असामान्य अरूणिमा…निश्चयाचे शिखर केले सर

असामान्य अरूणिमा…निश्चयाचे शिखर केले सर

Arunima

अनेक समस्यांचा सामना करत तिला हे यश मिळाले आहे. अरूणिमा राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू होती. मात्र तिच्या आयुष्यात एक खूपच दुर्देवी प्रसंग घडला. रेल्वेतून प्रवास करत असताना काही गुंडांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने त्याला प्रतिकार केला. त्या रागातून गुंडानी तिला ट्रेनबाहेर निर्दयपणे ढकलून दिले. या दुर्घटनेत अरूणिमाचा जीव वाचला, मात्र पाय वाचू शकला नाही. तरीही मृत्यूशी संघर्ष करत क्रिकेटपटू युवराज सिंग आणि गिर्यारोहक अर्जुन वाजपेयी यांच्याविषयी वाचून तिने स्वतःला बळ दिले. तिने परिस्थितीशी दोन हात केले. आपली इच्छाशक्ती मजबूत केली.

आपले मनोबळ योग्य असेल आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हे अरूणिमाने आपल्या जीवनातून दाखवून दिले.अरूणिमाचे वडील लहानपणीच गेल्यामुळे जीवनात परिस्थितीने निर्माण केलेली आव्हाने होतीच. मात्र आपली आई आणि मोठ्या बहिणीच्या पाठिंब्यामुळेच अरुणिमा फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि हॉकीसारख्या खेळांमध्ये पुढे होत्या. मोठ्या बहिणीच्या पाठिंब्यामुळेच खेळासोबत अभ्यास आणि शिक्षण संभाळून एलएलबीची पदवीदेखील अरूणिमा यांनी घेतली.

नोकरीसाठी नोएडाला जात असताना झालेल्या दुर्घटनेत अरूणिमा यांचा पाय ट्रेनखाली आला. रात्रभर त्या बेशुद्ध अवस्थेत ट्रेनच्या रूळाजवळच पडून होत्या. सकाळी आजूबाजूच्या लोकांनी पाहिल्यानंतर हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलं. मात्र अरूणिमाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्यांचा पाय कापावा लागला. यानंतर अरूणिमा यांना अनेकांनी नोकरी देण्याची घोषणा केली. इतकंच नाही तर ममता बॅनर्जी यांनीही नोकरी देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यातील अनेक आश्वासने हवेतच विरून गेली. याच दरम्यान अनेकांनी अरूणिमाविरोधात अनेक खोट्या गोष्टी पसरवण्यास सुरुवात केली होती.

ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी अरूणिमा कोणाबरोबर तरी पळून जात होती. अशा प्रकारच्या अतिशय निंद्य स्वरुपाच्या अफवाही पसरवण्यात आल्या. या सर्व परिस्थितीसमोर अरुणिमा हतबल झाल्या नाहीत. या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. अशा अवस्थेतही बरेच काही करण्याची इच्छा होती. पाय गमावल्याने त्या हतबल झाल्या नाहीत. आई आणि बहिणीने त्यांना आवडीनिवडी जपण्याचा सल्ला दिला. वेळ घालवण्याच्या उद्देशाने अरूणिमाने नियमित वर्तमानपत्र वाचणे सुरू केले.

अशावेळीच त्यांना गिर्यारोहक अर्जुन वाजपेयींच्या बातमीने धीर दिला आणि गिर्यारोहणाच्या क्षेत्रात नावलौकीक मिळवण्याची इच्छा निर्माण झाली. हा निबिड अंधारात एक आशेचा किरण होता. याच दरम्यान त्यांना कृत्रिम पाय बसवण्यात आला. या पायाच्या बळावर आणि मनाशी पक्का निश्चय केल्यानंतर त्यांनी तयारी केली. मात्र इथेही अरूणिमाचा त्रास संपला नव्हता. अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत होत्या. शिवाय केवळ शारिरीक कमतरतेकडे बोट दाखवून हे तुम्हाला जमेल का? असा नकारात्मक सूर लावणारेही अनेक जण होते. एकदा तर एका रेल्वे सुरक्षा जवानाने खरंच अपंग आहे का, हे पाहण्यासाठी अरूणिमाचा कृत्रिम पाय उघडून दाखवण्यासाठीचा दबावही टाकला होता. हे असे अवमान पदोपदी केले जात होते.

मात्र, अशाही प्रसंगातून अरूणिमा यांनी आपले मनोधैर्य खचू न देता निश्चय पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू केले. बछेंद्र पाल या माऊंट एव्हरेस्ट सर करणार्‍या पहिल्या भारतीय महिला गिर्यारोहक होत्या. अरूणिमा यांनी सतत प्रयत्न करून बछेंद्री पाल यांना संपर्क केला. त्यांना भेटण्यासाठी अरूणिमा जमशेदपूरला गेल्या. बछेंद्री पाल यांनी अरूणिमा यांना मुळीच निराश केले नाही. त्यांनी अरूणिमा यांना शक्य होणारी प्रत्येक मदत केली आणि अरूणिमाला नेहमीच प्रोत्साहन दिले.

अरूणिमा यांनी उत्तराखंडातील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनरिंग (एनआयएम) या संस्थेमधून 28 दिवसांचे गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर इंडियन माऊंटेनिअरिंग फाऊंडेशनने (आयएमएफ) अरूणिमाला माऊंट एव्हरेस्ट चढण्याची परवानगी दिली. 31 मार्च, 2012 मध्ये सुरू झालेली ही मोहीम अरूणिमाने 21 मे, 2013 रोजी सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकवत यशस्वीरित्या पूर्ण केली.

 

First Published on: October 11, 2018 1:46 AM
Exit mobile version