ओम परीक्षकाय नम: अर्थात – त ते सर्व (ज्ञ)

ओम परीक्षकाय नम: अर्थात – त ते सर्व (ज्ञ)

Parikshak

नाटक म्हणजे स्पर्धा आणि दर्जेदार नाटक म्हणजे स्पर्धेतून तीन-पाच परीक्षकांनी नंबरात आणलेले ते. असे एकदा मान्य केले की आपण रसग्रहणाच्या, मर्मज्ञ चिकित्सेच्या आणि विश्लेषक समीक्षेच्या जंजाळातून सुटतो. आपल्या जबाबदार्‍या तिसर्‍याच्या गळ्यात टाकून मोकळे होऊ शकतो. गावोगाव भरणार्‍या नाट्य स्पर्धांना व्यवधानी परीक्षक कुठून आणावेत? नाटक हा बहुआयामी सादरीकरणाचा प्रकार आहे. ते कितीही एकाग्रतेने पाहिले तरी, ही सर्व व्यवधाने सांभाळत प्रत्येक गोष्ट बारकाव्याने निरखणे अशक्य आहे. नाट्य परीक्षण हे एक सांघिक काम आहे.

संस्था चालक कुणाला तरी विचारून परीक्षक नेमतात. अनेकदा परीक्षक स्वत:च स्वत:ची वर्णी लावतात. थोडक्यात परीक्षक होण्यासाठी कुठलेही क्वालिफिकेशन नाही. प्रगल्भ परीक्षक नसेल तर स्पर्धकांवर अन्याय होईल, याची आयोजकांना जाणीवच नाही. याचा परिणाम म्हणून अनेक चांगले रंगकर्मी हताश होताना, आपला आत्मविश्वास गमावताना, वर्षानुवर्षे पाहतो आहे. हे रंगभूमीचे एक प्रकारे नुकसानच आहे. एकाचे नुकसान दुसर्‍याच्या फायद्याचे ठरते याप्रमाणे परीक्षक म्हणून वर्णी लागलेले नाट्यगुरू बनले आहेत. त्यांची शिबिरे, सत्र जोरात सुरू आहेत. जे अनुभवी, जाणकार रंगकर्मी आहेत, त्यांना बहुतेकदा वेळ नसतो. ज्यांच्याकडे वेळच वेळ असतो- ते आपला पोर्ट फोलियो सुजवून सालोसाल परीक्षक म्हणून वावरतात. आता जर नाट्य व्यासंग नसेल, तर प्रश्नांना उत्तरे काय द्यायची? असा प्रश्न या परीक्षकांना पडत नाही. मौन साधणे किंवा बेधडक चुकीचे विधान करणारे असे परीक्षक, अंगावर परीक्षकाचा गणवेश चढवून आपल्या अ‍ॅटिट्युडने स्पर्धकांवर दबाव आणतात.

परीक्षक या जमातीची वर्गवारी खालील प्रकारे करता येईल.

1) सहानुभूत परीक्षक : उदा. म्हणून इथल्या फोटोत पाहिलेत तर अनुभवी, समजूतदार, स्पर्धकांशी सहानुभूत होणारे, प्रेमाने चर्चा करणारे मितभाषी परीक्षक दिसतील. ते स्पर्धकांशी कधीही उद्धटपणे बोलत नाहीत. आपले बायसेस बाजूला ठेवून, कधीही खुल्या चर्चेला तयार असतात. हे तसे कमीच.

2) अ‍ॅटिट्युड परीक्षक : यांना स्पर्धकांशी बोलायचे नसते. काही सांगायचे नसते. यांनी एखादे विधान केलेच तर ते स्पर्धकाला ना उमेद करणारे असते. नीट विचार केला तर त्यांच्या विचारात शेरेबाजी खेरीज काही नसते. मुळात आडात नसते, त्यामुळे पोहरा अ‍ॅटिट्युड दाखवतो.

3) गुप्त हेतू परीक्षक : हे आपल्या बायसेससकट येतात. परीक्षक म्हटला की वैयक्तिक बायसेस कोणी टाळू शकत नाही, कमी करू शकत नाही; पण हे आपल्या पूर्वग्रहाचा नियम बनवून येतात. त्यातील वाईट ठरलेल्याने काहीही केले तरी यांना पचत नाही आणि यांच्या लाडक्या ग्रुप्सनी माती खाल्ली तरी त्यांच्या लेखी ती सोन्याची असते. अनेकदा आयोजक संस्थेचा प्रतिनिधी परीक्षक म्हणून बसतो. ती संस्था स्पर्धेत सहभागीही होते आणि बक्षीसही घेते. हे भयाण आहे.

4) बाहुबली परीक्षक : हे स्पर्धकांनाच काय, सोबतच्या परीक्षकालाही ऐकत नाहीत. नाटक काय ते आपल्यालाच कळते अशा थाटात आपलाच निकाल पुढे रेटतात. एकाच वेळी दोन बाहुबली परीक्षक समोर आले तर, राडा होतो. बाहुबली परीक्षक बहुतेकदा आपल्या सोबत डमी परीक्षक पसंत करतात.

5) डमी परीक्षक : कोणीही उपलब्ध नसल्याने, नाटक, साहित्य, कविता, पत्रकारिता यांच्याशी दूर वरून संबंध आलेला/ली परीक्षक म्हणून बाशिंग बांधून तयार असतात. हे फक्त म्होरक्या परीक्षकाच्या हो ला हो करतात आणि निकाल पत्रकावर सही करतात.परीक्षकांनी संघ म्हणून काम करावे. नाटकाची व्यवधाने अनेक आहेत. परीक्षक अष्टावधानी होऊ शकत नाही. स्वत:ची आवड-निवड हे निकष बाजूला पडले पाहिजेत. त्यावर नीट प्लान करून, जबाबदारी अनुभवानुसार विभागून, प्रत्येक अंगाचे निरीक्षण व्हावे. निकाल ठरवते वेळी परीक्षक ओपन असावे. स्वत:चा निकाल अंतिम मानून रेटणारे नसावे. परीक्षक चर्चेच्या वेळी, आयोजकांच्या किमान एका प्रतिनिधीने सोबत बसावे. काय चर्चा होते, कोण किती पाण्यात आहे, हे त्यांना नक्नकी उमजेल.

आभास आनंद

First Published on: November 1, 2018 12:39 AM
Exit mobile version