ओझीलवरील टीका आणि आधुनिक राष्ट्रवादाच्या मर्यादा

ओझीलवरील टीका आणि आधुनिक राष्ट्रवादाच्या मर्यादा

ओझील टर्की देशाचे राष्ट्राध्यक्ष एदरेगन यांची भेट घेताना

आजचा काळ सर्व जुन्या समजुतींना,जुन्या मूल्यांना आव्हान देणारा आहे. एकेकाळी असे मानले जात असे की कला व क्रीडा वगैरेंना राष्ट्राच्या सीमा बांधून ठेवू शकत नाहीत. कलाकार काय किंवा खेळाडू काय, कोणत्याही देशाचा, धर्माचा असो, जगभरचा समाज त्यांच्या कौशल्यावर व त्यांच्या आविष्कारावर प्रेम करतो. म्हणूनच भारताच्या सुनिल गावस्करवर वेस्ट इंडिजमधील क्रिकेटप्रेमींनी अतिशय प्रेम करतात. त्याचप्रमाणे राज कपुरचे चित्रपट रशियात कमालीचे लोकप्रिय होते, आजही आहेत.

आता मात्र यात झपाटयाने बदल होत असून ‘आक्रमक राष्ट्रवाद’ नावाच्या नव्या राक्षसाने ही जुनी मूल्यं पायदळी तुडवायला सुरूवात केली आहे. याचा ताजा बळी म्हणजे जर्मनीचा नामवंत फुटबॉलपटू मेसूत ओझील (जन्म ः 1988). नुकत्याच संपन्न झालेल्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत जर्मनीचा दारूण पराभव झाला. याच जर्मनीने या आधी म्हणजे 2014 साली झालेला वर्ल्डकप ओझील जर्मनीतर्फे खेळत असताना दिमाखात जिंकला होता. ओझील 2009 सालापासून जर्मनीतर्फे खेळत होता.

या वर्ल्ड कपमध्ये जर्मनीचा पराभव झाल्यावर काही टीकाकारांनी ओझीलला याबद्दल तर जबाबदार धरलेच शिवाय तो तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगना यांना लंडनमध्ये भेटल्याबद्दल टीकेची झोड उठवली आहे. एक खेळाडू जर एका राष्ट्रप्रमुखाला भेटला तर त्याबद्दल एवढा गहजब कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्याचे कारण साधे आहे. ओझीलचा जन्म जरी जर्मनीत झालेला असला तरी त्याचे पालक तुर्कस्तानातून जर्मनीत स्थलांतरित झालेले आहेत. म्हणजे ओझील ‘बाहेरून’ आलेल्यांचा मुलगा आहे, म्हणजेच त्याचे देशाविषयीचे प्रेम संशयास्पद आहे, अशी ती मांडणी आहे. आम्हा भारतीयांना ही मांडणी नवीन नाही.

आपल्या देशातसुद्धा स्वातंत्र्य मिळाल्यामिळाल्या मुस्लीम समाजाबद्दल जबरदस्त संशयाचे वातावरण होते. म्हणूनच युसुफखान (सुप्रसिद्ध नट दिलीप कुमार), महजबीन बानो (मीना कुमारी), मुमताज जहान बेगम दहलवी (ऊर्फ मधुबाला) वगैरे मुस्लीमधर्मीय सिनेनटांना हिंदू नावं घेऊन वावरावे लागले होते. हा प्रकार फक्त सिनेसृष्टीपुरताच मर्यादीत नव्हता तर क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळातही शिरला होता. अब्बास अली बेग (जन्म ः 1939) हा हैदराबादचा गुणी क्रिकेटपटू भारतातर्फे कसोटी खेळणारा खेळाडू. त्याने 1959 साली भारतातर्फे कसोटी क्रिकेट खेळायला सुरूवात केली. बेगने पाकिस्तान विरूद्ध खेळताना फारशा धावा केल्या नाहीत. त्यामुळे बेगवर आरोप झाले की तो मुसलमान आहे म्हणून पाकिस्तानच्या विरूद्ध चांगला खेळत नाही. या आरोपांचे अब्बास अली बेगवर एवढे दडपण यायचे की त्याचा खेळ पाकिस्तानच्या विरूद्ध कधीच बहरला नाही. सरतेशेवटी या आरोपांना कंटाळून त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

