राखेतून उडालेला फिनिक्स झालो!

राखेतून उडालेला फिनिक्स झालो!

शिल्पकार प्रमोद कांबळे

कोणतीही कला ही तुम्हाला सर्वार्थाने समृध्द करते, जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन देते हे मी स्वत:च्या अनुभवावरून निश्चितच सांगू शकतो. कलाकार व कला ज्याठिकाणी असते त्याठिकाणी एक प्रकारची शांतता, आनंदी वातावरण असते. मला स्वत:ला कलेचा वारसा माझे आजोबा चित्र-शिल्पकार कै.गोपाळराव कांबळे व वडील कै.दत्तात्रय कांबळे यांच्याकडून मिळालाय. तसे पहायला गेले तर माझ्यावर कला क्षेत्रातच येण्याचे कोणतेही बंधन नव्हते. उलट घरची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसल्याने लहानपणापासूनच मिळेल ती कामे करीत अर्थार्जन करावे लागायचे. परंतु, रक्तातच कलेची आवड असल्याने मला त्यात अधिक रस होता. वडील कला महाविद्यालयात मुख्याध्यापक होते. मी सातवीत असताना मूर्तिकलेच्या शिक्षणासाठी मला राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. दहावीनंतर अहमदनगरच्या प्रगत कला महाविद्यालयातून फाऊंडेशन कोर्स आणि कला शिक्षक डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. चित्रकलेत हातखंडा असला तरी शिल्पकलेकडे अधिक ओढा असल्याने मुंबईत जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सला प्रवेश घेतला. घरची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची असल्याने मुंबईत राहून शिक्षण घ्यायचे म्हटले तर अनंत अडचणी आल्या. अक्षरश: वडापाव खाऊन दिवस काढले.

खिशात पैसे नाहीत, खायची ददात अशावेळी होस्टेलवरील कॅन्टीनमध्ये अक्षरश: चहाबरोबर भात खावून पोटाची भूक भागवायचो. पुढे हे चहा भाताचे माझे जेवण चांगलेच फेमस झाले! चार पैसे गाठीला लागावे म्हणून सिनियर विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट तयार करून द्यायचो. काहीही झाले तरी आपल्या शिकायचे, शिल्पकलेत नैपुण्य मिळवायचेच ही जिद्द होती. त्यामुळेच अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिकत असतानाही कधी त्रागा केला नाही. मी माझे ध्येयनिश्चित केले होते. यातून जे.जे.मधून बाहेर पडल्यावर मुंबईत कामे करण्यास सुरुवात केली. पण मला मुंबईत काही करमत नव्हते. पुन्हा एकदा निश्चय केला व आपल्या जन्मभूमी असलेल्या अहमदनगर शहरालाच कर्मभूमी करण्याचा निर्धार केला व नगरला परतलो. नगरला आल्यावर पुढे काय? असा प्रश्न पडला. त्यावेळी मिळेल ती कामे करण्यास सुरुवात केली. गणेशोत्सवात सजावट करणे, आरासीचे रंगकाम, मूर्तीकाम अशी कामे करू लागलो. याच दरम्यान माझा स्वातीशी प्रेमविवाह झाला. स्वाती तशी सुखवस्तू कुटुंबात वाढलेली, माझ्याकडे तर कलेशिवाय काहीच नव्हते. परंतु, तिने मला खरोखर अर्धांगिनीसारखी साथ दिली. एका ताटवाटीवर आमचा संसार सुरू झाला. एखादे चांगले काम केल्यावर पैसे मिळायचे, काही वेळा काम झाल्यावर पैसे बुडवणारेही होते. असे अनेक अनुभव येत असले तरी कलेवरची निष्ठा ढळू दिली नाही. नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरवतच राहिलो.

