योगाद्वारे बना सृजनशील अन् आरोग्यसंपन्न

योगाद्वारे बना सृजनशील अन् आरोग्यसंपन्न

योगशास्त्र मुख्यत: प्रायोगिक शास्त्र असल्याने त्यात सैद्धांतिक भागासोबतच साधनेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. म्हणूनच पतंजलींनी योगदर्शनामध्ये ध्यानादी प्रकार सांगितले आहेत. हे प्रकार म्हणजेच योगाची आठ अंगे अर्थात अष्टांग योग. ही आठ अंगे बहिरंग आणि अंतरंग या दोन भागांत विभागलेली आहेत. बहिरंग योगात यम, नियम, आसन, प्राणायाम येतात आणि अंतरंग योगात ध्यान, धारणा, समाधी याचा अंतर्भाव होतो. पाचवे अंग म्हणजे प्रत्याहार जे दोन्ही भागांशी संबंध जोडते. माणसाचे स्थूल शरीर व सूक्ष्म मन यांचा घनिष्ट संबंध आहे. नेमका याचाच एकत्रित विचार योगशास्त्रात करण्यात आलेला आहे. शरीरसंवर्धन आणि मनशुद्धी (मनोकायिक आरोग्य) लाभण्यासाठी यम, नियम आदी साधने सांगितली आहेत.

प्रत्याहार म्हणजे मन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याची शिस्त. प्रत्याहाराच्या अभ्यासामुळे इंद्रियांना शांत ठेवणे शक्य होते. एकाग्रता साधण्याची कला म्हणजे धारणा. यामुळे आंतरिक जागरूकता निर्माण होते आणि मनात सतत उद्भवणार्‍या विचारांचे संकलन होऊन मानसिक ताणतणाव दूर होतात. धारणा दीर्घकाळ टिकून राहिली तरच ध्यानापर्यंत पोहोचू शकतो. साधकाच्या मनोकायिक रचनेत सुयोग्य बदल घडवून आणण्याची शक्ती असते म्हणूनच ध्यानाला मोठे महत्व आहे. विनाव्यत्यय दीर्घकाळ ध्यानातून समाधी लागते, हेच योगसाधनेतील शेवटचे अंग मानले जाते. ही अवस्थासुद्धा एक अनुभूती आहे. मानवी जीवनातील शरीर आणि मन या दोन्हीही प्रमुख घटकांचा अत्यंत सूक्ष्म विचार योगशास्त्राने केलेला आहे. म्हणूनच मनोकायिक व्याधी समूळ दूर करण्यासाठी योगशास्त्राशिवाय दुसरा पर्याय नाही. सूक्ष्म स्वरूपातील आत्मा हा शरीर व मन यांच्या दुहेरी कवचात अव्यक्त स्वरूपात वास करतो. या आत्म्याच्या प्रगतीसाठी धारणा, ध्यान आणि समाधी ही तीन साधने आहेत.