आज अशीच वेळ फुटबॉलपटू ओझीलवर आली आहे. जेव्हा 2014 साली जर्मनीने फुटबॉल कप जिंकला होता तेव्हा कोणी ओझीलवर कसलेच आरोप केले नाहीत. आता मात्र त्याच्यावर एवढे गलिच्छ आरोप केले गेले की त्याने या सगळयाला कंटाळून निवृत्ती जाहीर केली. 1950 व 1960 च्या दशकात भारतीय समाजाची जी मानसिकता होती तीच आज 2018 साली जर्मनीसारख्या पुढारलेल्या देशाची आहे.सुदैवाने भारतीय समाजाने ही मानसिकता लवकरच मागे टाकली. आज सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान वगैरे मुस्लीम नटांना टोपण नावं धारण करावी लागत नाहीत. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेट संघामध्ये किमान दोन ते तीन मुस्लीम क्रिकेटपटू भारतातर्फे क्रिकेट खेळतात. मग तो झहीर खान असेल, युसुफ पठाण असेल किंवा मोहम्मद कैफ असेल. आज त्यांच्या देशभक्तीबद्दल कोणीही शंका घेत नाही. ते दणक्यात भारतातर्फे खेळतात व देशाच्या आनंदात व दुःखात सामिल होतात.

अशी स्थिती पाकिस्तानात दिसत नाही. पाकिस्तानच्या क्रिकेट संघात बिगर-मुस्लीम (म्हणजे हिंदू, ख्रिश्चन वगैरे) खेळाडू शोधावा लागतो व सहसा मिळत नाहीच. काही अभ्यासकांच्या मते 1947 पासून आजपर्यंत फक्त सात बिगर-मुस्लीम क्रिकेटपटू पाकिस्तानतर्फे खेळले आहेत. एकविसाव्या शतकात पाकिस्तानतर्फे क्रिकेट खेळणारा एकमेव बिगर-मुस्लिम खेळाडू म्हणजे दानिश कनेरीया (जन्म ः 1980) हा हिंदूधर्मिय खेळाडू! असाच प्रकार पाकिस्तानातील सिनेसृष्टीबद्दलही नमूद करता येतो. तेथील सिनेसृष्टीत किती बिगर/मुस्लीम नट/नटी आहेत? असा प्रश्न विचारला तर उत्तर अतिशय निराशजनक असेल.

याचा अर्थ असा की आजच्या गुंतागुंतीच्या काळात देशभक्तीची व्याख्या आणि कसोट्या बदलून घेतल्या पाहिजेत. 1999 साली झालेल्या कारगील युद्धात वीरगती प्राप्त केलेल्या भारतीय सैन्यातील कप्तान बत्रा या पारशी तरूणाचे उदाहरण डोळयांसमोर ठेवले पाहिजे. या 29 वर्षांच्या पारशीधर्मिय शुराने एवढा पराक्रम केला की त्याला भारतीय सैन्याने शौर्याबद्दल देण्यात येणारा सर्वोत्तम पुरस्कार ‘परमवीर चक्र’ प्रदान केला होता. सार्‍या भारतात पारशी समाजाची लोकसंख्या दोन लाखसुद्धा नसेल. याचा अर्थ अगदी साधा आहे. देशप्रेमाचा मक्ता बहुसंख्याक समाजाकडेच असतो, असे नाही.

जगाच्या इतिहासाची साक्ष काढली तर असे दिसते की इ.स. 1648 साली प्रशियातील ‘वेस्ट फॅली’ या गावी जो करार झाला तेव्हापासून आधुनिक राष्ट्रवादाची सुरूवात झाली. त्यानंतर जगभर ‘राष्ट्रवाद’ या नव्या धर्माची लोकप्रियता वाढतच गेली. या मागे एक महत्वाचे गृहितक होते. ते म्हणजे राष्ट्र म्हणजे ‘एक भाषा, एक धर्म, एक संस्कृती’ प्रमाण मानणारा मानवी समूह. ही व्याख्या एकोणिसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत योग्य होती. पण विसाव्या शतकात व त्याहीपेक्षा एकविसाव्या शतकात जगभर संमिश्र समाज दिसणार आहेत. लोक चांगल्या भविष्यासाठी स्थलांतर करतीलच. जागतिकीकरणाचा तो एक अटळ परिणाम आहे. अशा स्थितीत प्रत्येक देशाला, प्रत्येक समाजाला आपल्यापेक्षा वेगळ्या मानवी समुहांबरोबर जगण्याची सवय करवून घ्यावी लागेल. ओझीलसारख्या खेळाडूच्या हेतूंबद्दल शंका घेऊन काहीही साध्य होणार नाही.


-प्रा. अविनाश कोल्हे

First Published on: August 9, 2018 7:43 PM
Exit mobile version