‘भागवत’ पुराण

‘भागवत’ पुराण

सरसंघचालक मोहन भागवत

नखं आक्रमकपणे बाहेर काढायची व ती नखं तेवढ्याच सहजतेनी आत घ्यायची हे कौशल्य केवळ मांजरीकडेच आहे असे नसून ते संघाकडेही आहे. हे परत दिल्लीला तीन दिवस चाललेल्या अखंड ‘भागवत’ पुराणाने सिद्ध केले आहे. सत्तेत येताच नखं बाहेर काढणार्‍या संघाने निवडणुका जवळ येत आहेत याचीच जाणीव ठेवून नखं काही काळासाठी का होईना आत घ्यायला सुरुवात केलेली दिसते. दिल्लीतील तीन दिवसांच्या भागवत पुरणाराचा एवढाच अर्थ आहे. मांजरीने नखं आत घेतली म्हणजे ती आता बदलली आहे. असं आपण म्हणत नाही तसेच भागवतांनी दिल्लीत जे काही विवेचन केले त्यावरून ‘संघ’ बदलला आहे, असे खचितच म्हणता येणार नाही. समुद्रात बुडालेले जहाज वर आणण्यासाठी ‘सत्यनारायणाची’ पूजा केली जावी त्याचप्रमाणे सत्तेचे जहाज पुढील निवडणुकीत बुडू नये यासाठी संघाने ‘भागवत’ पुराण आयोजित केले होते असे फार तर म्हणता येईल.

‘आम्ही जे आहोत ते आम्ही कसे नाही’ एवढे सांगण्याचा खटाटोप सरसंघचालकांनी तीन दिवस सातत्याने केला. तिरंग्यावरील संघाचे प्रेम, संविधानावरील त्यांची निष्ठा, हिंदुत्वामध्ये मुस्लिमांचा समावेश, कोणापासूनही ‘मुक्ती’ नव्हे तर लोक‘युक्त’ भारत, स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचे मोठे योगदान इ.इ. १९३६ च्या काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनात तिरंगा झेंडा वर चढविताना तो खाली कसा आला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याने तो तत्परतेने कसा वर चढवला याचे रसभरीरत वर्णनही भागवत पुराणात येऊन गेले. थापा मारण्यात तर संघाचा हात कोणीच धरू शकत नाही. साने गुरुजींच्या अनुयायाने केलेली ती कृती ‘संघा’च्या नावे त्यांना खपवावी लागते. कारण स्वातंत्र्याच्या चळवळीत यांचा सहभागच नव्हता. तो आता दाखवायचा झाल्यास त्यांना असल्या ‘लोणकढी’ थापा माराव्या लागतात.

