, पण जेव्हा गळाभेट होते, तेव्हा निरोपाची वेळ आलीय हेही सांगत असतं. त्यामुळे डॉक्टर, नर्ससह सर्व कामगार, कर्मचारी आज भलेही करोनाशी गळाभेट करत त्यांच्या गळ्यात माना टाकायला लागला तरी सत्य हेच सांगतंय की करोनाला निरोप देण्याची वेळ आली. करोनाला घातलेली मिठी सोडवत हे कर्मचारी पुन्हा जोशात काम करणार, हेही सत्य आहे.

आज एकत्र रुग्णांची संख्या दिली जात असली मुंबईतील २४ विभागांमध्ये किती रुग्ण आढळून आले आहेत, याची माहिती देत नाहीत. ही आकडेवारी का लपवली जाते. जगाला दाखवण्यासाठी ही आकडेवारी कमी केली जात असली तरी सत्य समोर आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक नागरिक हा प्रकार याचि देहि, याचि डोळा पाहत आहे. केवळ रुग्णांचा नाही तर मृतांचा आकडा कमी करून कसा दाखवता येईल हेच काम प्रशासनातील काही अधिकारी वर्ग करत आहेत ही आकडेवारी एक वेळ लपवता येईल. परंतु, रुग्णालयात होणारी गर्दी, स्ट्रेचर्स, खाटांवर मान टाकणारे रुग्ण आणि त्यांचे गुंडाळून ठेवलेले शव हे सत्यकथन करत असतात. सुरुवातीला झोपडपट्टीत एक रुग्ण आढळून आल्यानंतर आसपासच्या सर्वांना उचलून अलगीकरण केंद्रात नेणारे अधिकारी आता करोनाग्रस्त वगळता सर्वांना घरीच राहण्याची विनंती करतात. त्यातही पॉझिटिव्ह रुग्ण धडधाकट असल्यास त्याला घरी पाठवून देत घरीच राहा, बाहेर पडू नका, असा सल्ला देत पाठवून देतात. ही वस्तुस्थिती दुर्लक्षित कशी करता येईल.

प्रशासन, माध्यमांपासून ही माहिती कशी लपवली जाईल याचीही विशेष काळजी घेत आहे, पण जीव धोक्यात घालणार्‍या या डॉक्टरसह इतरांच्या आरोग्याची काळजी प्रशासन काय घेत आहे. रुग्णालयात जेव्हा करोनाचा रुग्ण येतो, तेव्हा डॉक्टर त्यावर उपचार करतात. त्यांची सुरक्षा म्हणून त्यांना पीपीई किट दिले जाते, मास्क पुरवले जाते, पण करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्या बाधित क्षेत्राची पाहणी करून सर्व्हे करणार्‍या आरेाग्य केंद्रांचे डॉक्टर, नर्स आणि आरोग्य सेविका एकप्रकारे अदृश्य करोनाग्रस्तांचा शोध घेत असतात, पण त्यांना कोणतीही सुरक्षा नाही. सुरक्षा पोशाख अर्थात पीपीई दिला जात नाही की एन -९५सारखं मास्क ना पोषक आहार.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी हाती घेतलेल्या या लढ्यात जर अग्रणी सैनिक जर कोणी असेल तर आरोग्य केंद्र आणि दवाखान्यांमधील डॉक्टर, नर्स आणि आरोग्य सेविका, पण त्यांची आरोग्य सुरक्षा वार्‍यावर आहे. आज याच सैनिकांच्या जोरावर आपण सर्व घरात सुरक्षित राहत आहोत. अधिकारी वर्ग वातानुकूलित कार्यालयात बसून याच सैनिकांच्या जोरावर युद्ध जिंकण्याचे स्वप्न पाहत आहेत. परंतु, हेच सर्व सैनिक आता सलग ५० दिवसांहून अधिक काम करून आता दमलेत, भागलेत. आता काम करण्याची शक्तीच उरली नाही, अशी भावना व्यक्त करताना दिसतात. सध्या करोना विरोधातील युद्धातील हे सैनिक खरोखरच दमलेत, पण मी तर म्हणेन त्यांना दमवले. कारण जेव्हा करोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर डॉक्टर, तसेच रुग्णालयीन कर्मचार्‍यांसह अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवेतील या कामगार, कर्मचार्‍यांचे नियोजन न करताच त्या सर्वांना कामाला जुंपलं गेलं. केवळ आरोग्य खात्याचा कर्मचारीच नव्हे तर गोरगरीब, गरजू तसेच अडकलेल्या निराधार कामगार, कुटुंबांसाठी पुरवल्या जाणार्‍या खिचडी वाटपासाठी करनिर्धारण विभागाचे कर्मचारी असो वा सॅनिटायझेशनच्या कामांमध्ये अग्निशमन दल व किटक नाशक विभागाच्या कर्मचार्‍यांना जुंपवलं गेलं, पण ही कामे नगरसेवकांची मदत घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करता येऊ शकणारी होती. आज नेमके हेच कर्मचारी बाधित होत आहे आणि त्यातील काहींना वीरमरण आले आहे. त्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष युद्धास सुरुवात झाली तेव्हा हे सर्व योद्धेे करोनामुळे बाधित होत घरात निपचित होऊन पडलेत, तर कुणी काम करण्याची इर्षाच न उरल्याने निष्क्रिय होत शस्त्र खाली ठेवताना दिसत आहेत. याला जबाबदार कोण! प्रशासन आणि त्यांचे प्रमुखच ना? सुरुवातीपासून एकाच वेळी सर्वांना पळायला लावल्यानंतर, धावून धावून सर्वच दमतात. तेच आता महापालिका कर्मचार्‍यांसह डॉक्टरांचे झालंय. करोनाला पळवून लावण्यासाठी सर्वच कामगारांना एकाच वेळी त्यांच्या मागे पळवून त्यांना दमवून टाकलंय. आज करोनाचा पाठलाग करताना आपली यंत्रणा दमून गेली. त्यामुळे या सर्वांना लढण्याची ताकद द्यायला हवी, नव्हे तर त्यांचे मनोबल उंचावत पुन्हा लढण्यासाठी तयार करायला हवे.

