बेरडवाडीतलं ‘चुनावी ध्यान’

बेरडवाडीतलं ‘चुनावी ध्यान’

सार्वजनिक शौचालयांच्या दरवाजाचा ‘चुनावी जुमला’ करून अण्णा पाटलाच्या पॅनलनं बेरडवाडी ग्रामपंचायतीची सत्ता मिळवली, हे आपण मागच्या भागात वाचलं. पण यंदाची निवडणूक सोपी नसल्याचं लक्षात आल्यानं मतदानाच्या एक दिवस आधी अण्णाला आणखी एक ‘दिव्य’ करावं लागलं. ते कोणतं? या भागात वाचूयात !

बेरडवाडीत आठवडे बाजारचा दिवस असल्यानं शाळा सकाळीच भरली होती. वर्ग सुरू होऊन पुरता अर्धा तासही झाला नव्हता की मास्तर टेबलावर पाय ताणून झोपलं होतं. त्यामुळे पोरांचा नुसता कालवा चालला होता; पण नेहमीची सवय असल्याने मास्तरच्या झोपेवर त्याचा काही परिणाम होत नव्हता. मास्तरची पोरंपण एकदम बेरकी होती. मास्तर झोपल्यावर एका कार्ट्यानं खुर्चीवरून लोंबणारं त्यांचं धोतर हळूच सुतळीनं टेबलाच्या पायाला बांधून टाकलं. अशात अण्णा पाटलाच्या गड्यानं पचका केला. गडी थेट वर्गातच मास्तरच्या टेबलापाशी गेला आणि दवंडी पिटल्यागत त्यांच्या कानाजवळ ओरडला, ‘उठाऽऽ वो मास्तर… अण्णानं बोलवलंया वाड्यावर..’

खरं तर, सकाळीच शाळंत यावं लागल्यानं मास्तर आपली राहिलेली साखरझोप उरकीत होतं; पण अचानक आलेल्या या हाळीनं मास्तर धडपडत उठलं, ते एकदम तोंडावरच पडलं. इतकं जोरात की त्याला खरे दात असते, तर तीन-चार नक्कीच तुटले असते. पण झोपताना कवळी शर्टाच्या खिशात ठेवल्यानं दात वाचले. मास्तर पडल्यावर पोरांनी पुन्हा मोठ्यानं कालवा केला. मग अण्णाच्या गड्यानं मास्तरांना हात देऊन उभं केलं. त्यानंतर आपण कोण? कुठं आहोत? … वगैरे अध्यात्मिक प्रश्न सोडविण्यात मास्तरची दोन-पाच मिनिटं गेली. पुरतं भानावर आल्यावर त्याला अण्णा पाटलाचा गडी समोर दिसला. तेव्हा मास्तरनं कपाळावर आठ्या आणून काय कामंय? या अर्थाचा चेहरा केला.

गड्यानेही वेळ न दवडता वाड्यावरचा निरोप सांगितला, ‘अवं मास्तर सकाळी उठल्यापास्नं अण्णा लय येड्यावानी करायला लागल्यात बघा…पाटलीन वयनी म्हनल्या की मास्तरांना बोलीव लगेच…’ हे सांगताना त्याचा चेहरा भेदरला होता.
‘वेड्यासारखं म्हणजे रे काय?’ मास्तरांचा प्रश्न.

‘अवं वाड्यामागचं म्हादेवाचं मंदिर हाय नव्हं, तर अण्णा सकाळी सकाळी भगवं धोतर नेसून उघड्या अंगानं तिकडं गेलेत… आधी घरच्यांना वाटलं देवपूजा करणार असतील, पन त्येंच्या हातात टिकाव फावडं हुतं मास्तर… तसंच तरातरा निघालं.. मग पाटलीन वयनी म्हनल्या शिरप्या तू बी जा रं. जरा, पाहून ये…म्हणून म्या गेल्तो तं मंदिराबाहेर अण्णा खड्डा खोदताना दिसलं.. तोंडानं ध्यानधारणा, समादी असं काय बाय बोलत हूतं.. मी आल्या पावली वयनीसायबास्नी हे सांगितलं. तर त्यांनी तुमास्नी बोलवाय धाडलं…’ हे सांगत असताना जवळजवळ हाताला धरूनच शिरप्यानं मास्तरला पुन्हा चलण्याचा आग्रह केला. ‘मॅटर शिरियस असावं’, असा तर्क मास्तरनं केला. टेबलावरच ठेवलेल्या तांब्यातलं पाणी हातावर घेऊन दोन हबकारे तोंडावर मारले आणि गड्यांच्या मागोमाग चालता झाला.

बेरडवाडी ग्रामपंचायतीसाठी उद्याच मतदान होणार होतं. त्यासाठी निवडणूक अधिकारी एक दिवस आधीच गावात हजर झाले होते. पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता. काल संध्याकाळीच प्रचार संपला. आता आचारसंहिता असल्यानं प्रचार वगैरे काही करता येणार नव्हता. मागची पाच वर्षे अण्णा पाटलानं केवळ आश्वासनं आणि लोकांना थापा मारण्यातच काढली, त्यामुळं यंदाची निवडणूक त्याच्यासाठी अवघड होती. खुद्द अण्णालाही आपण निवडून येऊ की नाही याबद्दल शंका होती. पण बेरकी राजकारणात अण्णा वाकबदार होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर गावच्या संडासच्या दरवाजाचा प्रश्न ऐरणीवर आला आणि अण्णानं त्याचा फायदा उठवला. तरी पण त्याच्या मनात धाकधूक होतीच. आता तर प्रचार संपल्यानं काहीच करता येण्यासारखं नव्हतं. रात्रभर अण्णाला झोप लागली नाही. पहाटेच्या सुमारास त्याच्या डोक्यात एक कल्पना आली आणि मग सकाळीच तो भगवं धोतर नेसून महादेवाच्या मंदिराकडे टिकाव फावडं घेऊन निघाला होता.