१९९७ मध्ये माझ्या कलाप्रवासाला खरी कलाटणी मिळाली. त्यावर्षी भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव होता. त्यावेळीच एक संकल्पना सुचली ती पेन्सिल चित्राची. अहमदनगरच्या महावीर कलादालनात मी ९०  फूट बाय १०फूट रूंदीच्या भिंतीवर जगातील सर्वात मोठे पेन्सिल चित्र साकारले. भारतातील विविध क्षेत्रांतील ५०० नामवंत व्यक्तींची पेन्सिल चित्रे या भिंतीवर काढली. ‘सारे जहाँ से अच्छा’ या थीमवर आधारित पेन्सिल चित्राने मला एक वेगळी ओळख मिळवून दिली. आजही हा अनमोल ठेवा नगरचे भूषण म्हणून दिमाखात उभा आहे. पुढे आदरणीय नानाजी देशमुख यांच्या चित्रकुट येथील प्रकल्पात ‘नन्ही दुनियां’ हा प्रकल्प साकारण्याचे काम मिळाले. यासाठी हत्तीपासून वाघ-सिंहापर्यंत अनेक वन्यजीवांची हुबेहुब प्राणीशिल्पे मी साकारली. हत्तीचे शिल्प तयार केल्यावर ते नगरमध्ये माझ्या स्टुडिओबाहेर ठेवले होते.

तेव्हा रस्त्यावरून जाणारा एक खराखुरा हत्ती माझ्या शिल्पाकडे आकर्षित झाला. माझ्या स्टुडिओसमोर ठेवलेल्या वाघ, सिंहाच्या शिल्पाकडे पाहून भटकी कुत्री रात्र-रात्र भुंकत असत. या मुक्या जीवांकडून मिळालेला प्रतिसाद माझ्यासाठी कलेची मोठी पोचपावती होती. चित्रकुटच्या ‘नन्ही दुनियां’ तील शिल्पाकृतींचे तत्कालिन राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी कौतुक केले. हा माझ्यासाठी गौरवशाली क्षण होता. पुढे मुंबईत ‘काळा घोडा’ फेस्टिव्हलमध्ये विविध प्राणी शिल्पांचा पर्यावरण रक्षणासाठीचा मोर्चा, साईबाबांची शंभर फूटी मूर्ती, अशा अनेकविध चित्र शिल्पांच्या विश्वाने माझी कला आणखी समृध्द झाली. याच दरम्यान गुजरात भूकंप, कारगील युध्द अशा राष्ट्रीय आपत्तींवेळी मी पेन्सिल स्केचेस काढून त्यातून जमा झालेली रक्कम राष्ट्रीय कार्यासाठी दिली. कलाप्रवासात मला अनेक दिग्गजांची जवळीक लाभली. क्रिकेट जगतातील महान फलंदाज भारतरत्न सचिन तेंडुलकर याने तर सन्मानाने घरी बोलावून घेत कलेची आस्थेवाईकपणे माहिती घेतली. सचिनने आपल्या घरासाठी विविध कलाकृती करून घेतल्या. इतका मोठा सन्मान मिळण्याचे भाग्य केवळ आणि केवळ कलेमुळेच मिळाले. भारतरत्न भीमसेन जोशी, पं.हरिप्रसाद चौरसिया, पं.झाकीर हुसैन, पं.शिवकुमार शर्मा अशा दिग्गजांची प्रत्यक्ष व्यक्तीचित्रे रेखाटण्याची, शिल्प करण्याची संधी मिळाली.