आज मुंबई महापालिकेचा एकूण कामगार, कर्मचारी हा मुंबईवर आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करत अनुभवातून शिकलाय. त्याला अधिक काही सांगायची गरज नाही. मुंबईतील २६ जुलैचा महापूर असो वा स्वाईन फ्लू, बर्ड फ्लूसह २०१० मध्ये आलेल्या सर्वांत मोठ्या मलेरिया साथीच्या आजारातूनही याच डॉक्टर्स, नर्ससह रुग्णालयीन कर्मचार्‍यांसह महापालिकेच्या कामगार, कर्मचार्‍यांसह अधिकारी आदींनी मुंबईकरांना सुरक्षित बाहेर काढले होते. त्या सर्वांना केवळ दिशा देणार्‍या नेतृत्वाची गरज असते. मुळात याचाच अभाव दिसून येतोय. त्याचमुळे सध्या सर्व कामगार, कर्मचारी व अधिकारी गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. सरड्याने रंग बदलावे तसेच आयुक्तांचे निर्णय बदलतात. आदेश फिरवले जातात. परिपत्रकांमध्ये एकवाक्यता नाही. एकाच आदेशाची तीन ते चार परिपत्रके जारी होतात. त्यामुळे नक्की कोणत्या आदेशाचे पालन करावं, यातच अधिकारी गोंधळून गेलेत. हे थोडं म्हणून की काय व्हिडिओ कॉन्फरन्स तसेच झुम कॉलद्वारे सहायक आयुक्तांसह अधिकार्‍यांना कार्यालयात तासंतास अडकवून ठेवलं जातं. जर असं असेल तर हे सहायक आयुक्त आणि त्यांच्या हाताखालचे अधिकारी व कर्मचारी करोनाच्या महामारीविरोधात काय लढणार आणि आपण त्यात कसे विजयी होणार हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आयुक्तांनी आपला एक वर्षाचा अनुभव लक्षात घेता, महापालिकेतील जे अनुभवी सहआयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांची कोअर कमिटी बसून त्यांच्याकडून सल्ला घ्यायला हवा होता. पाच ते सहा वेळा नगरसेवकपद भूषवलेल्या लोकप्रतिनिधी तसेच गटनेते यांच्याही सूचना स्वीकारायला हव्या होत्या. तसं केलं असतं तर करोनाच्या उपाययोजनांमधील नियोजनाचा ढिसाळपणा निश्चितच टाळता आला असता आणि या आजारावर नियंत्रण मिळवणं सहज सोपंही झालं असतं, पण आयुक्त स्वत:चं धोरण तर राबवतच नाही तर उलट प्रत्येकाचं ऐकून त्याप्रमाणे निर्णय घेत असल्याने मुंबईतील गोंधळेल्या परिस्थितीमुळे आतापर्यंत करोनाग्रस्तांचा आकडा फुगत चाललाय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