आरोग्यप्राप्तीसाठी योगाभ्यास करणार्‍या सामान्यांना योगासने, प्राणायाम आणि ध्यान म्हणजेच योगाभ्यास वाटतो. याच गैरसमजातून नाहक आपत्तींना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रत्येक साधकाने जीवनाला अचूक दिशा दाखवणार्‍या सर्वांगाचा टप्प्याटप्प्याने अभ्यास केला तर व्याधीरहित जीवन जगता येईल. आपला दिनक्रम पहाटेपासून सुरू होतो. त्याची सुरुवात तासभर योग आणि प्राणायामाने शांतपणे करा. योग साधनेनंतरचा दिवस ताजातवाना म्हणजे तुमच्या कल्पनाशक्तीचे रंग उतरवण्यासाठी मिळालेला कोरा कागदच असतो. अशावेळी योग साधना संपल्यावर सुचलेल्या सृजनशील कल्पना नोंदवहीत लिहून काढल्यास भविष्यातील नियोजन आणि नवआविष्कारासाठी त्यांचा मोठा उपयोग होतो. योगसाधना करण्यासाठी हवेशीर, पुरेसा नैसर्गिक प्रकाश, शांतता असेल अशी जागा निवडा. यासाठी प्रारंभिक अवस्थेत मार्गदर्शक ध्यानाच्या चित्रफिती, ऑनलाईन पर्यायदेखील प्रभावी ठरतात. एकदा तुम्हाला ही साधना अवगत झाली, त्यात तुम्ही पारंगत झालात की मग या पर्यायांशिवाय तुम्ही अगदी सहजपणे योगसाधना करुन स्वतःसह इतरांनाही आरोग्यदायी वाटेवर नेऊ शकता. योगसाधनेतून चित्तवृत्ती स्थिर होऊन मनाच्या अगाध क्षमतेची अनुभूती येऊ लागते. त्यासाठी मोठ्या आणि सक्षम लाटेवर स्वार होण्याची गरज असते. एखादा जलतरणपटू ज्याप्रमाणे खोल पाण्यात सूर मारतो तसे तुम्हीदेखील तुमच्या सृजनशीलतेमध्ये खोल उतरू शकता. यासाठी सृजनात्मक काम करण्यापूर्वी ध्यान करा आणि मग ते काम सुरू करा.

दुपारच्या वेळी केलेले ध्यान हे आहुतीच्या लाटेप्रमाणे असते. त्यावेळी अस्ताव्यस्त भरकटलेल्या मनाला पुन्हा शांत होण्यासाठी विश्राम आवश्यक असतो. जेव्हा मन अस्वस्थ होते, प्रसन्नता गमावते, सृजनशील विचार थांबतात तेव्हा २० मिनिटांच्या ध्यानामुळे मन शांत करून पुन्हा सृजनशील बनण्यास मदत होते. योगसाधना ही शारीरिक मानसिक आरोग्य सक्षम ठेवण्यासाठी मदत करते. मात्र कोणताही योगशिक्षक व्याधींसाठी सुरू असलेले औषधोपचार बंद करा, असा सल्ला देत नाही. रक्तदाब असेल तर तो योगसाधनेमुळे नियंत्रणात येतो, काही काळानंतर त्यावर सुरू असलेली औषधे कमी करण्याचा सल्ला डॉक्टर स्वतःच देतात. योगसाधना हा विचार, जीवनशैलीचा एक भाग बनतो. उत्तम आरोग्य, योग्य शारीरिक अवस्था आणि शरीरातील मांसपेशींची, स्नायूंची लवचिकता आणि बळकटी वाढावी, एकाग्रता वाढावी, मन शांत राहावे, शरीरासह मनावरील ताण कमी व्हावा, हार्मोन्सचे कार्य सुरळीत चालावे, या कारणांमुळे योगसाधना परदेशातही रुजली. योगसाधनेमुळे शरीराला मिळणारे लाभ सर्वज्ञात आहेत. ज्यांनी नुकतीच योगाला सुरुवात केली त्यांना नेमक्या कुठल्या पद्धतीने योग करावे, समजून घेणे गरजेचे आहे. आपण योगसाधना वजन घटवण्यासाठी, मनावरील ताण कमी करण्यासाठी, शारीरिक वेदना दूर करण्यासाठी अशा कोणत्या कारणासाठी करतो आहोत, याची कारणे लक्षात घेणे महत्वाचे ठरते. याचा सर्वंकष विचार करून कोणती योगसाधना योग्य असेल याचा निर्णय घ्या.