नथुराम गोडसे आमचा नव्हता, उलट तो काँग्रेसचाच होता हे सांगत असताना तो केवळ १९९६ पर्यंतच काँग्रेसचा होता हे संघाला सांगण्याची गरज नसते. कारण ते त्यांच्यासाठी गैरसोईचे असते. डॉ. हेडगेवारही काँग्रेसचेच होते हे सांगत असताना महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व स्वीकारल्या नंतरच्या काळातच त्यांना काँग्रेस का सोडाविशी वाटली? १९२० मध्ये गांधी नेतृत्वात आले आणि त्यानंतर पाचच वर्षांत डॉ. हेडगेवारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना का करावीशी वाटली? गांधींच्या नेतृत्वातील स्वातंत्र्य लढ्याला डॉ. हेडगेवारांचा विरोध होता म्हणून संघाची स्थापना झाली. पण मग डॉ. हेडगेवारांच्या नेतृत्वातील रा. स्व. संघाचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान का नव्हते? या प्रश्नांची उत्तरे संघ देत नाही आणि देणार नाही.संघाची खरी अडचण ही आहे की त्यांचा ‘राष्ट्रवाद’ थोडा खरडला की त्यांचा ‘हिंदुत्वाद’ दिसू लागतो आणि त्यांचा ‘हिंदुत्ववाद’ थोडा घासला की त्यांचे ‘ब्राम्हणी हितसंबंध’ उघडे पडतात. मनुच व मनुवादी व्यवस्थेचे त्यांना असलेले आकर्षण लपता लपत नाही आणि म्हणून मग समतेचा पुरस्कार करणार्‍या संविधानाचा तिरस्कार झाकता झाकत नाही. संविधानावर आमची निष्ठा आहे, असे भागवतांनी सांगून किंवा त्यावर ‘पारायणे’ करून ती निष्ठा सिद्ध होत नाही. त्यासाठी त्या अनुकुल काही कृतीही घडावी लागते. त्यांच्याच काळात काही दिवसांपूर्वी संविधान जाळले गेले. पंतप्रधानांच्या घराजवळ हाकेच अंतरावर ते जाळले गेले. पण त्या विरोधात नागपूरच्या ‘रेशीम बागे’ तून काही आवाज आला नाही. किंवा रेशमी बागेच्या तालमीत तयार झालेल्या पंतप्रधानांचा तोंडून काही आवाज आला ना, त्या विरोधात काही कृती झाली किंवा त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी. हे ज्यांना करायचे नसते त्यांनाच मग तोंडदेखली का होईना. तकलादू का असेना. संविधानावरील ‘निष्ठा’ भागवत ‘पुराणा’द्वारे व्यक्त करावी लागते. अखलाखच्या हत्येनंतर सरसंघचालकांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया, गोहत्येच्या संशयावरून केलेल्या हत्येचे आरोपी जेव्हा जामीनावर सुटतात तेव्हा जाहीर सत्कार एक केंद्रीय मंत्री करतो आणि काश्मीरातील ‘आसीफावर’ जेव्हा बलात्कार होतो तेव्हा त्याचे खुलेआम समर्थन भाजपाचे मंत्री व आमदार करतात या सर्व घटनांचे ‘विस्मरण’ व्हावे यासाठी मग ‘हिंदुत्वात मुस्लीमांचाही समावेश आहे’ असे विधान तर करावेच लागते. काँग्रेस ‘मुक्त’ भारताचा उन्माद अंगावर शेकू शकतो याची कल्पना येताच ‘मुक्त’ नव्हे ‘युक्त’ अशीही पलटी मारावी लागते. वर काँग्रेसच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचे तोंडदेखले का होईना गुणगाण करावेच लागते.

‘भ्रमित करावे सकळजन’ ही रा.स्व. संघाची त्यांच्या जन्मापासूनच ‘नीती’ राहिली आहे. त्याच नीतीला अनुसरून दिल्लीचे भागवत पुराण पार पडले. अखेर कोण काय बोलते यापेक्षाही प्रत्यक्ष त्यांची भूतकाळातील कृतीच अधिक बोलकी ठरत असते. आणि वर्तमानातील भागवतांचे बोलणे खरे की खोटे हे संघाच्या भविष्यातील कृती वरूनच ठरणार आहे. त्यांचा पूर्व इतिहास बघता भागवतांचे दिल्लीतील ‘बोल’ ही ते त्यांच्या वागणुकीतून खोटेच ठरवतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तरीदेखील ते बदलत असतील तर त्यांचे ‘सावध’ स्वागत करायला हरकत नाही.लोकशाहीत निवडणुकीच्या काळातील ‘महिमा’च अगाद असतो. याच काळा गेंड्याची कातडी असलेले ‘मुलायम’ कातडीचे बनतात. एरवी मुग्रर असणे या काळापुरते का होईना ‘नम्र’तेचे साक्षात पुतळे बनतात. वज्राहुनही कठोर असणारे मेणाहूनही ‘मऊ’ बनतात. जनतेप्रश्नाबाबत असंवेदनशील असलेले अतीसंवेदनशील बनतात. दिल्लीतील तीन दिवशीय ‘भागवत’ पुराण हा या निवडणूक काळाचा ‘महिमा’ असण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे त्यावर फार ‘पारायण’ करण्याची गरज नाही. बुडलेले जहाज सत्यनारायणची पूजा करूनही कधीच वर येत नाही. आजपर्यंत आले नाही. त्यामुळे बुडणारे जहाज ‘भागवत’ पुराणाने बुडण्यापासून वाचविले जाईल याची सुतराम शक्यता वाटत नाही. अर्थात भागवतांना तसे वाटत असल्यास त्या त्यांच्या वाटण्यावर आक्षेप तरी आपण का घ्यावा?


-चंद्रकांत वानखडे

First Published on: September 25, 2018 2:00 AM
Exit mobile version