शिरप्या आणि मास्तर महादेवाच्या मंदिरात पोचले, तेव्हा अण्णा पाटलानं फूटभर खोल खड्डा खणला होता. तोंडानं सारखं, ‘ओम नम: शिवाय., ओम नम: शिवाय..’चा जप सुरू होता… एरवी शिव्यांशिवाय तोंडात काहीही येत नसलेला अण्णा आज चक्क ‘नम: शिवाय’ म्हणत होता. महादेवाच्या मंदिराजवळच बेरडवाडीचा आठवडी बाजार भरतो. बाजारात हळूहळू गर्दी होऊ लागली होती. एखाद-दुसरा मंदिरात येई, तेव्हा त्याचं लक्ष भगवे कापडं घातलेल्या अण्णाकडे जाई. काही तर महादेवासोबत अण्णालाही नमस्कार करू लागले होते. एक दोघांनी तर अण्णा पाटलाच्या गळ्यात हारही घातले…त्यातच ‘अण्णा समाधी घेणार असल्याचं कुणीतरी बोललं’…स्वत: अण्णा पाटील मात्र कुणाशीच बोलत नव्हता, मन लावून तो खड्डा खणत होता.. मास्तर पोचले तेव्हा अण्णाशी बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला; पण काही तरी खाणाखूणा करून अण्णा पुन्हा खड्डा खोदायला लागला.

‘अण्णा पाटील खड्डा खोदून समाधी घेतोय’, ही बातमी बाजारात आणि गावात पोचल्यानं मंदिराजवळ तोबा गर्दी उसळली. पाटलीन वहिनी पण आता तिथे आल्या होत्या. अण्णाचं ध्यान पाहून त्यांनी तर डोळ्याला पदरच लावला. उन्हं वर येईपर्यंत पाचेक फूट खड्डा अण्णानं खोदला होता. त्याच्यासोबत आता जमलेली लोकंही मोठ्यानं ‘ओम नम: शिवाय’चा गजर करू लागले…

उन्हं वरती आले आणि अण्णानं खोदकाम थांबवलं. कुणाशीही न बोलता तो आधी महादेवाच्या मंदिरात गेला. तिथे दर्शन घेऊन तो खोदलेल्या खड्ड्याजवळ आला. तत्पूर्वी त्यानं कुणालाही लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं मास्तरला काहीतरी खुणावलं आणि खड्ड्यात जाऊन ध्यान लावल्यागत बसला. लोकांनी पुन्हा ओम नम: शिवायचा गजर केला. ते दृश्य पाहून पाटलीन वहिनीनं तर गळाच काढला… पाटलीन बाई रडत्यात, म्हणून मग गर्दीतील काही बाया बापड्यांनीही डोळे पुसायला सुरुवात केली. एरवी गावात दंगल घडविणारा, सरकारी योजनांच्या नावानं फेकाफेकी करणारा, बेरकी राजकारण करणारा अण्णा आज पूर्ण बदलला, देवधार्मिक झाला, ही बेरकेवाडीच्या बंबाळेश्वर महादेवाचीच कृपा असं काही गावकरी म्हणू लागले. अण्णाचे खरे रूप माहीत असलेले त्याचे विरोधक मात्र अण्णा बसलेल्या खड्ड्यात वरून माती कधी लोटणार? अन् त्याला समाधी कधी देणार? याकडे डोळा लावून बसले होते. पण तसं झालं नाही.

अचानक मास्तर पुढं झालं आणि त्यानं बोलायला सुरुवात केली. ‘ बेरडवाडीकरांनो, आपले अण्णा आज दिवसभर ध्यान-धारणा करणार आहेत. खरं तर ते समाधीच घेणार होते; पण गावच्या भविष्याचा विचार करून ते केवळ ‘अर्धसमाधी’ घेणार आहेत. कलियुगात समाधीचा हा उच्च प्रकार समजला जातो…’ आणखीही बरंच काही सांगून मास्तरनं सरतेशेवटी अण्णाला शांततेची गरज असल्याचं कारण देऊन पाटलीनबाईसह सर्वांना तिथून रवाना केलं. सर्वजण गेल्याची खात्री केल्यावर तासाभरानं मास्तरनं अण्णाला उठवलं. आधी एक डोळा उघडून अण्णानं सवयीप्रमाणं खात्री केली. नंतर बाहेर येत मास्तरला टाळी देत म्हणाला, ‘ मास्तर, रात्रभर जागा होतो, काय छान झोप लागली खड्ड्यात. बरं ते राहू द्या, कसं वाटलं आमचं ‘ध्यान’? आता आमचा विजय पक्का ना !!’

‘अण्णा पुन्हा एकदा मानलं तुम्हाला बुवा. आचारसंहितेत प्रचाराची नवीच शक्कल शोधून काढली की तुम्ही… इतकंच कशाला, तुमचं ध्यान सुरू असताना ‘एक निवडणूक अधिकारी आणि दोन पोलिसही येऊन गेले नमस्काराला, आता बोला..’ मास्तर हर्षोत्सवानं चित्कारलं. त्यावर ‘ओम नम: शिवाय’ असं मोठ्यानं म्हणत अण्णा बेरकी हसत समाधानानं वाड्याकडे निघाला.

First Published on: May 23, 2019 4:47 AM
Exit mobile version