कस्तुरबासह सेव्हन हिल्स, शीव, नायर, केईएम कुपर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, राजावाडी, वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, अगरवाल रुग्णालय आदी ठिकाणी करोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जातात. या सर्वांची क्षमता ३ हजार असून ती साडेचार हजारांच्या आसपास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, आज रुग्णांना दाखल करायला खाट रिकामी नाही. ज्या खाटांवर रुग्णांना ठेवायचे आहे, त्या खाटांवर मृतदेह पडून आहेत. रुग्ण आणि मृतदेह अशाप्रकारे ठेवले जातात, आधीच करोनामुळे घाबरलेला रुग्ण अशाप्रकारे खाटांवर तासंतास गुंडाळून ठेवलेल्या मृतदेहांमुळे अधिकच घाबरून जीव सोडेल, पण प्रशासनाचे अधिकारी वस्तुस्थिती मानायला तयार नाहीत. राज्यापेक्षा रुग्णांची संख्या कमी, मरणार्‍यांची संख्या कमी एवढाच डंका पिटत बसलेत. परंतु, मुंबईची तुलना राज्याशी कशी करता? जेव्हा हा लेख लिहायला घेतला होता, तेव्हा बुधवारपर्यंत राज्यात १६ हजार करोनाबाधित रुग्णांची संख्या होती. त्यातील ६१२ जणांचा मृत्यू झाला होता, तर त्याच दिवशी मुंबईचा आकडा १० हजार ५२५ एवढा होता. त्यामध्ये मृतांचा आकडा ४१२ एवढा होता. म्हणजे मुंबई वगळता इतर शहर व जिल्ह्यांमध्ये ६ हजार रुग्ण आणि सुमारे १९५ जणांचा मृत्यू झाला आहे. कदाचित जेव्हा लेख वाचत असाल तेव्हा मुंबईतील रुग्णांचा आकडा दुप्पट असेल आणि मृत्यूचे प्रमाण तसेच असेल. संख्या वाढणार आणि रुग्णांचे जीव जाणार. कारण उपचार करण्यासाठी आधी रुग्णाला दाखल तर करून घ्यावं लागतं. वरळी, धारावी, भायखळा, वडाळा, अँटॉप हिल, शिवडी, नागपाडा, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, कुर्ला, चेंबूर, गोवंडी-मानखुर्द, वांद्रे-सांताक्रूझ, कांदिवली, मुलुंड आदी भागांमध्ये आढळून येणारे रुग्ण पाहून आसपासच्या रहिवाशांचे पाय थरथरू लागतात. वरळी कोळीवाड्यात करोनाचे रुग्ण नाहीत, तर प्रत्येक बीडीडी चाळीत रुग्ण आहेत. एक असा भाग नाही जिथं रुग्ण नाही. तीच अवस्था धारावी व कुर्ल्याची व इतर विभागांची आहे, पण प्रशासन रुग्णांची संख्या आणि मृतांच्या आकड्यांची लपवाछपवी करत त्यावर पडदा टाकत आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

करोनाबाधित परंतु लक्षणे नसलेली सीसी-२ आणि करोनाबाधिताच्या अतिनिकटच्या लोकांसाठी सीसी-१ची निर्मिती ज्याप्रमाणे आता झपाट्याने फैलाव होत असताना केली जात आहे, हा सर्वात मोठा महापालिकेच्या नियोजनाचा अभाव आहे. आज करोना रुग्णांची संख्या वाढत असताना आपण अलगीकरण केंद्र अर्थात क्वारंटाईनची क्षमता वाढवायला निघालो. मुंबई महापालिकेकडे आजच्या घडीला १६ हजार व्यक्तींच्या अलगीकरणाची व्यवस्था आहे. आता काय तर आपण माहिम निसर्ग उद्यान, महालक्ष्मी रेसकोर्स, वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान, गोरेगाव नेस्को, भायखळ्यात रिचर्डसन अँड क्रुडास, वडाळ्यात डॉन बॉस्को आदी ठिकाणी अलगीकरण उभारायला निघालो. आज एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जर या सर्वांची उभारणी केली असती, तर या सर्व वास्तू वापरात आल्या असत्या, पण आता काय होणार आहे, तर जेव्हा या वास्तू बांधून तयार होतील, तेव्हा करोनाचे रुग्ण तिथे नसतील. परंतु, निश्चितच यावरील कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाणार हे खरे. परंतु, याचा अर्थ या वास्तूंची उभारणी करायला नको होती का असं विचारलं जाईल, पण फसलेल्या नियोजनामुळे करोना रुग्णांना याचा योग्य लाभ मिळू शकला नाही आणि करदात्यांचे पैसे वाया गेले हे सत्यही तेवढेच नाकारता येणार नाही.

स्थायी समितीने जरी अधिकार बहाल केले असले तरी त्याचा जाब विचारण्याचे अधिकार त्यांना आहेतच. त्यातही एवढं मोठं संकट मुंबईवर ओढवलेलं असताना, महापौर, सभागृहनेत्या, स्थायी समिती अध्यक्ष, विविध पक्षांचे गटनेते यांनाही आयुक्तांनी विश्वासात घेत त्यांच्या सूचना जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे जेव्हा केव्हा हा लॉकडाऊन संपेल तेव्हा प्रशासनातील अधिकारी लोकप्रतिनिधींच्या तोफेच्या तोंडी उभे असणार आणि भविष्यात यावरून घोटाळ्याचे आरोप होवून कुणाला याचा बळी द्यावा लागला तरी नवल वाटू नये. संसर्ग पसरु नये ही जबाबदारी आपली आहे आणि यासाठीच आपण अनावश्यक बाहेर जाणे टाळायला हवे. त्यासाठी आपल्याला घरातच बसावं लागेल. आपल्या केवळ घरी बसण्याने जर आपण युद्ध जिंकू शकणार असू तर एवढं साधंसं काम आपण नाही करू शकत का? मग पुढचा धोका लक्षात घेता घरीच राहा आणि मुंबई आणि पर्यायाने आपल्या राज्याला, देशाला करोनामुक्त करा. तरच आपल्याला घराबाहेर कामाधंद्यासाठी लवकर बाहेर पडता येईल, हे लक्षात ठेवा.

First Published on: May 10, 2020 4:27 AM
Exit mobile version