नैतिकतेचा टेंभा आणि जगण्याचे वांदे

नैतिकतेचा टेंभा आणि जगण्याचे वांदे

दारू प्यावी की नाही, प्यायली तर किती प्यावी, का पिऊच नये, उंची दारू पिऊन झाल्यावर लोकांना गावठी दारू कशी पिऊ नये असे फुकट सल्ले द्यावेत की शांतपणे दोन पेग मारून गपगार बसावे, चंद्रपूरची दारूबंदी उठवावी का, महात्मा गांधीजी यांचा आश्रम असलेल्या वर्ध्यात दारूबंदी असूनही राजरोज दारू मिळवून ती कशी ढोसली जाते, यावर तावातावाने चर्चा करावी का, करू नये, गोव्यात दारू स्वस्त मिळते म्हणून भरपूर ढोसून येताना दोन बाटल्या घेऊन याव्यात की नाही, मोदींच्या गुजरातमध्ये दारूबंदी असताना सर्वत्र दारू कशी मिळते… या आणि अशा दारूच्या अनेक चर्चा आपण नेहमी ऐकत आलो आहोत. यात नवीन काही नाही. मात्र करोनाने या चर्चेला नव्याने नैतिकतेचा रंग दिला आहे. निमित्त ठरले आहे राज्याच्या खडखडाट झालेल्या तिजोरीत फिरत असलेले उंदीर, आर्थिक महामारीचे संकट आणि महसुली उत्पन्न वाढीसाठी दारूची दुकाने सुरु करण्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले आवाहन. करोनाने जीवाच्या भीतीपोटी फक्त माणसांना घरी बसवलेले नाही तर जगण्याचेही वांदे करून टाकले आहेत. ही अशीच परिस्थिती राहिली तर पुढची एक दोन वर्षे देश उभा राहत नाही. आता एक दोन महिने आपण ठप्प झालो आहोत, नंतर बेकारी आणि जगण्यासाठी करावी लागणारी धडपड यामुळे नैतिकतेचे सर्व बंध गळून पडतील… माणूस माणूस राहील की नाही, अशी भीती वाटायला लागली आहे आणि कवी ग्रेस यांची ‘चंद्र माधवीच्या प्रदेशात’ या काव्य संग्रहातील कविता डोळ्यासमोर येऊन मन अधिक खोल डोहात जाते…
भय इथले संपत नाही…
भय इथले संपत नाही… मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते
ते झरे चंद्रसजणांचे, ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो, आपण झाडांत पुन्हा उगवाया
तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
त्या वेली नाजुक भोळ्या वार्‍याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन दारावर आली भरती
देऊळ पलिकडे तरिही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळांपाशी मी उरलासुरला थेंब
संध्येतील कमळासम मी नटलो शृंगाराने
देहाच्या भवती रिंगण घालती निळाइत पाने ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतून ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई…
लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार आणि आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असून वस्तू आणि सेवा कर, मुद्रांक शुल्क, अबकारी कर, परिवहन कर यामधून मिळणारा महसूल पूर्ण बंद झाला आहे. एक दीड महिन्यात राज्याला आतापर्यंत अंदाजे 40 हजार कोटी रुपयांच्या महसुली तुटीवर पाणी फिरले आहे. हा तोटा असाच वाढत राहिला तर आपल्या राज्याच्या हालाला पारावर उरणार नाही…हलाहल होईल की काय, अशी भीती पुन्हा पुन्हा उभी राहते. राज्याच्या तिजोरीत वर्षाकाठी सव्वा दोन लाख कोटी रुपयांचा महसूल जमा होतो. त्यात एक लाख कोटी जीएसटी, 30 हजार कोटी व्हॅट, 27 हजरांचा मुद्रांक शुल्क, 25 ते 26 हजार कोटी मद्य, 9 हजार कोटी परिवहन आणि 10 हजार कोटी वीज उत्पादन यांचा समावेश आहे. या सार्‍या उत्पन्नाचा विचार करता राज्याच्या उत्पन्नात भर टाकणार्‍या मद्यकराचा वाटा हा तिसर्‍या क्रमांकाचा असून त्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे राज ठाकरे यांचे म्हणणे रास्त असल्यासारखे वाटते. पण, प्रश्न आहे फक्त दारूची दुकाने उघडावीत का बार उघडावे, देशी दारूची दुकाने खुली करून पहात बाटल्या द्याव्यात. मात्र माणसे जमली का एकत्र येण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता जीवनावश्यक वस्तू देताना जशी काळजी घेतली जाते तशी काळजी घेऊन फक्त दारू घ्या आणि निघून जा असे ठरवता येऊ शकते.

अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीची सूत्रे हाती घेण्याआधी राज्यावर कर्जाचा मोठा बोजा असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. त्यांच्या इतका स्पष्ट वक्ता नेता या घडीला राज्यात दुसरा कोणी नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात त्यांच्यावरील घोटाळ्याचे आरोप हे लक्षात ठेवूनही प्रशासनावरील त्यांची घट्ट पकड याबाबत दुमत असता कामा नये आणि हे विरोधी पक्ष ही मान्य करतील. पाच वर्षे सत्ता हातून गेल्यावर आणि काही गरज नसताना देवेंद्र फडणवीस यांचा हात हाती घेतल्यानंतर त्यांना आता बरेच काही कळले असेल, अशी आशा करूया… आपल्या काकांकडून शरद पवार यांच्याकडून ते आता संयमाचे धडे गिरवत असतील, अशी आशा आहे. मात्र सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करण्याचा आणि कामे झटपट हातावेगळी करण्याचा त्यांचा झपाटा मोठा आहे. करोना काळातही ते मंत्रालयात जाऊन राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोठ्या धीराने करोनाची परिस्थिती हाताळत असताना अजितदादांनी अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम केले तर राज्याचे रुतलेले अर्थचक्र बाहेर येण्यास मोठी मदत होईल. ही मदत म्हणजेच महसुली उत्पन्नात वाढ करण्यासाठी उचललेली पावले ठरणार आहेत. उद्योगधंदे आणि बाकी सर्व व्यवहार ठप्प असल्याने बंद असल्याने वस्तू आणि सेवा कर, मुद्रांक शुल्क, अबकारी कर, परिवहन कर यातून मिळणारा महसूल थांबला आहे. आता राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे यातून एक मार्ग उरला आहे तो दारू विक्रीचा. नीट नियोजन करून लवकरच दारू विक्री दुकाने सुरू केली तर राज्याच्या तिजोरीत काही पैसे जमा व्हायला त्याची मोठी मदत होऊ शकते.

देशी, विदेशी, बिअर, वाईन, अशा एकूण दारू विक्रीच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीत 25 हजारांची भर पडते. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे दिवसाला दोन हजार कोटींपेक्षा जास्त महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. राज्याच्या दारूवरील उत्पादन शुल्कामधून 1200 कोटी आणि त्यावरील विक्रीकरातून 800 कोटी असे महिन्याला 2 हजार कोटी मिळत आहेत. वर्षागणिक हे उत्पन्न वाढत असून अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दारूवर सर्वात अधिक असा 65 टक्के कर असल्याने उत्पन्न मोठे आहे. यामुळेच राज्यात आधी दारूबंदी होती आणि ती महसुलासाठी कोणी उठवायला सांगत नाही. लॉकडाऊनच्या आधीही दारूची दुकाने सुरू होती. त्यामुळे आता कुठल्याही नैतिकतेच्या गुंत्यात अडकून न पडता सरकारने दारूची दुकाने खुली करावी. राज्याला महसुलाची गरज आहे, हे वास्तव स्वीकारायला हवे, हे राज ठाकरे यांचे म्हणणे पटते.

एकट्या शेतीवर राज्याचा गाडा चालणार नाही. खाणारी तोंडे खूप असल्याने करोनानंतर शेतीकडे मोठ्या संख्येने माणसे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाव खेड्यांवर मोठा ताण येऊन कौटुंबिक समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. आताच नोकर्‍यांचे प्रमाण कमी झाले असून ते पुढे वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रतिकूल वातावरणात आताच उद्धव ठाकरे सरकारने नियोजन करून आर्थिक उत्पन्न वाढीसाठी पावले उचलायला हवीत. हे करताना नैतिक काय? याचा खूप विचार करण्याची गरज नाही. नैतिकतेच्या नावाखाली छुपे धंदे करून आपल्याच भूमीला देशोधडीला लावणारे महाभाग या देशात कमी नाही. शेवटी सरकारच्या हातात काहीच उत्पन्न आले नाही तर लोकांवर उपासमारीची वेळ येईल आणि त्यावेळी नैतिकतेच्या सर्व भिंती कोसळून पडतील…

First Published on: April 26, 2020 5:18 AM
Exit mobile version