…तुझ को चलना होगा!

…तुझ को चलना होगा!

लॉकडाऊन उठलं हे खरं आहे, पण लोक अजून लॉकडाऊनच्या मानसिकतेतून मोकळे झाले आहेत का? माझ्या घराच्या गल्लीत लोकांची पूर्वीची ती लगबग सुरू झालेली नाही. ती पूर्वीची वर्दळ दिसत नाही. लॉकडाऊन उठल्यानंतरही गल्लीत तुरळक माणसंच दिसताहेत. त्यातली बहुतेक सावध आहेत, काही दडपणाखाली आहेत, काही काहीशीच बिनधास्त आहेत तर काही जन्मजात ढिलाई घेऊन चालताहेत. शेवटी कुणाचंही जगणं थांबत नाही. ते सुरूच राहतं. चालतच राहतं. पाण्यासारखं वाहतच राहतं. पाणी वाहत राहिलं तर त्याची नदी होते. थांबलं तर नाला होतो हे आज अपरिहार्यपणे मान्य करायलाच लागत आहे. अशा वेळी गीतकार इंदिवर आठवतात. इंदिवरजींनी खूप पूर्वी बरचसं असंच लिहून ठेवलं आहे. सगळ्यांच्या परिचयाचं ते

गाणं आहे. शब्द आहेत…
नदिया चले चले रे धारा,
चंदा चले चले रे तारा,
तुझ को चलना होगा,
तुझ को चलना होगा

लॉकडाऊन उठल्यानंतर जे काही थोडेथोडके लोक बाहेर पडले, जेवणाचे डबे घेऊन आपापल्या ऑफिसात जाण्यासाठी निघाले, जगभर सांडलेल्या करोनाचा पसारा आटोपलेला नसला तरी देशाची आणि आपल्या घराचीही साफ घसरलेली अर्थव्यवस्था सावरायला निघाले. त्यांना इंदिवरजींनी लिहिलेल्या गाण्यातला हाच नियम लागू होता की, तुझ को चलना होगा.

राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर ह्या जोडीच्या ‘सफर’ सिनेमातलं हे गाणं. इंदिवरजींना जेव्हा ह्या गाण्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी हातचं न राखता भरभरून सांगितलं. एखाद्या गाण्याबद्दल विचारलं की, हातचं न राखता भरभरून सांगण्याचा इंदिवरजींचा स्वभावच होता. लक्षात घ्या की त्यावेळी मोबाईल नव्हता, त्यामुळे साहजिकच अनलिमिटेड कॉल्सचाही मामला नव्हता, पण त्याही काळात फोनवर जरी बोलायचं झालं तरी इंदिवरजी भरभरून बोलायचे.

‘सफर’मधल्या त्या गाण्याबद्दल बोलताना त्यांनी आधीच सांगून टाकलं की, माणसाचं आयुष्य जसं शाश्वत नसतं तसंच माणसाच्या आयुष्यातल्या सुख-दु:खाचंही आहे, ही सुख-दु:ख कधीच शाश्वत नसतात. माणसाच्या आयुष्यातलं सुखही कायम राहत नाही आणि दु:खही, सुखात बुडालेला माणूस तशीच वेळ आली की दु:खात बुडून जातो, कधी हे सुख सर्वांगावर खेळवावं लागतं तर कधी दु:ख पाठीवर वाहून न्यावं लागतं, ह्याचाच अर्थ काय तर माणसाला थांबून राहता येत नाही, माणसाच्या आयुष्यातल्या टोकाच्या दोन प्रसंगांतही माणसाला चालावंच लागतं, म्हणून ह्या गाण्यातले शब्द आहेत, तुझ को चलना होगा!

इंदिवरजी हे सगळं सांगत असताना त्यांचं एक वाक्य पक्क लक्षात राहिलं – माणसाच्या आयुष्यातलं सुखही कायम राहत नाही आणि दु:खही. आजच्या करोना काळात तर इंदिवरजींच्या म्हणण्यातलं ते वाक्य पुन्हा पुन्हा आठवत राहिलं. आजच्या भयंकर काळात आशेचा किरण शोधत राहणार्‍या मानवी मनाला तो दिलासा वाटला नसता तरच नवल होतं. इंदिवरजींच्या त्या म्हणण्याप्रमाणे सुख एक वेळ कायम राहणार नसेल तर नको राहू दे बापडं, पण दु:खही कायम राहत नाही हे त्यांचं म्हणणं आजच्या काळात अतिशय दिलासादायक वाटतं आहे. आज जगभरात थैमान घातलेलं हे दु:ख तसंच मुक्कामाला राहणार नाही…आणि मुक्कामाला आलेला या साथीच्या आजाराचा नकोसा पाहुणा जाणार आहे, असं जे कुणी कोणे एके काळी समजवलं आहे ते तर ह्या दुखण्यावरची खरोखरच फुंकर वाटते आहे.

ते गाणंही संगीतकार कल्याणजी-आनंदजींनी मन्ना डेंच्या तगड्या आवाजात गाऊन घेतलं आहे. तुझ को चलना होगा, तुझ को चलना होगा, असं म्हणत तसाच तगडा कोरस देणार्‍या आवाजाच्या पार्श्वभूमीवर मन्ना डे शिरपेचात तुरा खोवावा तसा आपला आवाज खोवतात, कोणतं तरी उत्तुंग शिखर गाठताना गिर्यारोहक ध्वज रोवतात तसा आपला आवाज रोवतात.
मन्ना डेंच्या त्या तगड्या आवाजात इंदिवरजींनी पहिल्या अंतर्‍यात लिहिलेले ते शब्द तर आपल्याला फारच आश्वासक वाटतात, कारण इंदिवरजी लिहितात-

जीवन कहां भी ठहरता नही हैं,
आंधी से, तुफां से डरता नही हैं,
तू नही चलेगा तो चलते ही राहें,
मंझील को तरसेगी तेरी निगाहें
तुझ को चलना होगा,
तुझ को चलना होगा.

परवा लॉकडाऊन उठलं तेव्हा खिडकीतून सकाळी सहज नजर गेली तर विशीबाविशीतली दोन मुलं खांद्याला बॅगा लावून ऑफिसला चालल्याचं दिसलं. त्या नवथर वयात ती काही स्वप्नं बाळगून असतील, नवं घर करण्याची, तशाच कोणत्या सुकुमारीबरोबर आपलं लग्न होण्याची. हे स्वप्न आहे म्हणून त्यांच्या जीवनाला गती आहे. स्वप्न हे जीवनाच्या गाडीला गती देणारं इंधन म्हटलं पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर निपचित पडलेल्या दगडासारखी ही जीवनाची गाडीही निपचित पडली होती. ती पराजित होईल की काय, अशी शंका होती, पण सकाळी सकाळी कामाधामाला निघालेल्या त्या मुलांनी इंदिवरजींचे शब्द ऐकलेले असावेत – तुझ को चलना होगा, तुझ को चलना होगा.

First Published on: June 14, 2020 4:15 AM
Exit mobile version