अंतर्नादचा उन्मुक्त हुंकार…

अंतर्नादचा उन्मुक्त हुंकार…

रंगकर्मी

कलाकारांना कुठलीही कृती करण्यासाठी प्रेरणा कुठून मिळते?
प्रेरणा मिळते ती विचारांनी, विचार संदर्भ शोधतात, संदर्भ शोध प्रक्रिया वाढीस नेतात आणि स्व-अस्तित्वाची निर्मिती होते. कलाकारामध्ये अस्तित्व निर्माण करण्याची दृष्टी जोपर्यंत सृजित होत नाही, तोपर्यंत प्रत्येक संदर्भाशी तो नातं कसं जोडेल..? आणि हे नातं जुळले नाही तर मग नाटकातल्या पात्राची बौध्दिकता, त्याची कलात्मक उंची, वैचारिक प्रतिबद्धता कशी गाठणार? अभिनयासाठी हे तीन पैलू अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात :

1. मी स्वतः कोण आहे?
2. माझ्या पात्राची बौद्धिक पातळी आणि कलात्मक उंची काय आहे ?
3. दृष्टी संपन्न अभिनय

कला ही निरंतर शोध प्रक्रिया आहे, जेव्हा कलाकार एकाच अनुभवाला, संदर्भाला घेऊन रंगमंचावर येतो आणि त्याच अनुभवाच्या जोरावर अनेक प्रयोगात आपली भूमिका पार पाडत असतो, तेव्हा त्याला कलाकार म्हणता येणार नाही, तो एक मेकॅनाईझड (स्टाईल्ड) अ‍ॅक्टर आहे, ज्याला तीच वातावरण निर्मिती लागते, त्याच अनुभवाचा आधार हवा असतो, तेच स्टाईल्स हवे असतात आणि त्याच टाळ्यांच्या गडगडाटीची भूक असते. खरंतर कलाकार म्हणजे क्षणोक्षणी होणारी सृजना जी कुठल्याच ठरलेल्या साच्यात बसत नाही. कधी आपण हा विचार करतो का, की या टाळ्यांच्या कल्लोळापलीकडे कलाकाराचा स्वतःचा एक आवाज आहे, जो ऐकण्याऐवजी दरवेळी दुर्लक्षित होत असतो?

असं म्हटलं जातं की कलाकाराला आवाज असतो. तो त्या आवाजाने वेगवेगळी पात्र, भूमिका साकारतो. लेखकाचा विचार आपल्या अभिनय कौशल्याने, आवाजाच्या माध्यमाने त्या प्रत्येक विचाराला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. दृश्य, सदृश्य, अदृश्य अशा कैक विचारांची किमया आवाजाच्या तरंगांतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत, अखंड वातावरणात चैतन्य निर्माण करून कलात्मकतेचा उदय करतो. मी आतापर्यंत रंगभूमीवर जेवढी नाटकं पाहिली किंवा केली. त्या प्रत्येक नाटकांमध्ये मी ध्वनी यंत्रणा, संगीत संयोजन, आवाचा चढ-उतार, आवाजाने प्रेक्षकांना होल्ड करणे हे सगळे महत्त्वाचे पैलू अनुभवत आले; पण या सर्व प्रवासात माझी एक बाजू सुटत होती ती म्हणजे स्वतःच्या आतला आवाज ऐकण्याची.

स्वतःचा आवाज ऐकणे म्हणजे नेमकं काय? जिवंत असल्याची निशाणी.. स्वतःशी संवाद करण्याची सुरुवात.. खरेपणा आणि माणुसकीला रुजवण्याची प्रक्रिया.. संवेदना आणि सहवेदनांची जाणीव.. या सगळ्या मानवी मूल्यांना मुळापासून नष्ट करण्याचे षड्यंत्र आज बाजारीकरण रचत आहे. फेम आणि ग्लॅमरच्या चौकटीत अडकून कलाकार कठपुतली होत आहेत. दुसर्‍यांच्या इशार्‍यावर केवळ शारीरिक क्रिया करणे, ज्यात स्वतःच्या मेंदूचा, विचारांचा, तत्वांचा काहीच उपयोग होणार नाही असे षड्यंत्र रचले जात आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी कलाकाराने साधलेली सिद्धी त्याच्या हातून सुटत चालली आहे, याची कलाकारांना अजून जाणीवही होत नाही.

रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित दिग्दर्शित नाटक अनहद नाद – अनहर्ड साऊंड्स ऑफ युनिव्हर्स मधल्या अपनी अनसूनी आवाज सुनो या गाण्यामुळे मला स्व-अस्तित्वाची जाणीव झाली. अशा चंदेरी दुनियेत जिथे दिखाव्याला महत्त्व दिले जाते, जिथे कला किंवा नाटक म्हणजे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जाते, जिथे रंगभूमीवर मुखवटा चढवून केवळ प्रसिद्धीसाठी कलेचा र्‍हास होत आहे, तिथे या नाट्य प्रक्रियेतून मी स्वतःचे सत्व साधून, कलेला आणि कलाकारांना उन्मुक्त करत, कलात्मक सत्व जपत आहे. आणि या कलात्मक सत्वाने आयुष्य जगण्याचे सौंदर्य वाढवत आहे.

रंगकर्म एक साधना आहे आणि अभिनय म्हणजे अभिव्यक्तीची निरंतर असणारी शोध प्रक्रिया. कलाकाराची साधना हीच त्याची खरी सिद्धी आहे आणि हीच प्रक्रिया आपोआप प्रसिद्धीही मिळवून देते. एक अशी ओळख जी कायमस्वरूपी आपली राहते. अपनी अनसूनी आवाज सुनो या गाण्याने मला, माझी एक जगावेगळी ओळख मिळवून दिली. हे गाणं गात असताना जशी मी स्वतःच्या आत जाऊ लागते तसा माझा स्वतःचा आत्मिकशोध सुरू होतो. प्रेक्षक जेव्हा हे गाणं ऐकतात तेव्हा त्यांना ही या आत्मशोधाची प्रचिती होते आणि प्रत्येक जण स्वतःचा आवाज ऐकण्यासाठी स्वयंप्रेरित होतो. कलाकार रंगभूमीवर अनेक पात्र साकारतो; पण तो आयुष्यात व्यक्ती म्हणून कोण आहे हे जोपर्यंत त्याला माहीत नसेल तोपर्यंत तो उत्तम कलाकार होऊच शकत नाही. यासाठी आत्मशोध ही प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरते. या नाटकाने माझ्यातल्या कलाकाराला तर बहरलेच सोबत माझ्यातल्या व्यक्तीला आकार देण्याची शक्तीही मला दिली.

नाटकात किंवा कलेत ही ताकद असते की माणसाच्या व्यक्तिगत अनुभवाला सकारात्मक दिशा देण्यासाठी आणि त्याला उन्मुक्त करण्यासाठी, माणसात असलेल्या कलेला नाटक जिवंत करते. माणूस हा शरीर आहे तर कलाकार त्यातला प्राण! हा कलाकार नाटकातल्या पात्राची बौध्दिकता समजून, स्वतःच्या कलात्मक सत्वाला प्राप्त करून, व्यक्तीला कलेशी जोडतो आणि दोघांचाही स्तर वाढवतो. अशी प्रक्रिया व्यक्ती आणि कलाकार दोघांना समृद्ध करते. आणि थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांतानुसार कलाकार आणि व्यक्ती हे दोघेही दोन वेगळ्या भूमिका असल्या, यांच्या जगण्याचा मार्ग जरी वेगळा असला, यांचा प्रवास ही वेगळा असला, तरीही हे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात, कोलॅबोरेट करतात. कारण कलाकार आपल्या सत्वातून कलेला समृद्ध करत असतो आणि व्यक्ती आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला उन्मुक्तपणे जगत असतो.

जीवन ही जगण्याची एक कला आहे. जसं कलेला विकलं जाऊ शकत नाही तसेच आयुष्यातल्या अनमोल अनुभवांना विकत घेतले जाऊ शकत नाही. या नाटकातून मी हेच शिकले की आपले आयुष्य हे नफा तोटा लिहिण्याची बॅलन्सशीट नाही आहे. एक कलाकार म्हणून आपल्या भावनांना वैचारिक दृष्टीकोन देऊन रंगमंचावर अभिव्यक्त होणे आणि एक व्यक्ती म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण उन्मुक्तपणे जगणे हीच माझी कला आणि जीवनाप्रति निष्ठा आहे.

अपनी अनसुनी आवाज सुनो
– मंजुल भारद्वाज

अपनी, सबकी और सारे ब्रह्मांड की
अनसुनी आवाज सुनो !

मानवीय विष को पीना ही
कला का ध्येय है

संवेदना है उत्पाद नहीं
कला का अब व्यापार नहीं

साधना है, कारोबार नहीं
सुनो सुनो आवाज़ सुनो

अपनी अनसुनी आवाज़ सुनो
अपनी, सबकी और सारे ब्रह्मांड की आवाज़ सुनो !

-कोमल खामकर – रंगकर्मी

First Published on: June 23, 2019 4:44 AM
Exit mobile version