‘रिक्विम फॉर मिसेस जे’ : शार्प, सटल, काम अ‍ॅण्ड डार्क

‘रिक्विम फॉर मिसेस जे’ : शार्प, सटल, काम अ‍ॅण्ड डार्क

‘रिक्विम फॉर मिसेस जे’

साधारणतः वर्षभरापूर्वी ‘मिसेस जे’च्या पतीचा मृत्यू झाला आहे. येत्या शुक्रवारी त्याची डेथ अनिव्हर्सरी आहे. पण ‘जे’ अजूनही या धक्क्यातून सावरली नाहीये. एक सासू, दोन मुली आणि त्यातील एकीचा बॉयफ्रेंड, इतकंसं कुटुंब असलं तरी ती या सर्वांपासून अलिप्त राहते. त्यामुळे तिच्यावर सगळे रागावलेले आहेत. पण चित्रपट ज्या आठवड्यात सुरू होतो, तेव्हाच ‘जे’ने एक निर्णय घेतलेला असतो. ज्याचे एक साक्षीदार आपण असतो. तो म्हणजे येत्या शुक्रवारपर्यंत सगळी कामं आटपून ज्या दिवशी आपल्या नवर्‍याचा मृत्यू झाला त्याच दिवशी आपणही स्वतःवर गोळी झाडून या जगाचा निरोप घ्यायचा. ही झाली या चित्रपटाची वरवर पाहता दिसणारी कथा. पण यात अनेक ‘बीटवीन द लाइन्स’आहेत. ज्यातील सर्वच्या सर्व समकालीन सर्बियामधील काही अंतर्गत संदर्भांमुळे आपल्या लक्षात येण्यासारखे नसले तरी यातील काही गोष्टी आपल्याला कळतात.

‘मिसेस जे’ ही ‘सर्बिया’ला रिप्रेझेंट करते. २००६ मध्ये बर्‍याच काळापासून चाललेल्या राजकीय घडामोडी आणि खटाटोपानंतर सर्बिया हा एक स्वतंत्र देश म्हणून ‘युगोस्लोविया’पासून वेगळा झाला. ज्याला आता एक दशक उलटून गेले आहे. मात्र अजूनही सर्बिया एक देश म्हणून स्थिरावलेला नाही. प्रशासकीय यंत्रणेतील उदासीनता, व्यवस्थेचा अभाव असणं या गोष्टी देशाला छळत आहेत. दिग्दर्शक बोहान व्हलेटिक ‘मिसेस जे’चे पात्र याच गोष्टी आणि सभोवताल उपकथानक म्हणून सूचकपणे वापरत हे जग उभे करतो. पूर्ण चित्रपट फक्त एका आठवड्याभरात घडतो. हाच आठवडा ‘मिसेस जे’चं भवितव्य ठरवणार असतो.

‘जे’ने आत्महत्या करण्यासाठी बंदूक मिळवली आहे. आता तिला त्यासाठी ‘एक’ गोळी मिळवायची आहे. जी तिला मिळते. पण सोबतच स्वतःवर गोळी न झाडता काही औषधांचा वापर करून मरण्याचा सल्ला मिळतो. कारण ‘तुझ्या कुटुंबासाठी तुझी शेवटची प्रतिमा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली, मस्तकाच्या चिंधड्या उडालेल्या आहेत, अशी नसावी’, असे त्या व्यक्तीचे मत असते. आता औषध मिळवण्याचं नवीन काम उभं राहतं. पण तिचे मेडिकल कार्ड वैध नाही. त्यामुळे आधी ते सुरू करून घ्यावे लागेल. दुसरीकडे तिने खास स्वतःसाठी एक शवपेटी बनवायला टाकली आहे. ज्यात ती मृत्यूनंतर तिच्या पतीच्याच शेजारी गाडली जाईल. हा सीन त्यातील ‘कॉफिन मेकर’ आणि ‘जे’मधील संवाद आणि त्यातील गडद छटा असलेल्या विनोदांमुळे अर्थात डार्क ह्युमरमुळे रंजक ठरतो.

चित्रपटाच्या उत्तम असण्यात पटकथेचा जितका वाटा आहे तितकाच हेलेना स्टॅन्कोविकच्या छायांकनाचा आहे. चित्रपटाच्या शेवटी थेट कॅमेर्‍यात पाहत एक नितांत सुंदर गाणं आपल्यासमोर दिसतं. ज्यातून पूर्ण चित्रपटभर उभा केलेला निराशाजनक मूड जरासा बाजूला सारत एका नवीन आणि आशादायी भविष्याकडे आपण पाहू लागतो. याहून उत्तम, इतर कुठलाही शेवट याला साजेसा वाटला असता, असे मला तरी वाटत नाही.
————————- —————-

First Published on: August 16, 2018 5:00 AM
Exit mobile version