भोरकरवाडीची चावडी आन हाऊडी

भोरकरवाडीची चावडी आन हाऊडी

(भोकरवाडीच्या चावडीत पिपरनीखाली बबन्या, नाम्या, सखाराम, काश्या, आणि गावातली मंडळी पत्ते कुटत, गप्पा मारत बसली हैत. )

नाम्या- कारं बबन्या काय हालहवाल देशाचं निवडणुकीचं?

सखाराम- ज्याला जिकडं जायचं त्यानं तिकडं बोंबलत जावं, आपल्याला काय पडलंय? आपल्या शेतकी कर्जाचं बोला, पावसात चिकुल झाल्या रस्त्याचं बोला भौ, ईष्टी बंद पडलीय, डीपुतल्या म्हमद्या मास्तर खराब रस्त्यानं वस्तीला गाडी यायची न्हाई मंतोय…

नाम्या- ईष्टी बंद करायला त्याच्या बाचा रस्ता है का? तालुक्याच्या सायेबाकडं जातो, मग बगतो इश्टी कशी बंद करतो त्येच.

काश्या- आरं लेकवौ, गावाच्या भायेर पडून जरा देशाचंपन बगा की, घड्याळवालं साएब सातार्‍यात आल्तं, इलेक्शनानंतर सातार्‍यात गुलाल उदळायला बोलवा म्हन्लं…

सखाराम- मंग उदळा की गुलाल, अबिर, बुक्का काय पायेजे ते…तुम्हाल कुनी आडवलंय?

नाम्या- न्हाई म्हन्लं, सातारच्या राजानं हातात कमळ घेतलं म्हनून इचारलं?

काश्या- त्यानं काय हुतंय? कॉलर उडायची र्‍हातीय का? कमळ जरी हातात घेतलय तरी तलवार खाली ठेवली नाय राजानं?

सखाराम- तिकडं मुंबईला शाहभाऊ आलं, पुनाच्यान देवेंद्रच मुख्यमंत्री व्हनार म्हटलं की ती?

काश्या- म्हंजी आता युती होत न्हाई?

नाम्या- न्हाईच की, कशी व्हावी? पन पाटील काई ऐकायला तयार न्हाईत, अजूनबी त्यांनी आस सोडलेली न्हाई.

काश्या- आस धरलीच कदी हुती? सोडाया? त्यांना बि युती नकूच हाय? आपल्या सत्तेच्या ताटात वाटेकरी होऊ इरुदातल्या पक्षाचं काम करनारी ब्याद मागं काऊन लावून घ्यावी? आन, मुदीभाऊंची लाट इतक्यात ओसरत नस्ती, तिकडं हाऊडी का काय म्हनावं, हाऊडी…

सखाराम- आमची तायडी म्हनंत हुती हाऊडीला गेलेत मुदीभाऊ, ट्रम्पतात्यांचा नि मुदीभाऊंचा सत्कार केलाय म्हनं त्या गावात. आपल्या गड्यानं तिथं बि अबकी बार ट्रम्प सरकारचा गजर केला म्हनं…

नाम्या-आँ….ट्रम्पातात्याबि कमळ हातात धरत्यात की काय? न्हाई म्हनलं?, सगळीच चालल्लीत कमळाकडं…ट्रम्पतात्यातरी का मागं र्‍हातील?

काश्या-आमला खालची आळी, वरची आळी नि ही भोकरवाडी ही चावडीच तेवढी म्हाईत है? ही हाऊडी काय भानगड हैं? नवी वाडी बनवली का ट्रम्पतात्यांनी?

बबन्या- आता कसं…तिकडं अमेरिकेतच्या ह्युस्टस्टानतल्या मोठ्या स्टेडीयमच्या गोल चावडीला हाऊडी म्हनत्यात, लय मोटी पंचायत भरती तिथं…नुकता कालवांच कालवा, लोकं हाऊडी हाऊडी…मुदी मुदी करत्यात…काहीबाही गॉटमॉट इंग्रजीत बोलत्यात, त्याला हाऊडी म्हनत्यात तिथं आपले मुदीभाऊ नि ट्रम्पतात्यांची भेट झाली. तिथं मुदीभाऊ नि ट्रम्पतात्या दोगांनीबी दोन देशांच्या हाणामारीला इरोद केला, आता आपल्या शेजारच्यांचं काही खरं न्हाई….

काश्या- कारं बबन्या मी काय केलं?

बबन्या- शेजारचा म्हंजे तू नाय रे काश्या, देशाच्या शेजारचा, तुम्ही सगळे हितंच बसा, त्या जगात काय चाल्लंय, त्याची खबरबात तुमाला न्हाई..इष्टी येईना, पीकं कर्जपानी कदी कमी हुईल, जत्रा कदी ठेवायची, वाटवरच्या मारुतीचा उत्सव कसा करावा? जनावरं कशी घ्यावी? पान्याचा पंप, बियानं, शेती, हापसा, पानी या पलिकडं तुमचे यायचे न्हाय…मंग तुम्हाला हाऊडी मोदी, ट्रम्पतात्यांचा दरारा, धाक कसा कळावा? पंचायतीच्या निवडणुकपुडं तुमची धाव नाई..तुमी आपलं मुंबईतलं सरकार निवडायचं बघा, भायेर काय चाललंय ते तुमाला नाय कळायचं, ट्रंपतात्या, हाऊडीचं काम तुमचं न्हाई…तुमी आपलं चावडी नि भोकरवाडीचंच बगा…कसं ?

First Published on: September 24, 2019 5:52 AM
Exit mobile version