बोकड निर्यातबंदीची भानगड!

बोकड निर्यातबंदीची भानगड!

जैनांच्या खांद्यावर रा. स्व. संघाची बंदूक

गोवंश हत्याबंदीचा कायदा झाला. पण म्हशी, रेडकू कापू नका, त्याचं मटण खाऊ नका, असं कुणी म्हणत सरकारला वेठीस धरत नव्हतं. शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या, मासे खाण्यात हिंसा आहे, हे जैन समाज म्हणे. पण ते जाहीर म्हणायची आणि आता बोकड खाण्याला आमचा विरोध आहे, अशी भूमिका घेऊन भांडायची जैन संघटनांना हिंमत कुठून आली? हे समजूवन घ्यायचं तर रा.स्व. संघाच्या राजकारणाची पद्धत लक्षात घ्यावी लागते. शाकाहारी समाज असला पाहिजे, ही भूमिका आहे जैनांची, पण तिचा राजकीय वापर करणं संघ परिवाराच्या हिताचं आहे.

रिचा जैन नावाच्या नागपूरच्या महिला अचानक, चमत्कारिरित्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यांचा पराक्रम तो काय? त्यांनी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा १५०० बोकडांचं शारजाला जाणारं विमान अडवलं. शारजा आणि आखात विमानातून बोकडांची निर्यात होणार होती. बोकड विकून धनगर समाजाला पैसै मिळणार होते. चांगले भरपूर. अशी निर्यात वाढली की विदर्भात शेळ्या-मेंढ्या पालनाला-चालना मिळणार होती. धनगरांसह इतर पशुपालक शेतकरी समाजाच्या घरात पैसा खुळखुळणार होता.

समारंभ होणार होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र शेखावत, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर येणार होते. धनगर समाजातून आलेले खासदार डॉ.विकास महात्मे यांनी या समारंभासाठी, बोकड निर्यातीसाठी पुढाकार घेतला होता. अ‍ॅमिगो लॉजिस्टीक्स, यु.एस.इन्टरप्रायझेस या उद्योग कंपन्यांच्या सहाय्याने हा उपक्रम तडीस जाणार होता. उद्योग, कृषी खांत, मिहान आणि एअर इंडिया यांचं सहकार्य होतं. असा सगळा सरकार पुरस्कृत उद्योग पुढे जात असताना रिचाबाईनी खोडा घातला. रिचाबाई अखिल जैन समाजाच्या प्रतिनिधी आहेत. दिगंबर पंथीय आहेत. त्यांनी बोकडांच्या हिंसेला विरोध केला. विमान थांबवा म्हणाल्या. संत्रीचं नागपूर बोकडनिर्यातीसाठी कुप्रसिद्ध करायचं का? आणि बोकडांच्या हिंसेमुळे नेपाळात भूकंप झाले. तशी विघ्नं नागपूर परिसरात येतील. बोकडांचा तळतळीटाचं पाप नको. असे युक्तिवाद करत रिचाबाईंनी रा. स्व. संघाचे सर्वेसर्वा मोहन भागवत यांनाही गळ घातली. नंतर सारी सरकारी यंत्रणा हलली. आणि विमान अडवण्यात रिचाबाई यशस्वी झाल्या.

जैन संघटना शाकाहारासाठी आग्रही यापूर्वीही होत्या. हिंसा नको, असं जैन धर्म सांगतो. त्याबद्दल सर्वांना आदर आहे. पण सरकारी धोरणावर त्याचा परिणाम असा थेट कधी झाला नव्हता. गोवंश हत्याबंदीचा कायदा झाला. पण म्हशी, रेडकू कापू नका, त्याचं मटण खाऊ नका, असं कुणी म्हणत सरकारला वेठीस धरत नव्हतं. शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या, मासे खाण्यात हिंसा आहे , हे जैन समाज म्हणे. पण ते जाहीर म्हणायची आणि आता बोकड खाण्याला आमचा विरोध आहे. अशी भूमिका घेऊन भांडायची जैन संघटनांना हिंमत कुठून आली?