योगमार्गाने जाणारे साधक हे परमेश्वरप्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात. परमात्म्यात आत्मा विलीन व्हावा, परमात्म्याचे आणि जीवात्म्याचे मीलन व्हावे यासाठी त्याचा प्रयत्न असतो. सर्वसाधारण व्यक्ती हा योग्यासारखा योगसाधना करू शकत नसला तरीही त्याचे नियमित प्रयत्न हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आणि व्याधीमुक्तीसाठी उपयुक्त ठरतात. असे मानले जाते की, आजारांचा उगम हा मनातून होत असतो. अर्थात, ते सायको-सोमॅटिक म्हणजेच मनोकायिक असतात. प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अवस्थेसाठी प्रयत्न करणे म्हणजे ‘मेडिटेशन’ करणे, ही व्याख्या आधुनिक वैद्यकशास्त्राने मांडलेली आहे.

ध्यानामुळे रक्तदाब कमी होतो. हृदयाची गती, नाडीचे ठोके, पोटातील अतिरिक्त अ‍ॅसिड कमी होते. स्नायूंवरील तणाव, रक्तवाहिन्यांवरील तणावही कमी होतो. हृदयविकाराचे प्रमाण कमी होते. मानसिक शांतता, मानसिक आरोग्य वाढवण्यास मदत होते. जगण्यातला आनंद वाढतो. म्हणून नित्यनियमाने योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा गरजेची असते.
ध्यानाला बसताना आपल्याला १५-२० मिनिटे एकाच स्थितीत बसायचे असल्याने तितका वेळ न हलता बसता येईल अशी बैठक असावी. खुर्ची, पलंग, जमिनीवर कुठेही बसले तरी चालेल. मात्र, पाठीचा कणा ताठ राहण्यासाठी भिंतीला किंवा खुर्चीच्या पाठीला टेकून बसावे. पद्मासन घालून इतक्या वेळ बसणे शक्य असेल त्यांनी पद्मासनात बसण्यात हरकत नाही. बैठक मांडली की दोन्ही हातांचे तळवे एकावर एक ठेवून उताणे मांडीवर टेकवावे. डोळे मिटून आणि मन एकाग्र करायला सुरुवात करावी. श्वासोच्छवासावर किंवा ॐवर लक्ष केंद्रित करावे. त्याच्याऐवजी दुसरा कुठलाही ध्वनी, शब्द वापरला तरी चालू शकतो.

योगसाधनेचा उगम हा भारतामध्ये झालेला आहे, प्राचीन काळापासून भारतीयांनी योगाचा अवलंब केलेला आहे. अनेक योगगुरु भारतात झाले. त्यांनी योगाचा प्रचार जगाच्या विविध भागात केला. सूर्य नमस्कार हा एक उत्तम योगप्रकार आहे. मुले शाळेत जायला लागल्यापासून हा योगप्रकार त्यांना शिकवला जातो. सकाळी सूर्य उगवल्यावर सूर्याच्या दिशेने तोंड करून सूर्य नमस्कार घातला जातो. यातून मुलांचे शारीरिक अवयव मजबूत बनतात. त्यातसोबत त्यांची मनसिक स्थिती संतुलित बनते. शरीर आणि मन यांचे योग्य संतुलत साधण्याचे काम योगासने करतात. शरीर हे दृश्य आहे, पण मन हे अदृश्य आहे. याचाच अर्थ दृश्य आणि अदृश्य याचा मेळ घालण्याचे कार्य योग साधनेच्या माध्यमातून होते. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर यांनी विशेषत्वाने योग साधनेच्या आंतरराष्ट्रीय प्रसारासाठी पुढाकार घेतला. त्यातून २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा होऊ लागला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने त्याला मान्यता दिली. जगातील अनेक देशांनी योगसाधनेचे महत्व जाणून त्याचा अवलंब केला आहे. आजचा दिवस हा प्रातिनिधिक असला तरी वर्षभर लोक योगसाधना करत असतात. बाबा रामदेव यांनी अलीकडच्या काळात योगसाधना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. त्याचे क्लिष्ट वाटणारे स्वरुप सोपे केले, त्यामुळे भारतभर त्याचा मोठ्या संख्येने लोक अवलंब करून शरीर आणि मनाने अधिक सदृढ होत आहेत.

First Published on: June 20, 2021 11:50 PM
Exit mobile version