मतलबीपणाच्या पल्ह्याड !

मतलबीपणाच्या पल्ह्याड !

प्रातिनिधिक चित्र

आज मी ऑफिसला येणार नाही, माझ्या पायाला लागले आहे. पायाला सूज आली आहे. मला चालता येत नाही. त्यामुळे मला ताप आला आहे. मी ऑफिसला येऊ शकत नाही, असा विनितचा फोन मला यायचा. मग मीही म्हणत असे ठिक आहे. आराम कर. विनित हा आमचा असा सहकारी होता की, त्याच्या कुठल्याही आजाराची सुरुवात ही त्याच्या पायापासून व्हायची. एकदा तो अलीबागला त्याच्या मामाच्या घरी गेला होता. त्याच्या मामाचा घोडा होता. मामा आणि मामाची मुले त्या घोड्यावर बसत असत. पण विनितला घोड्यावर बसण्याचे धाडस कधी होत नसे. आपण बसल्यावर घोडा उधळेल आणि आपण खाली पडू अशी भीती त्याला नेहमीच वाटत रहायची त्यामुळे तो घोड्यावर बसण्याच्या फंदात कधीच पडत नसे. मामा त्याला खूप आग्रह करी, पण विनित काही तयार होत नसे. विनितला प्राण्यांबद्दल खूप जिव्हाळा होता. त्यामुळे पाळीव प्राण्यांना गोंजारण्यात, त्यांची सेवा करण्यात तो धन्यता मानत असे. त्यामुळे तो त्या घोड्याला ओले चणे खाऊ घालण्यात आणि खरारा करण्यात धन्यता मानत असे. त्या घोड्याला आंघोळ घालण्यासाठी तो समुद्र किनारी घेऊन गेला. त्याला पाण्यातून फिरवून त्याचे अंग चोळत असताना पाण्यात घोड्याचा पाय विनितच्या पायावर पडला. घोडा मजबूत असल्यामुळे विनितच्या पायावर त्याचे चांगलेच वजन पडले. त्यावेळी त्याला फारसे काही जाणवले नाही. पण काही वेळानंतर त्याच्या पायाला सूज आली असल्याचे त्याच्या लक्षात आले.

एकदा विनित आपल्या मैत्रिणीच्या घरी गेला होता. तिच्या घरी कुत्रा आणि दोन मांजरे होती. तिच्या घरातले हे पाळीव प्राणी जणूकाही तिच्या नातेवाइकांसारखे वावरत असत. त्यांचा मोठा थाट असायचा. विनित या कुत्र्या-मांजरांसोबत खेळत होता. नेहमीप्रमाणे ते प्राणीही त्याच्याकडून लाड करून घेत होते. त्यात कुत्र्याचे लाड जास्त झाले असावेत, ते बोक्याला पहावले नसावे. त्याने विनितच्या पायावर जोराने पंजा मारला आणि ओरबाडले. त्यामुळे विनितच्या पायातून रक्त निघाले. त्याला वेदना होऊ लागल्या. खरे तर मैत्रीणीला विनितची दया यायला हवी होती, पण पंजा मारून विनितला जखमी करणार्‍या बोक्याला घेऊन ती त्याचे गुणगाण करू लागली. ‘अरे तो असा अ‍ॅग्रेसिव्ह होत नाही. आज असा कसा त्याने पंजा मारला तुला ?’ विनित बिचारा शांतपणे ऐकूण घेत होता.

विनित बाजारातून भाजीच्या पिशव्या घेऊन घरी जात होता. दिवस पावसाचे होते. रस्त्यावर पाणी साचलेले होते. त्यातून तो चालत होता. अचानक त्याच्या पायाला काही तरी जोरात टोचले. पण त्याला काही कळेना. त्याने पाण्याबाहेर पाय उचलून बघितले. तर त्याच्या पायातून रक्त येत होते. पाण्यातील लोखंडाचा तुकडा त्याच्या पायात घुसला होता. तो कसाबसा सोबतच्या जड पिशव्या घेऊन घरी आला. विनितला सगळ्यांची सेवा करण्याची आवड असल्यामुळे बर्‍याचशा मित्रमैत्रिणी आपली कामे विनितवर सोडून देत. लाईटचे बिल भरण्यापासून ते शेजारच्या वहिनींच्या अमेयला शाळेत सोडून येण्यापर्यंतची सगळी कामे विनित करत असे. त्यामुळे त्याला बरेचदा स्वत:ची काळजी घ्यायला वेळ मिळत नसे. त्याच्या पायाला झालेली जखम वाढत गेली. त्याला सेप्टीक झाले. पाय चांगलाच सुजला. अगदी नाइलाज झाला तेव्हा तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरही म्हणाले, अरे, इतके दिवस होतास कुठे ? त्यावर तो म्हणाला, अहो, काय करणार, कामेच इतकी माझ्या मागे लागली आहेत, कुठे वेळ मिळणार ? तेव्हा डॉक्टरच म्हणाले, धन्य तुझी समाजसेवका. स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष देत जा. त्यावर विनित कण्हत कण्हत म्हणाला, ठिक आहे डॉक्टर साहेब. विनितचा स्वभाव माहीत असल्यामुळे डॉक्टरही हसले. पण त्यामुळे त्याला ऑफिसला दोन दिवस सुट्टी घ्यावी लागली.

विनितचा मित्र-मैत्रिणींचा गोतावळा तसा खूप मोठा होता. कॉलेजमध्ये असताना तर त्याच्या सेवाभावी स्वभावामुळे अनेक मुली त्याच्या मागे असत. कारण परीक्षांचे फॉर्म भरण्यापासून ते नोट्स पुरवण्यापर्यंत त्यांना विनितचाच उपयोग होत असे. कॉलेजमध्ये सर्वसाधारणपणे जुनी मुले नव्या मुलांना आपल्या धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतात. आपली मक्तेदारी असल्यासारखी वागतात. काही वेळात साध्या दिसणार्‍या मुलांचे रॅगिंग करतात. त्यांना त्रास देतात. पण विनित या सगळ्यांपेक्षा वेगळा होता. तो कॉलेजमध्ये आलेल्या नव्या मुलांना ग्रंथालयापासून ते शौचालयापर्यंत सगळे मार्गदर्शन करत असे. घाबरू नका, काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, असा त्यांना धीर देत असे. ऑफिसमध्येही तो सगळ्यांना मदत करायला नेहमीच तयार असे. सगळ्यांची सेवा करण्यात दंग असलेला विनित स्वत:विषयी मात्र फारच उदासीन असे. त्याची कुणी सेवा करण्यापेक्षा त्यालाच इतरांची सेवा करण्याची जास्त आवड असे. त्याचाच फायदा त्याचे मित्रमैत्रिणी म्हणवणारे बरेचजण घेत असत. आपली सगळी कामे त्याच्यावर टाकून बिनधास्त मोकळे होत असत. हा बिचारा त्यांच्यासाठी राबत असे. त्याला मी विचारत असे, विनित, अरे तुझा गैरफायदा घेणार्‍यांसाठी तू कशाला राबतोस ? त्यावर तो म्हणायचा, ‘जाऊ देत रे. त्यांना बरं वाटतंय ना’. खरंच दुसर्‍यांना बरं वाटतंय म्हणून राबणारी विनितसारखी माणसं विरळाच.

First Published on: August 21, 2018 12:00 AM
Exit mobile version