हे समजूवन घ्यायचं तर रा.स्व. संघाच्या राजकारणाची पद्धत लक्षात घ्यावी लागते. शाकाहारी समाज असला पाहिजे, ही भूमिका आहे जैनांची, पण तिचा राजकीय वापर करणं संघ परिवाराच्या हिताचं आहे. मांसाहार करणं अपवित्र, अशुद्ध, अस्वच्छ, वाईट, पाप म्हणून अमानवी, राक्षसी, मांसाहारी माणसं कमी दर्जाची, खालच्या पातळीची, मांसाहार कोण करतं तर जास्ती संख्या बहुजन समाजाची. यात कोण येतं. इतर मागासवर्गीय (ओबीसी), आदिवासी, ख्रिश्चन, पारसी, शिख, दलित, मुस्लिम म्हणजे जास्ती लोक ब्राम्हणेतर आहेत. संघ परिवाराचं राजकारण, संघटन मुस्लीम, ख्रिश्चनद्वेषावर उभं आहे. या समूहांचा द्वेष करण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण ते मांस खातात, शाकाहारी नाहीत हे आहे. मांस खाणार्‍यांचा द्वेष करण्याचा संघ परिवाराचा अजेंडा चलाखीने आता जैनांच्या खांद्यावर दिला गेलाय. संघाची ही चाल यशस्वी ठरताना दिसतेय. या चालीच्या यशातली एक पायरी म्हणून नागपूरचं बोकडांचं विमान अडवलं गेलं.

बोकड निर्यातबंदीच्या भानगडीनं बहुजन समाजाचा राग वाढणे साहजिक आहे. या समाजातील धनगर आणि इतर पशूपालक समाजाचा शेळ्या मेंढ्या पाळणं हा वर्षानुवर्षांचा व्यवसाय आहे. भारतभर शेतीला पूरक उद्योग म्हणून हा समाज शेळ्या मेंढ्या पाळतोय. शेळ्या-मेंढ्या बोकडांची निर्यात होऊ लागली तर या व्यवसायातील भरभराट वाढेल. ज्या शेतकरी कुटुंबांत शेळ्या-मेंढ्या-कोंबड्या पाळतात. तिथं आत्महत्या कमी होतात. कारण शेती तोट्यात गेली तर अडीअडचणीला शेळी-मेंढी-बकरी-बोकड- कोंबड्या विकून उदरनिर्वाह करता येतो. आजारपण, मुलांचं शिक्षण अशा खर्चाला पैसे उभे करता येतात.

शिवाय शेळ्या-मेंढ्यांचा ‘गोट फॉर्म’ व्यावसायिक पद्धतीनं अधिक भांडवल गुंतवून केला तर अल्पावधीत श्रीमंती घरात येते. अशी उदाहरणं आहेत. शेतकरी जातींना हुकमी उपयोगी बोकड निर्यात बंदीच्या भूमिकेनं गदा आणण्याचा प्रयत्न होतोय. जैन समाजानं त्यात खोडा घातल्यानं सारा राग जैनांवर काढला जातोय.

रिचाबाईंनी बोकडविमान अडवलं यात सर्वात मोठी अडचण धनगरांच्या नेत्यांची झालीय. खासदार विकास महात्मे हे धनगर आरक्षण चळवळीतून पुढे आलेत. या चळवळीचे नेते म्हणून त्यांना भाजपने खासदारकी दिली. तसे महात्मे हे संघ परिवाराशी स्नेह असलेले. पण विदर्भात त्यांच्या मागे धनगर आहोत त्याचा भाजप, संघ परिवाराला उपयोग करून घेता येईल. अशा हेतूने त्यांना खासदारकी दिली. धनगर समाजही आरक्षणाचं आश्वासन देणार्‍या भाजपला मोठ्या संख्येनं मतदान करता झाला, सत्तेवर आल्या आल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत तुम्हाला आरक्षण देतो, असं सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चार वर्षे उलटून गेले तरी आरक्षण देण्यात अपयशी ठरलेत. आरक्षण मिळेल की नाही, एस.टी. प्रवर्गात समावेश होणार की नाही या चिंतेनं धनगर समाज हतबल झालाय. त्या हतबलतेतून चीड, संताप, राग अनावर होतो.
महात्मे यांनी संतापाची वाफ निघून जावी म्हणून बोकड निर्यातीची फुंकर घातली होती. पण जैन समाजाच्या विरोधाने सरकारने नांगी टाकली आणि महात्मेही गळपटले. महात्मे यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झालीय. ते केविलवाणे होऊन म्हणताहेत, जैन समाजाला समजवून सांगू. बोकड निर्यात फायदेशीर आहे. धनगरांचं त्यात हित आहे हे पटवून देऊ.