भारतीय लष्करासाठी ‘कॅवलेरी स्पिरीट’ हे भव्य ब्रांझ शिल्प तसेच नगरमधील एमआयआरसीसाठी केलेले वॉर मेमोरियलचे काम अधिक आनंद देणारे ठरले. गणेशोत्सवात ‘स्वत:च्या हाताने मातीचे गणपती बनवा’ या विषयावर प्रात्यक्षिक कार्यशाळा घेण्यात येतात. त्याला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळतो.आज माझा मुलगा शुभंकर हाही कलाक्षेत्रात स्वत:ला सिध्द करतोय. कला क्षेत्रातील या प्रवासात अनेक चढउतार पाहिले. याचवर्षी एप्रिल २०१८ मध्ये माझ्या अहमदनगरमधल्या स्टुडिओला भीषण आग लागून माझा आयुष्यात जमवलेला कलेचा सर्व ठेवा भस्मसात झाला. या संकटावेळी अनेकांनी मानसिक आधार दिला. विमनस्क अवस्थेत असताना माझ्यातील कलाकार मात्र माझ्यासोबत कायम राहिला. यातूनच उर्वरित आयुष्य फक्त आणि फक्त कलाक्षेत्रासाठी वाहून देण्याचे ठरवले. मी जणू मागे उरलेल्या राखेतून उडालेला फिनिक्स बनलो! देशाच्या स्वातंत्र्याला २०२२ मध्ये ७५  वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त काही तरी भरीव व ऐतिहासिक कार्य करण्याचा माझा मनोदय आहे. चीनची भिंत जशी जगात प्रसिध्द आहे, त्याच पध्दतीने देशाची ७५ वर्षांची वाटचाल दर्शवणारी ७५  किलोमीटर लांबीची शिल्पांकीत भिंत साकारण्याची संकल्पना मनात आहे. याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येत असून तो केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. हे काम मार्गी लागल्यास संपूर्ण देशासाठी ही भिंत जागतिक दर्जाचा ठेवा ठरेल असा विश्वास वाटतो.

आपल्याकडे करियरचा विचार करताना कोणीही कलेचा विचार करीत नाही. यासाठी मुळात शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करताना कला विषय बंधनकारक केला पाहिजे. किमान पहिली ते सहावी कला विषय सक्तीचा असावा. कारण कलेतून होणारे संस्कार व कलानिर्मितीमुळे मिळणारा आनंद हा माणसाला सर्वार्थाने समृध्द बनवतो. आज कोणत्या ना कोणत्या कारणाने समाजात कायम अस्वस्थता असल्याचे पहायला मिळते. समाज आनंदी, स्वच्छंदी होण्यासाठी प्रत्येकात कलेचा दृष्टीकोन तयार व्हायला पाहिजे. पाश्चिमात्य देशांनी कला व कलाक्षेत्राला दिलेले महत्त्व अतिशय प्रेरणादायी असे आहे. पॅरिससारखे शहर संपूर्णत: पर्यटनावर चालते. तेथील जागतिक दर्जाची म्युझियम्स पर्यटकांना आपल्याकडे खेचून घेतात. आपल्या भारतात तर आश्चर्यकारक अशा कलाकृती हजारो वर्षांपूर्वी साकारलेल्या आहेत. दुर्देवाने आपण या कलांचे व्यवस्थित मार्केटिंग करू शकलो नाही. वेरूळ, अजिंठा, खजुराहोसारख्या कलाकृती पुन्हा साकारतील असे कलाकार आपण तयार केले पाहिजे. यासाठी कलेचे शिक्षण देणार्या चांगल्या संस्थांची निर्मिती व्हायला पाहिजे. भारतीय कलेला एक प्रकारची अध्यात्माची जोड आहे. त्यामुळेच जगभरातील अनेकांना भारतासोबतच इथल्या कलेविषयीही आकर्षण वाटत असते. हे आकर्षण आणखी वाढविण्यासाठी आपण आपल्याकडील कलाविष्काराचे चांगल्या पध्दतीने मार्केटिंग केले तर भारत जगाच्या पर्यटन नकाशावर नक्कीच येऊ शकतो.


प्रमोद कांबळे,
(लेखक ज्येष्ठ चित्र-शिल्पकार आहेत)
(शब्दांकन)
-सचिन दशरथ कलमदाणे

First Published on: July 30, 2018 5:40 PM
Exit mobile version