महादेव जानकर पशुसंवर्धन मंत्री आहेत. त्यांनी या विषयावर भूमिका घ्यायला हवी होती; पण ते बोलायला तयार नाहीत. त्यांची आमदारकीची मुदत संपत आली होती. विधान परिषदेत भाजपच्या कोट्यातून आमदारकी मिळाली तर मंत्रीपदी राहता येणार होतं. बोकड निर्यातबंदीची भानगड घडत असताना त्यांना आमदारकी मिळाली. त्या आनंदात ते मश्गुल आहेत. राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. तिथं जानकर आमदारकी मिळाल्याचा आनंद घेऊन मिरवताहेत; पण बोकडबंदीवर अवाक्षर काढत नाहीत, हे धनगर समाज उघड्या डोळ्यांनी बघत असणार.

एसटी आरक्षण लांबवून भाजप आपल्या भावनांशी खेळतोय. यामुळे जखमी झालेल्या धनगर समाजाच्या भळभळत्या जखमेवर बोकडबंदीचं मिठ जोरजोरात रगडलं जातंय. त्यामुळे हा समाज येत्या काळात आक्रमक झाला तर नवल ते काय? जैनांच्या मांसाहार विरोधाच्या मनमानीवर आधीच मुंबईत लोकांत तीव्र संताप आहे. हा संताप पर्युषणपर्वाच्या काळ उफाळून येत असतो. नागपुरात बोकड विमान रोखलं यामुळे जैन समाजातला आक्रमक गट आता अधिक धिटाईने मोठ्या शहरात मांसाहाराला विरोध करू लागेल. रा. स्व. संघ परिवार अर्थातच या आक्रमक गटाची पाठराखण करील. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन संस्था या संघटना जशा हिंसक वातावरण तयार होण्यासाठी पूरक माहोल तयार करतात. तसा हिंसक माहोल जन्माला घालण्याला जैन समाजाला संघ परिवार वापरेल. त्यातून हिंसक वातावरण अधिक हिंसक बनेल. त्याचा स्फोट येत्या पर्युषण पर्वात पहायला मिळू शकतो. असा स्फोट झाला तर पहिला दगड धनगर समाजातल्या तरूणांच्या हातात असेल काय? कारण मांसाहार विरोधी भूमिका पहिली लाथ त्यांच्या पोटावर मारतेय.

भारतात ९०-९५ टक्के समाज मिश्रहारी आहे. मांस हा त्याच्या अन्नातला महत्त्वाचा, जीवनावश्यक घटक आहे. आमचेच म्हणणे खरे, आमचाच विचार मोठा, शाकाहार हाच शुद्ध महान अशा अव्यवहारी, मंदबुद्धी भूमिका घेणर्‍या या गटांना हा समाज हा देश, त्याची साझी समन्वयी संस्कृती कळलेली नाही. महात्मा गांधी शाकाहारी होते. पण ते मांसाहारींचा द्वेष करत नसत. म्हणून त्यांच्या वर्ध्याच्या आश्रमात सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांच्यासाठी मांस शिजे, कधी ते बीफही असे. गांधींना देश कळला होता. म्हणून असं कारण भाग होतं. रा. स्व. संघ गांधींना प्रातः स्मरणीय मानतो. पण त्यांचं जगणं समजून घेत नाही. म्हणून या गडबडी सुरू आहेत.

संघाचं देशावर राज्य आलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हिंदू नसून जैन आहेत. शहांच्या स्वार्‍या देशभर गाजत आहेत आणि त्या काळात जैन समाज बोकड निर्यातबंदीची मागणी करतोय, कोर्टात जाण्याची भूमिका मांडतोय. त्याला संघाचा आशीर्वाद आहे, हा डाव जनतेला कळत नसेल असं संघ परिवाराला वाटत असेल; पण ती वस्तुस्थिती नाही, हा गांधींचा देश आहे. तरीही संघ परिवार, जैन समाजाने हट्ट रेटला तर येणार्‍या पर्युषण पर्वात मुंबईसारख्या शहरात या हट्टाविरोधात लोक रस्त्यावर आले तर जबाबदार कुणाला धरायचं?

-राजा कांदळकर

First Published on: July 8, 2018 3:58 PM
Exit mobile version